
>> राज मेमाणे
मराठे आणि पेशव्यांच्या विस्तीर्ण प्रवासाचा इतिहास विषद करणारी रोजनिशी म्हणजेच पुणे पुरालेखागार असं म्हणायला हवं. इतिहास संशोधकांची पंढरी असणाऱया या दालनात प्रामुख्याने शनिवारवाडय़ातील कागदपत्रे असून त्यात पेशवा रोजकीर्द, प्रांत अजमास, पागा पथके लष्कर , चिटणीस दप्तर, जमाव दप्तर, घडणी विभाग या विभागातील कागदपत्रे आहेत. यालाच पेशवा दप्तर असे म्हणतात.
मराठय़ांच्या इतिहासाचे सर्वात मोठे दालन तुम्हाला ठाऊक आहे का? असा जर प्रश्न कुणी विचारला तर बहुतेक जणांना याचे उत्तर देता येणार नाही. याचं उत्तर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला पुणे पुरालेखागाराच्या इमारतीचा आणि त्याच्या आत दडलेल्या मराठय़ांच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱया सुमारे तीनशे वर्षे जुन्या, कोटय़वधी दस्तऐवजांचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. कारण ते जाणून घेतल्याशिवाय मराठय़ांच्या इतिहासात डोकावताच येत नाही. इथे असणारे बहुतांश दस्तऐवज हे मोडी लिपीतील असून या मोडी लिपीतील दस्तऐवजाच्या दप्तरखान्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. सदरील दप्तर हे दुसऱया बाजीराव पेशव्यांच्या कारकीर्दीपर्यंत शनिवार वाडय़ात होते. पुढे शनिवार वाडय़ाला आग लागल्यानंतर पेशव्यांचे कारभारी चिंतोपंत देशमुख यांच्या आदेशानंतर ते दप्तर गोविंदराव काळे व बाबाजी नाईक यांच्या घरी ठेवले गेले. पुढे पेशवाईचा अस्त होऊन कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावर मुंबई प्रांताचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्या आदेशाने ते दप्तर अनुक्रमे आधी खाजगीवाले यांच्या वाडय़ात व पुढे कालांतराने नाना फडणीस यांच्या नाना वाडय़ात हलविण्यात आले. परंतु नाना वाडय़ात ते दप्तर सुरक्षित नसल्याचे पत्र दक्षिण विभागाच्या महसूल आयुक्तांनी 7 जुलै 1877 रोजी मुंबई शासनाला पाठविले. त्यात त्यांनी लिहिले की, सदरहू दप्तर हे नाना वाडय़ात तितकेसे सुरक्षित नाही. कारण हा वाडय़ाचा बहुतांश भाग हा लाकडी असून आग वगैरे लागून हे अमूल्य दप्तर काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकते. सबब आपण या दप्तरासाठी लवकरात लवकर एका नवी व सुरक्षित इमारत बांधून घ्यावी अशी शिफारस केली. त्यानुसार पुढे इंग्रजांनी समिती नेमून नवी इमारत बांधून घेतली. ही इमारत 1 सप्टेंबर 1891 रोजी बांधून पूर्ण झाली. तिच्या बांधकामाचा खर्च सुमारे दीड लाख रुपये इतका आला. पेशवे दप्तर हे नाना वाडय़ातून इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच म्हणजे 6 फेब्रुवारी 1890 रोजी नवीन इमारतीत हलविण्यात आले. आधी इमारतीला एलीनेशन ऑफिस नंतर पुणे पुराभिलेखागार आणि त्यानंतर पुणे पुरालेखागार असे नामकरण झाले. आता आपण पुणे पुरालेखागारात असलेल्या कागदपत्रांचे विभाग आणि त्यातील कागदपत्रांची विस्तृतपणे माहिती पाहूयात.
पुणे पुरालेखागारात प्रामुख्याने शनिवारवाडय़ातील कागदपत्रे असून त्यात पेशवा रोजकीर्द, प्रांत अजमास, पागा पथके लष्कर, चिटणीस दप्तर, जमाव दप्तर, घडणी विभाग या विभागातील कागदपत्रे आहेत. यालाच पेशवा दप्तर असे म्हणतात. त्याशिवाय जी स्वतंत्र दप्तरे इथे त्यात छत्रपती थोरले शाहू महाराज, सातारा यांचे दप्तर, सातारकर महाराज (प्रतापसिंह महाराज)यांचे दप्तर, आंग्रे दप्तर यांचा समावेश होतो. या पुरालेखागारात सुमारे 39000 रुमाल असून त्यातील मराठी कागदपत्रांचे रुमाल 29463, गुजराथी विभाग 644, इंग्रजी विभाग 10518 इतकी संख्या आहे.
