लेख – मुद्दा – मराठी संस्कृतीचा आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील कुवरे

आपल्या हिंदुस्थानात अनेक भाषा बोलल्या जातात. मराठी अभिजात आणि समृध्द ,पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम भाषा आहे. म्हणूनच ‘मराठी असे आमुची मायबोली’ असे आपण म्हणतो, परंतु महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षात मराठी भाषेच्या भवितव्यासाठी काय साधले?आज मराठी भाषेची अवस्था काय? मराठी भाषा दीन होत चालली आहे. काही वर्षांत मराठी भाषा इतिहासकालीन भाषेप्रमाणे इतिहासात जमा होणार तर नाही ना? आपण आपल्या मराठीचे अस्तित्वच गमावून बसणार नाही ना? या विचाराने मन अस्वस्थ होते. मराठीला वाचविण्यासाठी काय करावे?

मराठी मातृभाषा असूनही मराठी भाषिकांचा ओढा शिक्षण व पर्यायाने इंग्रजी भाषेकडे वळू लागला आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेचे प्रभुत्व वाढणार की काय? अशी भीती वाटू लागली आहे. कारण इंग्रजी शाळा वाढत असून मराठी शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे मराठीचा गोडवा विरणार की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. इंग्रजी भाषा जरूर शिकावी, त्याबद्दल वाद नाही. इंग्रजी जागतिक पातळीवर व्यावहारिक भाषा आहे, परंतु ही भाषा शिकणाऱयांना मराठी भाषा माहीत झाली नाही तर काय उपयोग?

मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी आपली प्रयत्नशीलता आणि प्रयोगशीलता कमी पडत आहे अशी अवस्था नाकारता येत नाही. खरे तर मराठी भाषा संवर्धनाचे अनेक मार्ग खुले झाले आहेत. खरे तर आपल्या रोजच्या जीवनात मराठी भाषेचा उपयोग होऊ शकतो का? होत नसेल तर तो होण्याइतका मराठी भाषा समृद्धीसाठी मनापासून प्रयत्न करणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. तसे न करता नुसताच मराठी अस्मितेचा घोष करत बसतो. अलीकडे संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान मराठीत येत आहे, परंतु सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगण्याची आणि तिची जोपासना करण्याची!

मराठी भाषा ही जिवंत राहणार आणि आपण ती जिवंत ठेवणार आहोत हे प्रथम गृहीत धरायला हवे. मुळात कोणतीही भाषा टिकणे आणि तिचा विकास होणे म्हणजे काय तर प्रथम संभाषण, वाचन आणि लेखन या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपण आपली मराठी भाषा हिरीरीने बोलायची. जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी बोलली गेली पाहिजे. आपली भाषा बोलायला कसला संकोच! त्यात कोणता आहे संकुचितपणा! आपण मराठीत बोलत राहायचे. कारण मराठीचे अस्तित्व जपणे हेच आपले कर्तव्य आहे.

मराठी भाषा ही मराठी संस्कृतीचा आधार आहे. मराठी ज्ञानभाषा आणि न्यायव्यवहाराची भाषा बनविण्यात सरकारला काही प्रमाणात यश आले. मात्र, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजून प्राप्त झाला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, पण अजून यश आलेले नाही. हा दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातील एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत तामीळ, तेलुगू, कन्नड, संस्कृत, मल्याळम आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा त्या भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर उमटवली जाते तेव्हा मराठी संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी अभिजात दर्जाचा खूप मोठा उपयोग होईल.

मराठी भाषा खरोखरच समर्थ व्हायची असेल तर त्याविषयीचा मराठी माणसाचा दृष्टिकोन बदलायला हवा. तसेच सरकारचे सर्व व्यवहार हे मराठी भाषेतून झाले पाहिजेत. तसेच घराघरांतून मराठीकरण करण्यासाठी मराठी भाषेचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. म्हणजे आज मराठी भाषेची जी दुरवस्था झाली आहे, ती निश्चितपणे दूर होऊन पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषेत ‘अमृताशी पैजा जिंकण्याचे’ सामर्थ्य निर्माण होईल.