शिवनाथ कुचे महाराज

>>अनिल कुचे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अनेकांनी केले आहे. त्यापैकीच एक म्हणजे शिवनाथ कुचे महाराज. त्यांनी राष्ट्रसंतांचे विचार भजनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविले. मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता केवळ तुकडोजी महाराज जनतेपर्यंत पोहोचावेत असाच उद्देश बाळगला. त्यांच्या निधनाने राष्ट्रसंतांच्या भजनाचा पाईक आता विसावला आहे. वर्धा जिल्हय़ातील तळेगाव श्यामजीपंत येथे अलीकडेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीवर कुणाचा विश्वासच बसत नव्हता, परंतु काळाने डाव साधला. शिवनाथ कुचे अमरावतीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कठोरा बु. या गावचे मूळ रहिवासी, परंतु त्यांचे कार्यक्षेत्र वर्धा जिल्हय़ातील तळेगाव श्यामजीपंतच राहिले. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच शिवनाथ कुचे यांना भजनाचा छंद लागला होता. गावात असलेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून ते भजनाला जाऊ लागले. कालांतराने राष्ट्रसंतांच्या भजनातील विचारांनी प्रेरित झालेले कुचे अखेर राष्ट्रसंतपरायण झाले.

कठोरा गाव सोडल्यानंतर त्यांना एसटी महामंडळात चालकाची नोकरी मिळाली होती. तब्बल 25 वर्षांच्या एसटीच्या सेवेत त्यांच्या गाडीला कधीच अपघात झाला नाही, म्हणूनच विनाअपघात चालक म्हणून त्यांचा सेवानिवृत्तीनंतर एसटी महामंडळाने गौरव केला. संपूर्ण एसटीतील सेवा ही तळेगाव श्यामजीपंत येथे झाल्यामुळे त्याच गावात ते रहिवासी झाले होते. योगायोगाने राष्ट्रसंतांची कर्मभूमी अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे त्यांचा संपर्क मोझरी येथील राष्ट्रसंतांच्या विचारांशी एकाग्र असलेल्या व्यक्तीसोबत आला. तळेगाव श्यामजीपंत येथे होणाऱया प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा महत्वाचा वाटा असायचा. गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात भजन-कीर्तन किंवा प्रवचन असेल तर त्या ठिकाणी शिवनाथ कुचे प्रामुख्याने हजर राहायचे. कालांतराने धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावणारे शिवनाथ कुचे यांना संपूर्ण परिसरातच कुचे महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. मूळ तळेगावात कोणत्याही जातीधर्माचा कार्यक्रम असल्यास त्या कार्यक्रमाचे संचालन कुचे महाराज यांच्याकडेच राहायचे. तब्बल 40 वर्षांचा कालखंड त्यांचा तळेगाव येथेच राहिला. त्यामुळे मूळ गाव कठोरा असले तरी त्यांची कर्मभूमी तळेगावच राहिली होती. मोझरीपासून ते कारंजा, आष्टी, आर्वीपर्यंतच्या परिसरात राष्ट्रसंतांच्या विचारांचा पाईक म्हणूनच त्यांची ओळख होती. कुचे महाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधन कार्याचा वारसा चालवला. त्यासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या