
>> दिलीप जोशी
दिवस गणेशोत्सवाचे आहेत. महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात सुरू झालेला आणि नंतर देशात आणि विदेशातही पोचलेला सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी अधिकाधिक थाटामाटाने होताना आपण सारेच पाहत आलो आहोत. ठिकठिकाणची गणेशोत्सव मंडळे, संस्था यांची या उत्सवाची तयारी जवळ जवळ वर्षभर सुरू असते. दहा दिवसांच्या उत्सवासाठी बरंच नियोजन करावं लागतं. उत्सव जेवढा प्रसिद्ध, तेवढी तिथे येणाऱयांची गर्दी जास्त. त्यामुळे सरकारी यंत्रणांच्या सहभागासह सारे नियोजन होत असते.
या वर्षी मात्र या उत्सवाचा अमाप उत्साह कुठेच दिसणार नाही. कारण ‘कोरोना’च्या विघ्नाने सारं जग व्यापलं आहे. गणपती पूजन श्रद्धेने होईलच, पण उत्सवी जल्लोष साजरा करण्यासारखी परिस्थितीच नाही. नयनरम्य सजावट, भव्य मूर्ती, अनेक प्रकारचे कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, हार-फुलांपासून प्रसादाची रेलचेल ही सारी लगबग आणि दहा दिवसांचं ते ‘मंतरलेलं’ वातावरण या वर्षी पाहायला मिळणार नाही हे खरंच. कोरोनाग्रस्त जगाची या पृथ्वीव्यापी विघ्नातून मुक्तता व्हावी अशीच प्रार्थना सर्वजण गणरायाकडे करतील. ‘विघ्नविनाशक मोरया’ भक्तांना आत्मबळ देईल, तेही मोलाचं असेल.
यानिमित्ताने आपण गणरायाच्या जागतिक रूपांचं ‘दर्शन’ घेण्याचा प्रयत्न शब्दांतून करूया. अगदी दक्षिण अमेरिकेतून ते मेक्सिको आणि हिंदुस्थानच्या पूर्वेला असलेल्या कंबोडिया, इंडोनेशिया, थायलंड, चीन, तिबेट, जपान या देशात तसेच शेजारच्या नेपाळ, श्रीलंका येथे आणि मध्यपूर्वेतील इराणपासून ते इतर अनेक देशात परंपरेने गणेश पूजन केलं जातं ही परंपरा शेकडो वर्षांची आहे.
हिंदुस्थानातून शतकांपूर्वीच गणेश पूजनाची पद्धत इतर देशांत गेली. त्यातही आग्नेय आशियातील इंडोनेशिया, फिलिपाईन्स, कंबोडिया, थायलंड, म्यानमार इत्यादी देशांत आजही गणपती पूजनाला महत्त्व आहे.
या सर्व ठिकाणच्या गणेशाची रूपं अनेक आहेत. आपल्याकडेही कुशल मूर्तिकार विविधरूपी गणेशांचा आविष्कार घडवतात. सुंदर देखावे सादर केले जातात. त्यातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेशही दिला जातो. श्रीगणेश ही ज्ञानाची देवता. त्यामुळे एखाद्या कार्याचा आरंभ होण्याला ‘श्रीगणेशा’ होणे असंही म्हटलं जातं. व्यासांनी महाभारत कथन केलं आणि साक्षात गणपतीने ते लिहून घेतले, अशीही पुराणकथा आहे.
असा हा गणाधीश गणेशोत्सवाच्या काळात ‘गण’ म्हणजे लोकांचा, जनसामान्यांचा कैवारी म्हणून येतो. घरी किंवा सार्वजनिक गणपती येणार असतो तेव्हा त्याच्या दीड ते दहा दिवसाच्या वास्तव्याची आणि स्वागताची जय्यत तयारी होते. सारा महाराष्ट्र आणि देशविदेशातील मराठी जनांसह अनेक जण गणरायाच्या या उत्सवात तनमनधनाने सहभागी होतात.
विदेशात ‘गणपती’च्या मूर्ती अनेक ठिकाणी आहेत. तिथल्या एखाद्या कलादालनात अचानक गणपतीचं ‘दर्शन’ झालं तर? मृणालिनी नायक सांगतात, ‘‘पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. कामानिमित्त अमेरिकेत होते तेव्हा एकदा वॉशिंग्टन या राजधानीच्या शहरातील आर्ट म्युझियम पाहायला गेले. आसपास बहुतेक अमेरिकन आणि जगभरचे पर्यटक होते… आणि त्या भव्य म्युझियममधल्या एका दालनातून दुसऱया दालनात जाता जाता अचानक एक धातूची सुबक गणेशमूर्ती दिसली! अमेरिकेत ‘आपलं कुणी भेटलं की, अत्यानंदाने ‘हाय’ करतात तशी आपुलकीची भावना मनात दाटून आली आणि मनोमन होत जोडत त्या मूर्तीला हळूच स्पर्श केला!’’
असं हे आपलं सांस्कृतिक संचित! विदेशात असताना आपल्या संस्कृतीशी निगडित असं काही दिसलं की, विलक्षण आनंद होणं. साहजिक असाच अनुभव महेश नाईक यांनाही आला. इंडोनेशियातील बाली बेटावर प्रवेशद्वाराशी गणपतीची मूर्ती असते आणि फुलांचा हार घालून रोज पूजा केली जाते. महेश अझरबैझानला गेले होते. तिथेही त्यांना राजधानी बाकूपासून जवळच असलेल्या एका ‘फायर टेम्पल’मध्ये गणपतीची मखरात बसवलेली मूर्ती आढळली. या लेखात तोच फोटो दिला आहे. गणपतीच्या अशा विदेशात अचानक झालेल्या दर्शनाने तेही सुखावले.
असा हा जनमनात वसलेला गणराय. यावेळी त्याचं उत्सवी स्वागत आपण करू शकत नाही, पण मनोमन त्याची प्रार्थना करू शकतो. गणेशाची आरती करताना सुरुवातीलाच ‘सुखकर्ता, दुःखहर्ता’ असं म्हणतो. हा दुर्धर कोरोना काळ लवकरच संपावा अशी मनोकामना व्यक्त करताना मनाच्या मखरातील गणपतीचा उत्सव साजरा करूया.


























































