लेख : लोकमान्य टिळक यांची चतुःसूत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वि. ल. धारुरकर

आधुनिक हिंदुस्थानच्या उभारणीमध्ये ज्या महापुरुषांनी हिंदुस्थानच्या इतिहासावर आपली अमिट छाप टाकली व विलक्षण ठसा उमटविला त्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव अग्रक्रमाने येते. देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना हाकलून दिल्याशिवाय देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही, येथील सामाजिक आणि इतर सुधारणा होणार नाहीत हे लोकमान्य टिळकांनी ओळखले होते. त्या दृष्टीनेच त्यांनी त्यांच्या राजकारणाची चतुःसूत्री आखली होती. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुःसूत्रीच्याच जोरावर टिळकांनी त्यावेळी जहाल राष्ट्रीयत्वाची लाट निर्माण केली होती. लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षाच्या निमित्ताने….

आधी राजकीय की सामाजिक हा वाद स्वातंत्र्यापूर्वी चालू होता, परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हे ओळखले की, हिंदुस्थानातील सर्व प्रकारच्या अनास्थेला ब्रिटिशांचे प्रशासन जबाबदार आहे. जोपर्यंत आपण इंग्रजांना हिंदुस्थानातून हाकलून देणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचे चित्र आणि चरित्र बदलणार नाही. लोकमान्य ‘केसरी’मध्ये काय लिहीत आहेत. याचा तर्जुमा काढण्यासाठी ओरिएंटल ट्रान्सलेटर नेमून ब्रिटिश टिळकांची मते आजमावून घेऊ लागले. याचा अर्थ असा होतो की, टिळक काळाच्या पलीकडे जाऊन विचार करीत होते. त्यांनी ब्रिटिश सत्तेला हादरे देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या जहाल, क्रांतिकारी आणि तेजस्वी लेखनातील विलक्षण आणि गतिमान विचारदर्शन एवढे प्रभावशाली होते की, ब्रिटिशांनी त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना तीन-चार वेळा तुरंगवासाची शिक्षा दिली. तरीदेखील त्यांच्या लेखणीची धार सदैव कायम राहिली. इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा प्रकारचा खणखणीत अग्रलेख लिहिण्याचे धाडस मराठीच नव्हे तर हिंदुस्थानी पत्रकारितेत कुणी केले असेल तर ते टिळकांनीच.

लोकमान्य टिळकांच्या राजकारणाचे खरे गमक त्याच्या चतुःसूत्रीमध्ये होते. ही चतुःसूत्री म्हणजे स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार! टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना केली. आयर्लंडचे स्वातंत्र्यसेनानी डी व्हेलरा यांच्यापासून प्रेरणा घेऊन टिळकांनी हे सूत्र तयार केले होते. स्वराज्य मिळविण्यासाठी वाटेल त्या स्वरूपाचा निकराचा संघर्ष करण्याची आपली तयारी आहे, हे टिळकांनी नुसते ओळखलेच नाही तर ते कृतीतही आणून दाखवले. त्यामुळे इंग्रज सरकारचे धाबे दणाणले आणि सरकारला टिळकांच्या विरोधात कारवाई करावी लागली. परंतु मंडालेच्या तुरुंगातील कठीण असा कारावास पूर्ण केल्यानंतर टिळकांनी पुनःश्च ‘हरिओम’ या नावाचा अग्रलेख लिहून पुन्हा आपल्या संघर्षाला प्रारंभ केला.

