लेख : ठसा : किशोर प्रधान

>> शिल्पा सुर्वे

विनोद निर्मिती करून इतरांना हसवणं ही तशी अवघड कामगिरी. नुसत्या चेहऱ्यावरील बावळट भावाने, सहज बोलण्यातून विनोद निर्मिती करणारे खरंच महान. शरद तळवळकरांपासून बबन प्रभूंपर्यंत कितीतरी अवलियांनी विनोदी भूमिकांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. याच पंक्तीतील एक नाव म्हणजे किशोर प्रधान. रंगभूमीवरील प्रधानांच्या नुसत्या वावरण्याने विनोदाची खसखस पिके. विरळ- कुरळे केस, डोळ्यांवर जाड फ्रेमचा चष्मा, डोळ्यांत कधी कंजूष तर कधी लबाड भाव घेऊन हा विनोदाचा प्रधान रंगभूमीवर प्रकट व्हायचा, तोच हास्यरस सोबत घेऊनच. स्वत:च्या प्रधान चालीने तो भल्याभल्यांना गारद करायचा.

किशोर प्रधान हे मूळचे नागपूरचे. उच्चशिक्षित. अर्थशास्त्र विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले. कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका, नाटकांतून काम केले. त्यांची आई मालतीबाई प्रधान यांनीही 1942 ते 45 च्या सुमारास नाटकांतून कामे केलेली होती. त्यामुळे प्रधान यांच्यावर नाटकाचे संस्कार घरातूनच झाले. पुढे मुंबईच्या टाटा सामाजिक संस्थेची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि 1960 साली ते मुंबईला आले. त्यांना ग्लॅक्सो कंपनीत नोकरी मिळाली. ही नोकरी त्यांनी 28 वर्षे केली. नोकरी सर्व नाटकं, तालीम, दौरे केले. प्रधानांची नाटकाची खरी सुरुवात मुंबईत आल्यावरच झाली, असेच म्हणावे लागेल. मुंबईत आल्यावर त्यांनी वांद्रे येथील एमआयजी वसाहतीत नाटकवेडय़ांना एकत्र करून नटराज ही संस्था सुरू केली. शाम फडके लिखित ‘तीन चोक तेरा’ हे नाटक केले. त्याचे दिग्दर्शन प्रधान यांनीच केले. त्यांची काम करण्याची पद्धत शाम फडके यांना खूपच भावली. त्यांनी ‘काका किशाचा’ हे नवे नाटक प्रधानांच्या टीमला दिले. 1970 च्या आसपास आलेले हे प्रहसन तुफान गाजले. पुढे ब्रह्मचारी असावा शेजारी, मालकीण मालकीण दार उघड, लागेबांधे, संभव असंभव, हॅण्डसअप, लैला ओ लैला, ती पाहताच बाला, जेव्हा यमाला डुलकी लागते, सावित्री, हनिमून झालाच पाहिजे अशा कितीतरी नाटकांत त्यांनी काम कले. मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर त्यांनी दूरदर्शनवरून ‘निरोप’ हे पहिले मराठी नाटक सादर केले. दूरदर्शनच्या अनेक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. दूरदर्शनवरील ‘गजरा’ हा लोकप्रिय कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभा यांच्यासह सादर केला. मुद्दाम लिहिण्याजोगी गोष्ट म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेल्या ‘कल्पनेचे खेळ’ या गूढनाट्यातही प्रधानांनी कमाल केली होती. त्या नाटकातून या विनोदवीराने  प्रेक्षकांना रडवले होते आणि घाबरवलेही होते. बबन प्रभू, आत्माराम भेंडे यासारख्या दिग्गज कलाकारांसाबेत काम करण्याची संधी प्रधानांना मिळाली. याच काळात मराठी चित्रपटांच्या त्यांना ऑफर्स येत होत्या. पण तेव्हा मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला व्हायचे. तसे सलग काही दिवस शूटिंगला द्यावे लागायचे म्हणून त्यांनी चित्रपट नाकारले. निवृत्तीनंतर मात्र त्यांनी चित्रपट केले. मधल्या काळात त्यांच्या कामातील जबाबदाऱ्या वाढल्याने त्यांनी काही काळ नाटकापासून फारकत घेतली. प्रधान यांनी ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘भिंगरी’, ‘मामा भाचे’ या मराठी चित्रपटात काम केले.

महेश मांजरेकर यांचे ते हुकमी प्रधान होते. मांजरेकरांच्या ‘लालबाग परळ’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ अशा  मराठी चित्रपटांत प्रधान यांनी अभिनय केला. ‘ब्रेव्हहार्ट’, ‘फ्रेंडशीप अनलिमिटेड’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘शुभ लग्न सावधान’ या अलीकडच्या चित्रपटांतही त्यांनी काम केले. ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील खट्याळ म्हाताऱ्याच्या छोट्याशा भूमिकेतही ते छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांचा स्टेशन मास्तर प्रेक्षक विसरू शकत नाही. असे असले तरी हिंदी चित्रपटांतील वातावरणात ते फारसे रमले नाहीत. इंग्रजी रंगभूमीशवाय किशोर प्रधान यांची कारकीर्द पूर्ण होऊ शकत नाही. उभरत्या इंग्रजी रंगभूमीने नेहमीच एक दिलासादायक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले. भरत दाभोळकर यांचे बॉटमअप्स हे प्रधानांनी केलेले पहिले इंग्रजी नाटक. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांची भरत दाभोळकर यांच्याशी ओळख झाली. गंमत म्हणून एखादे इंग्रजी नाटक करता येइल का, हा प्रश्न पुढे आला. हिंदुस्थानी प्रेक्षकांसाठी इंग्रजी, हिंदी मिश्रित भाषा म्हणजे ‘हिंग्लिश’चा वापर करून नाटक करायचे ठरले. हा प्रयोग यशस्वी ठरला. प्रधानांनी बॉटम्सअप, दॅटस माय गर्ल, कॅरी ऑन हेवन अशा नाटकात काम करून देशविदेशात प्रयोग केले. आपली उपजीविका अभिनयक्षेत्रातच आहे, याची जाण ठेवून प्रधान कार्यरत राहिले. उतारवयात पैशांसाठी नाही तर हौस म्हणून मनाला आनंद वाटतोय म्हणून काम केले. या क्षेत्रात येणाऱ्या तरुण पिढीसाठी ते आधारवड होते. म्हणूनच विनोदवीरांच्या परंपरेतील प्रधानांच्या निधनाने अवघी रंगभूमी हळहळली.

 

आपली प्रतिक्रिया द्या