ठसा – मधुकर जोशी

1497

>> माधव डोळे

रिमझिम झरती श्रावणधारा… एका तळ्यात होती बदके पिले सुरेख…आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे..अशीच आमुची आई असती… ही गाणी पूर्वी रेडिओवरून लागायची तेव्हा प्रत्येकाचे कान आणि मन तृप्त होऊन जायचं. अर्थगर्भ शब्द, कुणालाही गुणगुणता येईल अशी सोपी चाल, यामुळे अशा प्रकारची अनेक गाणी म्हणजे मराठी माणसाच्या जणू जगण्याचा आधारच. सध्याच्या डिजिटल युगातही कधीमधी ही गाणी ऐकायला मिळतात तेव्हा आपण नकळत भूतकाळात जातो. करोडो मराठी रसिकांचं मन ‘श्रीमंत’ करणारी ही अजरामर गाणी लिहिली आहेत डोंबिवलीचे कवी व गीतकार मधुकर जोशी यांनी. शे-दोनशे नव्हे तर तब्बल पाच हजार गाण्यांचे ते धनी आहेत. लौकिकदृष्ट्या आयुष्य त्यांनी मोठ्या कष्टात काढलं. अखेरच्या श्वासापर्यंत भाड्याच्या लहानशा खोलीत ते राहिले. अबकारी खात्यात नोकरी करून ते १९८८ मध्ये निवृत्त झाले. पेन्शन हाच आर्थिक आधार. त्यांनी लिहिलेली लोकप्रिय गाणी गाऊन मराठी वाद्यवृंदातील गायक कलाकार बNयापैकी श्रीमंत झाले. त्यांना मान-सन्मान मिळाला. पण या गीतांचे कर्ते मात्र कायम उपेक्षित. डोंबिवली ही खरी तर महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असं अभिमानानं सांगितलं जातं. पण याच गावात एवढा मोठा कवी कायम उपेक्षेचं जीणं जगला, हे मनाला वेदना देणारं आहे. ते कायम प्रसिद्धी पराङ्मुख होते. हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात दोन-चार गाणी हीट झाली तर लगेच ‘सेलिब्रिटी’ अशी उपाधी मिळते. पण मधुकर जोशी यांनी तर आयुष्यभर मराठी भाषेची आणि सरस्वतीची उपासना केली. दुःख, वेदना, उपेक्षा आणि गरिबी याचं त्यांनी कधीही भांडवल केलं नाही. डोंबिवलीच्या आयरे रोडवरील हेरंब इमारतीमध्ये ते राहात होते. ही बििंल्डग रिडेव्हलप करायची होती. अनेक भाडेकरूंनी घरं रिकामी केली. पण जोशी मात्रं गेले नाहीत. त्यांना घरमालकानं नोटीस पाठवली. त्यावेळी त्यांना काही पत्रकारांनी विचारलं होतं. तेव्हा ते म्हणाले, जागेसाठी खूप पैसे लागतात. ते कुठून आणू? डिपॉझिट व भाडं खूप सांगतात. माझ्या तुटपुंज्या पैशात ते शक्य नाही. माझ्यापेक्षा ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची घरंही मोडकी होती. तीन मुलं, दोन मुली, पत्नी असा संसार सांभाळताना त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. पण कधीही त्यांनी तक्रार केली नाही. कारणं काहीही असली तरी सरस्वतीच्या या प्रामाणिक पुजाNयाचा यथोचित सन्मान व्हायला हवा होता. मधुकर जोशी यांची राहणी अतिशय साधी होती. कुठेही मोठेपणाचा आव नव्हता. त्यांनी केवळ भावगीते विंâवा भक्तिगीतेच नाही तर बालगीतेही लिहिली. आकाशवाणीवर २५ संगीतिका सादर केल्या. गीत शिवायन, गीत अथर्वशीर्ष, गीत रामरक्षा, गीत महाभारत या त्यांच्या रचनाही गाजल्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या महान कवीचं विशेष कौतुक केलं होतं. त्याशिवाय यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गजांनीदेखील त्यांचा सन्मान केला होता. डोंबिवलीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी तर घरी जाऊन कवी मधुकर जोशी यांचा सत्कार केला होता. पण शेवटपर्यंत त्यांना सरकारी कोट्यातील घर मिळालं नाही. संत साहित्याची त्यांना विशेष ओढ होती. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी अतिथी प्राध्यापक म्हणून काम केलं. तुकाराम गाथेचं त्यांनी संपादन केलं. तुकाराम गाथेची चारशे हस्तलिखितं त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. त्याशिवाय ज्ञानेश्वरी, नाथ संप्रदाय, रामदास स्वामी, संत गुलाबराव महाराज या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं. तंजावर येथील सुमारे साडेतीन हजार मराठी हस्तलिखितांचं संशोधन मधुकर जोशी यांनी केलं होतं. संत साहित्य तसेच अध्यात्मावर त्यांचे दोनशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मधुकर जोशी हे केवळ गीतकार विंâवा कवी नव्हते तर त्यांनी संत साहित्यात मोठी कामगिरी केली आहे. पीचडी तसंच एमफीलचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. गजानन वाटवे यांच्यापासून ते सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, माणिक वर्मा, अरूण दाते, आशा भोसले अशा अनेक नामवंत गायकांनी मधुकर जोशी यांची गाणी गायली. मराठी सारस्वतांचा हा उपासक आता काळाच्या पडद्याआड गेला असला तरी जेव्हा रिमझिम झरती श्रावणधारा.. या गाण्याचे सूर कानावर पडतील तेव्हा मनाचे डोळेही चिंब होतील.

आपली प्रतिक्रिया द्या