टिळकांनी मांडलेला दुसरा विचार स्वदेशीचा. हाच विचार पुढे गांधीजींनी खादीच्या रूपाने पुढे विकसित केला. स्वभाषा, स्वसंस्कृती आणि स्वधर्म यावर टिळकांचे विलक्षण प्रेम होते. त्यामुळे त्यांनी रयतेच्या हिताचा, रयतेच्या कल्याणाचा विचार वारंवार आपल्या अग्रलेखातून मांडला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी जितके जहाल आणि परखड लेखन केले आहे तेवढे क्वचितच कोणी केले असेल. स्वदेशीचा विचार टिळकांनी जो मांडला तो आपण आता पूर्णपणे विसरलो आहोत. स्वदेशीची अंमलबजावणी करण्याऐवजी आपण परकीयांचे अंधानुकरणच करण्यातच सर्वकाही मानले. या अंधानुकरणामुळे आपले फार मोठे नुकसान झाले. एकेकाळी हिंदुस्थानमध्ये विदेशी वस्तूंचे आकर्षण होतेच, पण आता चीनसारख्या आपल्या शेजारी राष्ट्रानेसुद्धा आमची बाजारपेठ काबीज केली आहे. अशा वेळी आम्ही विदेशी वस्तूंवर बहिष्कार करणे ही महत्त्वाची बाब आहे.

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा नुसता विचारच सांगितला नाही तर तो विचार कृतीमध्ये आणला. त्यांनी डेक्कन एज्युकेशन कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे हेते. लोकमान्य टिळकांनी आपल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थांमधून जो विचार मांडला होता, तो विचार खरोखरच महत्त्वाचा होता. मग न्यू इंग्लिश स्कूल असो की फर्ग्युसन कॉलेज असो येथील विद्यार्थ्यांमध्ये क्रांतिकारक राष्ट्रवादाची बीजे त्यांनी रोवली. त्यामुळे विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे एक तेजस्वी स्फुलिंग फर्ग्युसन महाविद्यालयातून साकार झाले. टिळकांनी विजयादशमीला सुरू केलेल्या विदेशी वस्तूंच्या बहिष्कार आंदोलनात विनायक दामोदर सावरकर हे अग्रणी आणि आघाडीवर होते. टिळकांच्याच प्रेरणेने सावरकर यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये जाऊन शांतीकृष्ण वर्मा यांची भेट घेतली आणि तेथील क्रांतिकारकांचे संघटन केले.

लोकमान्य टिळकांनी लेनिनशी संपर्क करून इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानातून उलथवून टाकण्याची एक योजना तयार केली होती. त्यांच्या ‘केसरी’प्रमाणेच ‘मराठा’ या इंग्रजी पत्रात त्यांनी अनेक क्रांतिकारक विचार मांडले. महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानला कार्ल मार्क्सच्या विचारांची प्रथम ओळख कुणी करून दिली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी ‘मराठा’च्या स्तंभातून. तेव्हा टिळकांचे क्रांतिकारक विचार किती महत्त्वाचे होते आणि किती दूरदृष्टिपणाचे होते याची आपणास प्रचीती येते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण आपल्या शाळा व महाविद्यालयातून चालविले. आगरकर आणि विष्णुशास्त्र्ााr चिपळूणकर यांनी हा राष्ट्रीय शिक्षणाचा विचार राबवला. पुढे अण्णासाहेब विजापूरकर यांनीसुद्धा तळेगाव- दाभाडे येथे राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करून महाराष्ट्रामध्ये एक प्रभावशाली चळवळ सुरू केली होती. विदर्भ आणि मराठवाडय़ातसुद्धा टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक संस्था निघाल्या आणि या संस्थांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रीय चळवळीचे स्फुलिंग चेतविले.

मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर अशा लोकमान्य टिळकांनी साऱ्या हिंदुस्थानात आपल्या विचारांचे अनुयायी निर्माण केले. पंजाबमध्ये लाला लजपतराय आणि बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल यांनी जहाल राष्ट्रवादाची बीजे हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात लावली. केसरी, गायकवाड वाडा आणि पुणे शहर हे त्यावेळच्या हिंदुस्थानी राजकारणाचे केंद्रस्थान बनले ते लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने. आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि कर्तुत्वाने उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानात  राष्ट्रीयत्वाची लाट निर्माण करणारे लोकमान्य टिळक महाराष्ट्राला त्यामुळे ललामभूत ठरले.

(लेखक आगरताळाच्या त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आहेत)