ठसा – प्राचार्य भगवानराव देशमुख

959

>> प्रशांत गौतम

कथाकार, कवी प्राचार्य भगवानराव देशमुख यांचे नाव समोर आले की, साहित्य रसिकांना त्यांचे बहारदार कथाकथन, खुमासदार कवितांचे सादरीकरण आठवते. कथाकार, कवी, वक्ते लेखक म्हणून ते राज्यभरात सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने माणसांवर भरभरून प्रेम करणारा दिलदार प्रतिभावंत आपल्यातून निघून गेला आहे. 1 जून 1938 साली जळगाव जिल्हय़ातील पाचोरा तालुक्यातील हरेश्वर पिंपळगाव येथे जन्म झालेले भगवानराव देशमुख 1971 ते 2000 या काळात संभाजीनगर जिह्यात सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य होते. साहित्य संमेलन मग ते छोटे असो की मोठे, त्यात त्यांचा कथाकथनात, कविसंमेलनात सहभाग आवर्जून असायचा. शेकडो कविसंमेलने त्यांच्या खुमासदार सादरीकरणाने गाजली. व्यासपीठावर एकदा सादरीकरण केलेली कथा, कविता पुन्हा सादर केली नाही. कथा असो की कविता, त्यांच्या दमदार सादरीकरणात तेथील निसर्ग, स्त्रीयांचे भावविश्व आणि प्रेमाची महती, विनोदी रंजनात्मक बाज असल्याने रसिक, श्रोता कधी कंटाळत नसे. मराठी साहित्यात त्यांनी मोजके लिहिले. ‘खानदानी’ हा कवितासंग्रह, ‘शेपटीने अडले रामायण’ आणि ‘सौ. स्कूटर शिकते’ हे दोन कथासंग्रह तसेच ‘सुवंता’ आणि ‘तहान’ या चित्रपटासाठी केलेले गीतलेखन नावावर साहित्य संपदा कमी असली म्हणून काय झाले? विविध संमेलनात कथा/कवितांचे प्रभावी सादरीकरण करून त्यांनी रसिक-श्रोत्यांवर आपले गारुड प्रदीर्घ काळ कायम ठेवले. साहित्य संमेलनास उंचीवर नेऊन ठेवले. देशमुख विद्यार्थीप्रिय शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य होते. माणसांवर तर त्यांचे प्रेम तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये ठासून भरले होते. माणूस, माणुसकी आणि जीवन यावर त्यांची नितांत श्रद्धा व अमाप विश्वास होत़ा म्हणूनच त्यांचा लोकसंपर्कही दांडगा होता. ‘मराठवाडय़ाची भोळीभाबडी माणसं लय पुण्यवान माती’ हे त्यांचे मराठवाडा गीत तर सर्वदूर पोहोचले व कमालीचे लोकप्रिय ठरले.

साहित्य संमेलने गाजवणारे भगवानराव महाराष्ट्रभर लोकप्रिय होते, पण पाय सदैव जमिनीवर होते. मातीशी एकनिष्ठ होते. शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्याचे ते काम करीत असत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. मराठी नाटकांचे प्रयोग करणाऱ्या श्रीराम भजनी मंडळाचे ते साक्षीदार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोयगाव येथील नाटकांची परंपरा जतन करण्यासाठी ते सक्रिय होते. लोटू पाटील यांच्या नाटय़परंपरेचा वारसा लाभलेल्या गावात त्यांनी नाटकांचे अनेक प्रयोग केले. राज्यभरातील रंगकर्मींना सोयगावात आणून त्यांनी नाटय़ महोत्सव भरवला. तो कमालीचा गाजला व लोकप्रिय ठरला. राज्य नाटय़ स्पर्धा, एकांकिका यात त्यांचा सहभाग असल्याने अनेक नाटय़कलावंतांशी त्यांचा स्नेह होता. त्याच स्नेहाची जाणीव ठेवून कलावंत मंडळींनी सोयगावकरांविषयी, देशमुख सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या परिसरातील नाटय़परंपरेविषयी महाराष्ट्रभरातील रसिक जाणकार नि अभ्यासकांना कायम उत्सुकता वाटत राहिली आहे. स्व. बाबूराव काळे, लोटू पाटील यांच्याविषयीचा जिव्हाळा, आत्मीयता देशमुखांच्या बोलण्यातून सदैव जाणवत असे. या दोघांमुळे आपल्याला सोयगाव परिसराचा इतिहास समजू शकला, अशी कृतज्ञ भावना ते व्यक्त करीत असत. सोयगावला प्राचार्य म्हणून नियुक्त होण्याआधी ते कोल्हापुरात प्राध्यापक होते. तेथील किस्से ते सांगत असत. संमेलने रंगवणारा हा देशमुख नावाचा माणूस गप्पागोष्टीत रमणारा गोष्टी वेल्हाळ असा कलंदर होता. त्यांच्या निधनाने सोयगावच्या साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या