अभिप्राय- जागतिक साहित्यकृतींचा आस्वादक

>> राहुल गोखले

देशोदेशीची केवळ भाषाच भिन्न असते असे नाही, तेथील संस्कृतीही निराळी असते. साहजिकच त्या-त्या देशात ज्या साहित्यकृती निर्माण होतात, त्यात त्या संदर्भांचे प्रतिबिंब पडलेले असते. तो काळ, तेथील घडामोडी, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ यांचे आकलन करून घेण्यासाठी त्या साहित्यकृती उपयोगी ठरतातच, अशा गाजलेल्या निवडक कथा-कादंबऱया-नाटकांचा परिचय डॉ. प्रल्हाद कुलकर्णी यांनी ‘साहित्याचे आकाश’ या पुस्तकातून करून दिला आहे.

या पुस्तकात निवडलेल्या साहित्यकृतींचा केवळ भौगोलिक व्यापच मोठा आहे असे नाही, तर काळाच्या दृष्टीनेदेखील त्यांचा पैस विस्तृत आहे. इसवी सनपूर्व 315 च्या सुमारास मनॅन्दर या ग्रीक नाटककाराच्या ‘दि गर्ल फ्रॉम सॅमोस’ या नाटकापासून 2014 साली रिचर्ड फ्लॅनागनने लिहिलेल्या व 2014 सालच्या बुकर पारितोषिकाची मानकरी ठरलेल्या ‘दि नॅरो रोड टू दि डीप नॉर्थ’ या कादंबरीपर्यंत अनेक साहित्यकृतींचा यात समावेश आहे. युगोस्लाव्हियाचा नोबेल पारितोषिक विजेता लेखक आयव्हो अँड्रिक यांनी लिहिलेल्या ‘दि ब्रिज ऑन दि ड्रिना’ या कादंबरीतऑटोमन साम्राज्याने बांधलेला हा पूल पहिल्या महायुद्धातील विध्वसांचा मूक साक्षीदार कसा ठरतो याचे वर्णन आहे. ग्वाटेमाला शहरात 1899 मध्ये जन्मलेले मिग्युएल अँजल अस्तुरियासने ‘मिस्टर प्रेसिडंट’ या राजकीय कादंबरीत हुकूमशाही आणि हुकूमशहा यांचे अंतरंग उलगडून दाखविले आहेत. नोबेल पारितोषिक विजेते जपानी लेखक यासुनारी कावाबाटा यांनी ‘दि साऊंड ऑफ दि माऊंटन‘ ही कादंबरी ओगोटा शिंगो या वृध्द पात्राभोवती असून विस्मरणाची व्याधी जडलेल्या शिंगोच्या वाढत्या वयाच्या दोलायमान अवस्थेच्या मनाचा शोध कावाबाटा घेताना दिसतात. पिएरे बाऊलेची गाजलेली ‘दि ब्रिज आान दि रिव्हर क्वाय’, पॉल स्कॉट लिखित ‘स्टेइंग ऑन’ ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरदेखील भारतातच राहिलेल्या ब्रिटिश अधिकाऱयांच्या आयुष्याचे चित्रण करणारी कादंबरी अशा साहित्यकृतींचा परिचय लेखकाने करून दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतील लेखिका नादिन गोर्डिमर यांच्या ‘माय सन्स स्टोरी’ या कादंबरीतून सोनी या कथानायकाचा मुलगा विल याच्या कथनातून वर्णविद्वेषविरोधी लढय़ाचे दर्शन घडते. लेखकाने परिचयासाठी निवडलेल्या साहित्यकृतींत असणारे विषयवैविध्य हे या लेखांना एकसुरी होऊ देत नाही. राजकीय-सामाजिक धुमश्चक्री, एकाधिकारशाही यांचे दर्शन या विविध साहित्यकृतींतून घडतेच; पण मानवी मूल्ये, मानवी भावविश्व, कधी मानवाचा आशावाद तर कधी हतबलता यांचे दर्शनदेखील घडते. लेखकाने प्रत्येक लेखात त्या-त्या लेखकाची थोडक्यात माहिती दिली आहे. हे परिचय साहित्यकृती वाचण्यास प्रवृत्त करतील.

साहित्याचे आकाश

लेखक ः डॉ. प्रल्हाद कुलकर्णी

प्रकाशक ः रावा प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे ः 200

मूल्य ः रुपये 440