
>> दिलीप जोशी ([email protected])
पर्यटन म्हटलं की, विशिष्ट गोष्टीच पाहायच्या असं ठरवून न जाता जे नवीन पाहायला मिळेल त्याचा आस्वाद घ्यायचा असं मनाशी आणलं की, मार्ग सापडत जातो. मुंबईसारख्या महानगरातही प्राचीन इतिहासाची साक्ष देणारी कितीतरी ठिकाणं आहेत. अर्वाचीन काळातील बांधकामंही मनोवेधक आहेत. घाईगर्दीच्या जीवनात त्याकडे निवांतपणे पाहण्यासाठी वेळ मात्र काढायला हवा.
खूप वर्षांपूर्वी आम्ही मध्य प्रदेशात गेलो होतो. नेहमीची ठिकाणं पाहून झाल्यावर खजुराहोपासून जवळ असलेल्या परिसरात फिरताना बुंदेलखंडातील राजाचा राजवाडा अचानक पाहता आला. त्याच्या मार्गावरच पांडवप्रपात नावाचा निसर्गरम्य धबधबाही होता.आता कदाचित संपर्कसाधनांमुळे या गोष्टी सर्वज्ञात असतील, पण त्या काळात त्याचं अप्रूप होतं. भीमबेटका येथील आदिवासी चित्रशैली बघायलाही खूप लोक तेव्हा जात नव्हते. राजस्थानातील माऊंट अबू येथील वस्तुपाल आणि तेजपाल यांनी बांधलेली दिलवाडा मंदिरं हा संगमरवरी शिल्पांचा उत्कृष्ट नमुना. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीही पर्यटक येथे येतच असत, पण त्यावेळी फारसं कुणी जात नसलेल्या गऊमुख (गोमुख) या ठिकाणी जायचं आम्ही ठरवलं. पहाडावरून शेकडो पायऱ्या उतरून खाली गेलो, तर तिथे चक्क मुंबईचा एक माणूस भेटला. संन्यस्त वृत्तीने राहणारा. त्याने सांगितलं की, हे कामधेनूचं मंदिर आहे आणि इथेच वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता. त्यावेळी त्या दौऱ्यातलं हे नवीन होतं.
अगदी अलीकडे तीन-चार वेळा नागपूरला जाणं झालं. प्रत्येक वेळी नवीन काय पाहणार? इथे ‘गुगल’ उपयोगी पडलं. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने कोळशाच्या खाणीतील अंतर्भागाचं दर्शन घडवण्याची ट्रिप आयोजित केली होती. त्यात सामील झालो आणि केबल सीटवर बसून गुहेतला खोल खोल अंधार कापत (हेडलाईट लावून) कोळशाच्या खाणीच्या आत काम कसं चालतं ते प्रत्यक्ष अनुभवलं. आमच्यासारखेच, पण अगदी मोजके लोक त्यावेळी तिथे आले होते. असाच वेगळेपणाचा अनुभव 1990च्या दशकात लोणार विवर सरोवर पाहिलं तेव्हा आला होता. पुढे तर आमच्या ‘खगोल मंडळा’ने तिथे दोन दिवसांची लोणार अभ्यास परिषदच आयोजित केली.
गेल्या महिन्यात कोकणात कुडाळजवळच्या पेंडुर गावात जाण्याचा योग आला. मित्राचं अतिथ्यशील घर आमची सारी सोय पाहत होतं आणि आम्ही भटकत होतो. पिंगुळीची चित्रकथी जवळचंच वसुंधरा विज्ञान केंद्र, ‘स्टेन ग्लास’ कलाकारी आणि गावाच्या आसपासची पुरातत्व शिल्पं अशा अनेक गोष्टी पाहिल्या आणि तिथून जवळच असलेल्या कुडोपी गावात असलेली पाच ते दहा हजार वर्षांपूर्वीची मानली जाणारी कातळशिल्पं पाहण्यासाठी निघालो.
रिक्षाने जाताना तिथपर्यंत सहज जाता येईल असं वाटलं होतं, पण वाट थोडी बिकट होती. छोटीशी एक टेकडी पार करून जायचं होतं. त्यानंतरही सुमारे दोन किलोमीटर चालल्यानंतर कातळशिल्पं दिसणार होती. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत मध्यान्ह झाली. आमची ‘कातळवेळ’ दमछाक करणारी ठरली. तरी ती कातळचित्रं पाहिल्यावर विलक्षण आनंद झाला. जवळच्या ग्रामपंचायतीमधल्या सुहृदाने आमच्या बरोबर येऊन नेमक्या ठिकाणी नेल्यामुळे भ्रमंती सोपी झाली. फोटो, व्हिडीओ असं करत आम्ही ती कातळचित्रं न्याहाळत राहिलो. पुरातत्व खात्याला अर्थातच त्याची माहिती आहे. काही पुरात्त्व अभ्यासकांशीही चर्चा झाली आणि लक्षात आलं की, मालवण तालुक्यात अशा कातळशिल्पांच्या बऱ्याच जागा आहेत. आम्ही जाऊन आलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्थानिक वृत्तपत्रांत, खुडीच्या माळरानात कातळशिल्पं सापडल्याची बातमी आली. हा सारा महाराष्ट्राचा अमोल असा सांस्कृतिक ठेवा आहे. तो उत्तम प्रकारे जपायला हवा. कोणा अज्ञात पूर्वजांनीं कातळावर नोंदलेली कला इतिहासातील अनेक पानं उलगडणारी ठरू शकेल. असं काही अनुभवलं की, माणसाच्या बुद्धिवैभवाची जाणीव होते. काल – आज असे संदर्भ विरून मानवी संस्कृतीची सलग साखळी दिसू लागते.




























































