
>>पुरुषोत्तम आठलेकर
लॉक डाऊन हा काही उपाय अथवा पर्याय असू शकत नाही हे आपण सर्वांनी अनुभवले आहे. पण त्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारी, खबरदारी घेणे हे अत्यावश्यक आहे. काही ठिकाणी अजूनही निष्काळजीपणा व बेपर्वाईचे वागणे दिसून येत आहे. नियम व निर्बंधांचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. सर्वांचे जीव आणि आरोग्य यांनाच अग्रक्रम देणे सध्या तरी महत्त्वाचे आहे. त्यावरून कोणीही राजकारण करू नये. कारण हा सर्वांच्या जीवन मरणाचा प्रश्न असून आपण जगलो तरच पुढच्या गोष्टी. म्हणून सर्वांचे आरोग्य व रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉक डाऊन हा पर्याय जरी नसला तरी कडक नियम व निर्बंध अमलात येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका ही खरोखरीच योग्य आहे.
त्याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. मागील एक वर्ष आणि त्याहूनही अधिक काळ केवळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना या महामारी रोगाशी झुंज देत आहे. सुरुवातीपासूनच रोगाची लक्षणे व औषधोपचार याबाबत संपूर्ण जगच अनभिज्ञ होते. केवळ संसर्ग वाढू नये या दृष्टिकोनातून सुरक्षित अंतर, तोंडावर मुखपट्टी व शारीरिक स्वच्छता या केंद्र व राज्य सरकार आणि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वे व नियमानुसार आपण अवलंब करीत होतो. तरीसुद्धा वाढणारी रुग्णसंख्या व मृतांची टक्केवारी पाहता केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन, संचारबंदीसारखे निर्णय घेण्याशिवाय पर्यायच नव्हता.
‘बिगिन अगेन’ व नियमामधील शिथिलता यामुळे सर्वसामान्य जनतेची वाढलेली बेपर्वाई आणि निष्काळजीपणा यामुळे गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात खाली आलेली रुग्णसंख्या व काही अंशी रोगावर आलेले नियंत्रण आता परत झपाटय़ाने वाढू लागले आहे. म्हणूनच यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘ब्रेक दी चेन’ या माध्यमातून नियमावली तयार करण्यात आली आणि तसे निर्बंध अमलात आणले गेले तरीसुद्धा रुग्णांची आकडेवारी ही वाढतच राहिली आहे. त्यामुळे या रोगावर मात करावयाची असेल तर स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करणे, आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करणे हेच आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. लॉक डाऊन हा काही पर्याय नाही अथवा रामबाण औषध नाही, पण त्याची अंमलबजावणी होऊ नये यासाठी तरी सर्वांनी किमान नियम व निर्बंध पाळावेत ही अपेक्षा !






























































