भटकंती – कोल्हापूर नव्हे, कलापूर!

>> निमिष पाटगावकर

काही शहरांचा असा ऋणानुबंध असतो की, तिथे तुम्ही राहत नसलात तरी ते आपले शहर वाटते. कोल्हापूर हे असेच माझे आपले शहर वाटते मला.

माझ्यात आणि लता मंगेशकरांमध्ये एका बाबतीत साम्य आहे. घाबरून जाऊ नका, माझ्या आवाजाची पातळी मला माहीत आहे. लता मंगेशकरांनी पूर्वी एका मुलाखतीत आवडती तीन शहरे कुठची विचारल्यावर “मुंबई, कोल्हापूर आणि लंडन’’ हे उत्तर दिले होते. हेच ते आम्हा दोघांमधले साम्य. मूळचा मुंबईकर दुसरा कुठलाच होऊ शकत नाही. तेव्हा मुंबई आवडतेच, लंडन आवडते ते त्याच्या ऐतिहासिक वारशांमुळे आणि कोल्हापूर आपुलकीने आपलेसे करते.

काही शहरांचा असा ऋणानुबंध असतो की, तिथे तुम्ही राहत नसलात तरी ते आपले शहर वाटते. कोल्हापूर हे असेच माझे आपले शहर. लहानपणी वार्षिक परीक्षा झाली की, महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडून कोल्हापूर गाठायचे ते थेट जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राहायचे. आजी-आजोबा, काकाöकाकू, चुलत भावंडे आणि आमच्या कोल्हापूरच्या घरी सदोदित कुणी ना कुणी मुक्कामाला असल्याने घर अगदी भरलेले असायचे.
सकाळी बंब तापवायचा, अग्निकुंड प्रज्वलित केल्यावर सगळ्यांच्या आंघोळी त्या गरम पाण्यात व्हायच्या. सकाळी सकाळी मस्त घरच्या तांदळाचा मऊ भात, मेतकूट आणि काकवी किंवा गुळांबा तोंडी लावायला असायचा. आमचे घर अगदी गावात असल्याने अंबाबाईचे देऊळ हे बागडायला मोठे अंगण असायचे. गरुड मंडपात पकडापकडी खेळण्याइतपत मोकळी जागा असायची. दुपारी दारावरून ओरडत जाणाऱया पेरिना किंवा फेमिना आईस्क्रीमवाल्याच्या हाळीकडे लक्ष असायचे. हे आईक्रीम म्हणजे एक व्हॅनिला आईक्रीमची कांडी असायची. संध्याकाळी रंकाळा ठरलेला असायचा. तिथल्या ताराबाई रोडवरच्या रंकाळय़ाच्या दरवाजांच्या दारातल्या दादूची भेळ हा आमच्या संतुलित आहाराचा एक भाग होता. ही भेळ करताना त्या दादूचे चमचा भांडय़ात ढवळताना सर्वांग डोलायचे. एखादी अदाकारी कुणा कलाकाराने पेश करावी असे ते दृश्य असायचे. कालांतराने भेळ खायचे ठिकाण राजकमल भेळ झाले.

कोल्हापूर म्हणजे शक्तिपीठ आहेच, पण तितकीच या शहराची ओळख ही कलापूर अशीही आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे हे शहर जननी आहे. जयप्रभा, शालिनीसारखे एकेकाळचे मराठी चित्रपटसृष्टीचे वैभव असलेले स्टुडिओ आता कार्यरत नाहीत, पण त्यांच्या समोरून जाताना आजही गतवैभवाची झलक बघायला मिळते. साधारण 80-90च्या दशकापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत एखादे गाणे हमखास रंकाळ्याच्या बागेत चित्रित झालेले असायचे. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम ते अरुण सरनाईक, सूर्यकांत, चंद्रकांत, राजशेखर हे सर्व कोल्हापूरची देणगी आहे. मंगेशकर कुटुंबीय ते सुधीर फडके यांची जडणघडणही या शहराने बघितली. एकेकाळचे मराठी चित्रपटसृष्टीचे माहेर आजही आपली कला अनेक गोष्टोRत दाखवत असते.

माझ्या आठवणीतील म्हणजे तीस-चाळीस वर्षांपूर्वीचे कोल्हापूर आणि आजचे कोल्हापूर यांच्यात खूप फरक झाला आहे. कोल्हापूरने आपले रंगरूप बदललेले दिसते. नवनवीन दुकाने आली आहेत. सुबत्ता आणि पश्चिम महाराष्ट्र यांचे नाते असल्याने मर्सिडीजपासून सर्व गाडय़ांची शोरूम कोल्हापुरात दिसतात, पण अजूनही रंकाळा तसाच आहे, गुजरी तशीच आहे आणि पापाची तिकटीही तशीच आहे. मुळात या सर्व बदलांना सामोरे जाताना कोल्हापुरी माणूस बदलला नाही आणि पुण्यासारखे इथे कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचे जंजाळ पोहोचले नसल्यामुळे शहराची ओळख अजूनही टिकून आहे.

कोल्हापूरची मिसळ आणि तांबडा, पांढरा हे सर्वांनाच परिचित आहेत, पण त्याही पलीकडे कोल्हापूरची खाद्यसंस्कृती आहे. साधारण एंsशीच्या दशकात इथे राजस्थानी मेवाड चाट आणि आईक्रीमच्या गाडय़ा दिसायला लागल्या. एक तीर्थक्षेत्र म्हणून कोल्हापूरचे चित्र गेल्या काही वर्षांत पालटले. तिरुपतीचे दर्शन घेतल्यावर अंबाबाईचे दर्शन घेतले नाही तर पुण्य लाभत नाही अशी समजूत गेल्या काही वर्षांत वाढीस लागली. या समजुतीने कोल्हापुरात तिरुपतीवरून येणाऱयांचे लोंढे वाढले. तिरुपती-कोल्हापूर थेट रेल्वे सेवा झाली. हैदराबाद-कोल्हापूर विमान सेवा सुरू झाली आणि या सर्वांची कोल्हापुरात गर्दी अमाप वाढली.
याचबरोबर या दाक्षिणात्य लोकांना खपेल अशा अप्पे, उत्तपा यांच्या गाडय़ा गल्लोगल्ली खाद्यसंस्कृतीत भर घालू लागल्या. यात लक्षणीय नोंद म्हणजे लोणी डोसा या प्रकाराची. शुद्ध पांढऱया लोण्याचा गोळा डोशात विरघळल्यावर त्याची चव जी तोंडात रेंगाळते तो औरच आहे!

[email protected]