निसर्गजागर – बिबट्या : ना घर का, ना घाट का…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> यादव तरटे-पाटील

एकीकडे गेल्या व्याघ्र संवर्धनासाठी आज अनेक प्रयत्न केले जातात. वाघांच्या संवर्धनासाठी सन 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अमलात आली. आज हिंदुस्थानात एकूण 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. मात्र तेच बिबटय़ाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यासाठी कुठलीच विशेष यंत्रणा नाही. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत बिबटय़ांची संख्या प्रचंड कमी झालीय.

मानव आणि वन्य जीव संघर्ष हा एक ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालाय. वाघ, बिबटय़ा, अस्वल यांसारख्या प्राण्यांच्या हल्ल्यात मानव दगावल्याच्या घटना आपण बघतोच आहे. तर दुसरीकडे वाघ, बिबटय़ा व इतर वन्य प्राण्यांची शिकारही मनुष्यप्राणी करतानाही आपल्याला आढळत आहे. या अस्तित्वाच्या लढाईत मात्र मुक्या जीवांच्या वाटय़ाला कायमच उपेक्षा येते हे वन्य जीवांची दुर्दैव नाकारून चालणार नाही. खरं तर निसर्गाने सजीवांची निर्मिती केली, त्या अर्थाने प्रत्येक सजीवाचे आपले स्वतंत्र महत्त्व आहे. निसर्गातील अन्न जाळे व संपूर्ण अन्न साखळीकडे आपण निरखून पाहिल्यास आपल्याला त्याची प्रचीती येईल. जंगल म्हणजे केवळ वाघ इतका संकुचित विचार करून चालणार नाही. मात्र आज जंगल आणि वाघ असंच समीकरण आज आपल्या समाजमनात रूढ झालंय. खरं तर वाघ ते वाळवी अशी संपूर्ण अन्न साखळी आणि या साखळीतला प्रत्येक सजीव महत्त्वाचा आहे. व्याघ्रकेंद्रित मानसिकतेत आजच्या घडीला अनेक सजीव झाकोळले गेले आहेत हे एक कटुसत्य आहे. व्याघ्रकेंद्रित वन्य जीव विभाग, वन्य जीव संस्था, पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटक या सगळ्या लवाजम्यात इतर वन्य प्राण्यांना फारसे स्थान नसल्याचं चित्र आहे. वाघांच्या संवर्धनाबरोबर इतर प्राण्यांचंही संवर्धन होतं या तर्काला काही मर्यादा आहेत. केवळ व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीत आपण काही अंशी हे खरं आहे असं समजू शकतो. मात्र व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त इतर जंगलात असलेल्या 30 ते 35 टक्के वाघ आणि इतर वन्य जीव राहतात. येथील वाघ आणि वन्य प्राणी सुरक्षित आहेत का? वाघांचे वाढते मृत्यू आणि वाढता मानव वन्य जीव संघर्षांची आकडेवारी यातून हे स्पष्ट होईल. खरं म्हणजे यात वन्य प्राणी आणि मानव हे दोघेही अडचणीत आले आहेत. जिथे मानवाचा आणि वाघांच्या जीवाची खात्री आपण देऊ शकत नाही, तिथे बाकी वन्य प्राण्यांचा काय थांग लागणार! शहरांचा वाढता आकार, ग्रामीण भागाच्या वनाबरोबर असलेल्या सहजीवनाची भूमिका लोप पावली असताना अशा व्याघ्रकेंद्रित व्यवस्थेत इतर प्राण्यांना थाराच नसल्याचं चित्र आहे. हिंदुस्थानातील बिबटय़ांची आज हीच अवस्था झाली आहे.

बिबटय़ा आणि मानव संघर्ष वन विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी वस्त्या व मानवाचा जंगलामध्ये वाढता वावर व अतिक्रमणामुळे माणसांवर बिबटय़ाच्या हल्ल्यांची संख्याही वाढत आहे, तर दुसरीकडे सन 2018 व 2019 या गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानात एकूण 886 बिबटे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. सन 1998 मध्ये हिंदुस्थानात बिबटय़ांची संख्या अंदाजे 45,000 इतकी होती. मात्र सन 2015 मध्ये केवळ 7,910 इतकेच बिबटे शिल्लक राहिल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सिद्ध झालंय. गेल्या 17 वर्षांत बिबटय़ांच्या संख्येत सुमारे 82 टक्के इतकी घट झाली आहे. मात्र 2018 च्या अहवालानुसार हिंदुस्थानातील सध्याची संख्या 12,852 इतकी झाली आहे.

