तजेलदार चेहऱ्यासाठी लेझर टोनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मृणाल घनकुटे

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सणासुदीला किंवा घरगुती समारंभात आपला लुक कसा हटके आणि फोटोजेनिक असेल यासाठी सर्व प्रयत्न करतात. विशेषतः तरुण मुली   जरा अधिकच तयारी करतात. मग ते साडी, ड्रेस, दागिने असोत किंवा मेकअप सर्वजण काहीना काही नवीन युक्ती लढवत असतात, जेणेकरून आपण इतरांपेक्षा वेगळे कसे दिसू…मग चेहऱ्यावर ग्लो आणण्यापासून ते केसांची स्टाईल हे सर्वच आलं… आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य फुलविण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जात असून सध्या तरुण-तरुणी लेसर टोनिंग करून घेत आहेत. ही एक वैद्यकीय प्रक्रिया असून ती नेमकी काय आहे, लेसर टोनिंग कोण करू शकतं, लेझर टोनिंग किती फायदेशीर आहे याबद्दल आजच्या लेखात तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन  केले आहे.

लेझर टोनिंग ही एक सुरक्षित आणि प्रभावी, कॉस्मेटिक उपचार पद्धती आहे जी त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यास मदत करते. हायपरपिग्मेंटेशन, मेलास्मा, मुरुमांचे चट्टे, काळे डाग, सनस्पॉट्स आणि बारीक रेषा यांवर उपचार करण्यासाठी ही प्रक्रिया खूप लोकप्रिय आहे. ही उपचार पद्धती आश्वासक परिणाम देते आणि त्वचेचा रंग आणि सम-टोन सुधारते.

लेझर टोनिंग उपचार पद्धती त्वचेमध्ये उपस्थित रंगद्रव्यला (ज्यामुळे काळे डाग पडतात)  नियंत्रित करून अतिरिक्त मेलेनिन रंगद्रव्य नैसर्गिकरीत्या काढून टाकते. त्वचेवर पिगमेंटेड स्पॉट्स आणि गडद डाग काढण्यासाठी लेझर टोनिंग ट्रीटमेंट खूप फायदेशीर ठरते. सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी  उपचारांच्या अनेक सत्रांची आवश्यकता लागू शकते. याचे कोणतेही दुष्परिणाम नसून त्वरित परिणाम अनुभवता येतो, असे वांद्रे येथील डर्मटॉलॉजी व कॉस्मेटोलॉजि क्लिनिक-स्किन इसेन्सियल्सच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. रोहिणी वाढवानी यांनी सांगितले.

 व्यावसायिक स्पर्धेच्या काळात लेझर टोनिंगविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. या गैरसमजाला बळी पडून  लोक उपचार न घेता सौंदर्यातील दोष सहन करतात अथवा वाढू देतात, पण योग्य कॉस्मेटिक लेझर उपचार घेणे टाळताना दिसतात. लेझर उपचार पद्धती अतिशय सुरक्षित, गुणकारी व स्वस्त आहे. फक्त स्किन स्पेशालिस्ट किंवा डर्माटॉलॉजिस्ट यांच्याकडूनच ती करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

नेमके फायदे काय

वांद्रे येथील डर्माटॉलॉजिस्ट व कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. रोहिणी वाधवानी यांच्या मते लेझर टोनिंगचे बरेच फायदे आहेत. समाजात कॉस्मेटिक लेअर उपचारांची मागणी वाढत आहे, विशेषतः तरुण लोकांसाठी. कॉस्मेटिक ट्रीटमेंट हे अगोदर श्रीमंत लोक किंवा सेलिब्रिटी यांच्यातच जास्त लोकप्रिय होते. परंतु आता प्रगत तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता आणि नवोदित कॉस्मेटोलॉजिस्टचे प्रमाण वाढल्याने अशा प्रकारचे कॉस्मेटिक उपचार विविध कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. याचा फायदा घेत लोक स्वतःला सुंदर व आकर्षक ठेवू शकत आहे, असे रोहिणी वाधवानी यांनी सांगितले.

अशी असते प्रक्रिया

लेझर टोनिंगची प्रक्रिया कशी केली जाते याबद्दल स्किन स्मार्ट सोल्युशन्सच्या संस्थापिका आणि मेडिकल डायरेक्टर  डॉ. बिंदू स्थळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम चेहऱ्यावरची त्वचा स्वच्छ करून  टॉपिकल क्रीम लावले जाते. लेझर टोनिंगसाठी Q-Switched ND-YAG लेझर ही उपचार पद्धती वापरली जाते. या प्रक्रियेत कमी-लहान उत्सर्जनासह लेझर बीम काही मायक्रो सेकंदांसाठी त्वचेच्या प्रभावित भागावर केंद्रित केली जाते. ही लेझर बीम त्वचेच्या आत खोलवर प्रवेश करते आणि त्वचेतील लहान कणांमध्ये मेलेनिन रंगद्रव्य नष्ट करते. त्यासोबत ही लेझर उष्णता त्वचेच्या खोल थरापर्यंत पोहोचते ज्याने कॉलेजन (collagen) उत्पादनास उत्तेजित होते. कॉलेजनचे उत्पादन त्वचेच्या रिमॉडेलिंगला प्रोत्साहन देते आणि त्वचेतील बारीक रेषा आणि खुल्या छिद्रांचे स्वरूप सुधारते. टोनिंग मोडदरम्यान अतिरिक्त मेलेनिनचे हे तुटलेले लहान कण रक्तप्रवाहाद्वारे शोषले जातात आणि शरीरातून काढून टाकले जातात. एवढेच नाही तर लेझर टोनिंगचा परिणाम दीर्घकाळ टिकतो व तुम्हाला तरुण दिसणारी त्वचा मिळते.