मोडी कागदपत्रे विभाग :
शाहू दप्तर : छत्रपती शाहू महाराज सातारा यांनी दिलेली इनामे, वतने, तसेच शाहू महाराजांशी संबंधित पत्रव्यवहार यात पाहता येतो.
पेशवे रोजकीर्द : याविभागात पेशव्यांच्या रोजच्या जमा खर्चाची नोंद आहे.
प्रांत अजमास : यामध्ये राज्यकारभार करताना होणारे विविध खर्च, तसेच जमिनींचे हिशेब, ताळेबंद इत्यादींची नोंद आहे.
पागा पथके लष्कर : पेशवे काळात लढाया या प्रामुख्याने मैदानात समोरामोर होत असत. त्यासाठी आवश्यक असणारे घोडदळ, पायदळ, तोफखाना इत्यादी विभागातील खर्चांचा हिशेब यात पाहायला मिळतो.
चिटणीस दप्तर : यातील कागदपत्रांच्या आधारेच इतिहासकार गो.स.सरदेसाई यांनी पेशवे दप्तर खंड या नावाने एकूण 45 खंड प्रकाशित केले. त्यातून मराठय़ांच्या इतिहासावर मोठय़ा प्रमाणावर संशोधन करता आले.
जमाव दप्तर : जमाव दप्तर म्हणजे कंपनी सरकारने नेमलेल्या इनाम कमिशनने मराठी राज्यातील पुणे, नगर, कोकण, मोगलाई, हिंदुस्थान, सोलापूर इत्यादी प्रांतातून जमविलेले दप्तर होय. यामध्ये या सर्व प्रांतातील छोटय़ा मोठय़ा गावाविषयी कागदपत्रे पाहता येतात.
इनाम कमिशन : यामध्ये ब्रिटीशांनी मराठा कालखंडात व्यक्तिगत, देवस्थाने किंवा इतर कोणत्याही प्रकारची जी इनामे दिली गेली होती, त्यांची चौकशी करून ती इनामे पुढे चालू ठेवायची का नाही यासाठी या इनाम कमिशनची नेमणूक केली होती. त्यानुसार या कामिशनने त्या त्या इनामशी संबंधित व्यक्तींना बोलावून त्यांच्याकडून इनामाची अस्सल कागदपत्रे मागवून घेतली तसेच त्यांच्याकडून हकीकती लिहून घेतल्या त्याचे कागद या विभागात आहेत. याशिवाय जी स्वतंत्र दप्तरे आहेत त्यामध्ये
आंग्रे दप्तर : मराठय़ांचे आरमार ज्यांनी समर्थपणे सांभाळले त्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे हे दप्तर असून त्यात मराठय़ांचे आरमार, पश्चिम किनाऱयावरील किल्ले इत्यादींची माहिती मिळते.
सातारा महाराज दप्तर : हे दप्तर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कालातील असून त्यात इसवी सन 1818 ते 1848 या कालखंडातील कागद आहेत. इंग्रजांनी सातारा गादी कशाप्रकारे खालसा केली याची माहिती यात मिळते. याशिवाय घडणी, डेक्कन कमिशन एजंट दप्तर, पैमाष इत्यादी विभागातूनही मोठया प्रमाणावर मोडी कागदपत्रे पाह्यला मिळतात.
यातील प्रत्येक दप्तराचा स्वतंत्र विभाग आणि फेरीस्त आहे. आता या कागदपत्रांमध्ये असणारा मराठय़ांचा देदिप्यमान इतिहास तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला मोडी लिपी येणे आवश्यक आहे. ती आल्याशिवाय खऱया अर्थाने मराठय़ांच्या इतिहासाच्या या दालनात डोकावता येणार नाही. इतिहास हा अस्सल साधनांवर सांगितला जातो, सोशल मीडियावरील संदर्भहीन पोस्ट्सवर नाही. इतिहासप्रेमींना या ऐतिहासिक खजिन्याची माहिती व्हावी यासाठी हा लेखप्रपंच.
(लेखक इतिहास संशोधक व मोडी तज्ञ आहेत)





























