बिबटय़ाने मनुष्यालगतच्या अधिवासात राहण्यासाठी अनुकूलन साधलं हे तंतोतंत खरं आहे. कारण मुंबई, नाशिक व इतरही विभागात सहज बिबटय़ांच्या वावर आपल्याला दिसून येतो. नाशिक विभागात तर बिबटय़ांचा जुना अधिवास संपल्यामुळे पर्याय म्हणून बिबटय़ाने चक्क उसाच्या शेतात आपले बस्तान मांडले आहे. प्रजनन करण्यापासून ते थेट शिकार करण्यासाठी   सगळ्या गोष्टी   बिबटय़ा उसाच्या      मळ्यात करायला लागलाय. मागील वर्षी अकोला जिह्यात कालव्यात पडून बिबटय़ा मृत पावल्याची घटनाही याचंच उदाहरण आहे. मानवी सहजीवनात बिबटय़ा रमला असला तरी मानवी हल्ल्यांमध्ये वाघांच्या तुलनेत बिबटय़ाचं प्रमाण सर्वाधिक आहे. कारण बिबटय़ाची मानसिकता जाणून घेणारे कुठलंच तंत्रज्ञान आजवर विकसित झालेलं नाही. बिबटय़ाच्या नैसर्गिक राहणीमानावर फरक पडला की, त्याचा फटका आपल्यालाही बसणारच हे मात्र निश्चित आहे. कारण बिबटय़ा निवांत झोपणे, शिकार करणे, शिकार केल्यानंतर निवांत खात बसणे, आळस देण्यापासून त्यांची संपूर्ण दिनचर्या मनुष्यवावरामुळे प्रभावित झाली आहे. म्हणूनच हल्ल्यांच्याही घटना वाढल्या आहेत.

एकीकडे गेल्या व्याघ्र संवर्धनासाठी आज अनेक प्रयत्न केले जातात. वाघांच्या संवर्धनासाठी सन 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अमलात आली. आज हिंदुस्थानात एकूण 50 व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र तेच बिबटय़ाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यासाठी कुठलीच विशेष यंत्रणा नाही. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत बिबटय़ांची संख्या प्रचंड कमी झालीय. बिबटय़ांची अनुकूल क्षमता भरपूर असूनही आज त्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे.

रानडुक्कर आणि काळवीट बिबटय़ाचे आवडते खाद्य आहे. म्हणून शेतकऱयांना रानडुक्कर, हरीण व नीलगाईच्या त्रासापासून वाचायचे असेल तर त्यांनी बिबटय़ाच्या संवर्धनात हातभार लावणे ही काळाची गरज आहे. सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वी वन्य प्राण्यांचा शेतपीक नुकसान करण्याइतका भयंकर हा प्रश्न चिघळला नव्हता. याचं कारण एकच की, वन्य प्राण्यांना त्यांचे असलेले अधिवास आम्ही संपवले, त्यांना लागणारं खाद्यही आम्ही पळवलं, इतकंच काय तर त्यांच्या अधिवासावर वन अतिक्रमण करून आम्ही त्यांची हक्काची जागा बळकावली. प्राणवायू, पाणी आणि अन्न याव्यतिरिक्त तिसरी त्यांची गरज नाही. त्यांच्या मूळ अधिवासात पूर्वी हे सगळं त्यांना सहज उपलब्ध होत असल्यामुळे हा प्रश्नच नव्हता. मात्र अलीकडच्या काळात बिबटय़ांच्या अधिवासात मानवाने केलेली प्रचंड ढवळाढवळ याला कारणीभूत ठरली आहे.

आज सबंध बिबटय़ांची दशा अशी झाली आहे की, जंगलात खायला अन्न नाही आणि गावाकडे आलं तर मानवाची आरडाओरड…! म्हणजेच बिबटय़ा हा ‘घरका ना घाट का, दुश्मन अनाज का’ अशीच अवस्था त्याच्यावर आली आहे. म्हणूनच बिबटय़ांच्या अधिवासात केलेला हस्तक्षेप मानवाच्या जीवावर बेतत आहे. यातून केवळ आपलं जीवनच धोक्यात आलं नाही, तर शेतीही धोक्यात आली आहे. म्हणूनच आता तरी बिबटय़ांच्या नखभर राहिलेल्या अधिवासात आम्ही आपली धुडगूस थांबवून आपलंच संवर्धन करूया. अवैध वृक्षतोड, गुरेचराई, वन जमिनीवरील अतिक्रमण, विकास प्रकल्प आदी थांबवून बिबटय़ांना त्यांच्या अधिवासात मोकळा श्वास घेऊ देऊया. म्हणजेच बिबटय़ांना गाव किंवा शहराकडे फिरकण्याची आवश्यकताच भासणार नाही. त्यातच आपले हित आहे.

(लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आहेत)

www.yadavtartepatil.com