ठसा : किशोर कदम (सौमित्र)

834

>> प्रशांत गौतम

मराठी चित्रपटातील दमदार अभिनय आणि कवितेच्या क्षेत्रातील मुशाफिरी अशी ओळख लाभलेले किशोर कदम ‘सौमित्र’ या नावाने परिचित आहेत. अभिनय आणि कविता या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या ‘बाऊल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन 4 ऑगस्टला संभाजीनगरात आघाडीचे कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते झाले. सतरा वर्षांपूर्वी त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘…आणि तरीही मी’ प्रकाशित झाला होता. त्यानंतर प्रदीर्घ कालखंडानंतर ‘बाऊल’ हा कवितासंग्रह रसिकांच्या भेटीला येतो आहे. पहिला कवितासंग्रह जेव्हा निर्मितीच्या प्रक्रियेत होता तेव्हा त्यांचा ‘गारवा’ हा अल्बम लोकप्रियतेच्या शिखरावर होता. या अल्बमने लोकप्रियतेचे उच्चांक मोडले. नुसते विक्रम मोडले नाही, तर तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांत या अल्बममधील गेय कवितांनी स्थान प्राप्त केले. खरे तर या संग्रहातील एखादी गेय कविता ते आपल्या पहिल्या कविता संग्रहात घेऊ शकले असते; पण त्यांनी ते टाळले. पहिल्या संग्रहातील कविता ही गांभीर्यानेच लिहिलेली असावी, ही त्यांची भूमिका होती. ‘गारवा’मधील प्रेमकविता आणि पहिल्या कवितासंग्रहातील कविता ही वेगळय़ा स्वरूपाची आहे, तर ‘बाऊल’मधील कविताही पूर्णपणे बदललेली आहे. ‘‘या संग्रहाचे नावच अर्थपूर्ण आहे. वैष्णव आणि सुफी या दोन पंथांच्या विचारधारेतून चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात व पंधराव्या शतकाच्या प्रारंभात ‘बाऊल’ पंथाचा प. बंगालमध्ये उदय झाला. अंगात कफनीसारखे पायघोळ वस्त्र्ा, हातात एकतारी किंवा कमरेवर डुग्गी हे वाद्य, ओठावर देहत्वाची, राधा-कृष्णाची किंवा गौरांग प्रभूची गाणी गात बाऊल साधक खेडय़ापाडय़ात फिरत असतात. सौमित्र नावाचा बाऊल आपल्या बाऊल कविता घेऊन अभिव्यक्त होत आहे.’’ असे डॉ. कविता मुरुमकर आपल्या पुस्तक प्रकाशन लेखात म्हणतात.

कुठली तरी एक जागा आहे, कुठला तरी एक रस्ता आहे
कुठे तरी एक पोहचणं आहे, कुठेतरी एक ठिकाण आहे
थांबून माझ्यासाठी की थांबलो आहे मीच माझ्यासाठी
तिथं जाऊन वाट पाहत स्वतःची
या सारख्या चिंतनशील मनात घर करणाऱया कविता बाऊल संग्रहात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या