लेख – मराठी भाषा संवर्धन, सर्वांची जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

वर्षभरात मराठीतले काही वाचण्याचा संकल्प करा. किमान पाच-सात पुस्तके वाचा. वाचून जवळच्याला प्रवृत्त करा. काही चांगले ग्रंथ खरेदी करा. वाढदिवसाला, लग्न समारंभात पुस्तकांची भेट द्या. इंग्रजी माध्यमातून मुलाच्या शिक्षण असेल तरी त्यांना मराठीपासून तोडू नका. शाळा, कॉलेजेस, वाचनालये यातूनही कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, जेणेकरून वाचक-विद्यार्थी-मराठीशी जोडला राहील. मराठी भाषेची जपणूक, संवर्धन म्हणजे काय डोंगर, पहाड, चढणे आहे का? अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून आपल्या कृतीतूनच ते होत असते. जे तुम्ही, आम्ही, सर्वांनी मिळून करायचे आहे.
महाराष्ट्रात तसेच देशभरात जसे मध्य प्रदेश, कोलकाता, आंध्र

प्रदेश, गुजरात, गोवा, दमण-दिव, कर्नाटक, दिल्ली ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसांचा रहिवास आहे, मराठी मंडळे, महाराष्ट्र मंडळे आहेत त्या त्या ठिकाणी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. काही शाळा, कॉलेजेस, वाचनालयामध्ये मराठी भाषा दिवस साजरा होतो. त्यानिमित्ताने मराठी नाटके, मराठी चित्रपट, निबंध स्पर्धा, कविसंमेलन, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. मराठी भाषेचा गौरव केला जाईल असे अनेकविध कार्यक्रम आयोजित करून आपण मराठी भाषेवरच आपले प्रेम व्यक्त करत असतो.

पंधराशे वर्षांची परंपरा आपल्या मराठी भाषेला आहे. जगभरातल्या मोठय़ा भाषिकांच्या बोलणाऱयांचा समूह आहे, त्यात मराठीचा पंधरावा नंबर लागतो, तर नऊ कोटी माणसांची मातृभाषा मराठी आहे.

अमेरिका, सिंगापूर, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, माँरिशस आदी ठिकाणच्या देशातही मराठीत बोलले जाते. अनेक ठिकाणी मराठी मंडल, महाराष्ट्र मंडळ आहेत. मराठी सणवार, उत्सव ते मोठय़ा उत्साहाने साजरे करत असतात. मराठी साहित्य संमेलने भरवत असतात. मराठी पुस्तकाची प्रदर्शने भरवतात. आपल्याकडून साहित्यिक, कलाकारांना बोलावले जाते. अनेक ठिकाणी गजानन महाराज, गणपती, दत्तात्रयाची मंदिरे आहेत. गणेशोत्सव, गजानन महाराजांचा प्रकट दिन, दत्त जयंती तसेच शिवजयंती उत्सव साजरे केले जातात. व्याख्याने आयोजित करतात. परदेशात राहून मराठी भाषा, सणवार त्यांना सोडावी असे वाटले नाही. आपण मात्र –

लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी!
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!!
असे म्हणूनच धन्यता मानतो.

पण खरा प्रश्न हा आहे की, असे एक दिवसच फक्त मराठीविषयी प्रेम दाखवून काही साध्य होणार का? त्यासाठी आपण व्यक्तिशः काही योगदान देणार का? याचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. मी स्वतः मराठी असून मराठीला किती न्याय देतोय हेही तपासणे गरजेचे आहे. खरं म्हणजे आता आपल्यालाच मराठीचा विसर पडत चाललाय, असे काही तरी होऊन राहिले आहे. प्रगतीसाठी इंग्रजी भाषा आम्हाला महत्त्वाची वाटते. प्रगती जरूर करा, पण त्यासाठी मराठीचा अव्हेर करू नका. गेल्या काही वर्षांत आपली मुलं इंग्रजी माध्यमातून शिकावी हा दृष्टिकोन फारच वाढत चाललाय. त्यामुळेच सुरुवातीपासूनच इंग्रजीत ओळख होत असल्याने मुले आता मराठीत बोलायला अडखळू लागले आहेत. त्यांच्या शिक्षणाची सुरुवातच अ, आ, ई ऐवजी ए, बी, सी, डी, ममी-पप्पापासून होते. इंग्रजी माध्यम शाळेत मुलं शिकतात ही आईवडिलांना प्रतिष्ठsची गोष्ट वाटू लागली आहे आणि हीच मराठीसाठी धोक्याची घंटा आहे म्हटल्यास खोटे ठरणार नाही. येणारी पिढीच जर मराठीचा वारसा जपणार नसेल तर कसे होणार?

दैनंदिन वापरात अजूनही आपण इंग्रजीलाच प्राधान्य देतो. साधं उदाहरण घ्या. रोज आपण मोबाईलचा वापर करतो, किती जणांचे की बोर्ड मराठीत आहे? किती जण मोबाईलवर व्हॉट्सऍपवर संवाद साधण्यासाठी मराठीचा वापर करतात? मेसेज पाठवतो तेही इंग्रजीतच, काय तर मराठीत कठीण वाटतं म्हणे! फोनवर बोलताना सुरुवात हॅलो… हॅलो… ने. नमस्कार म्हणून फारच कमी लोक बोलतात, गावी, परगावी आपण रिक्षा, टॅक्सी करतो, त्याच्याशी बोलताना सरळसरळ हिंदीचा वापर करतो, ती तोडकी मोडकी का असेना. मराठीत बोलले तरी चालेल. तो मराठीला धरून आहे. तुम्हीच मराठी सोडतात. मराठीत बोलायला आपल्याला लाज का वाटावी?

छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून आपण खूप काही करू शकतो. मराठीत खूप मोठी साहित्य संपदा आहे. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, बाबासाहेब पुरंदरे, ना. स. इनामदार, शिवाजी सावंत आदी अनेक साहित्यिकांचे साहित्य आहे ते वाचा. अनेक साहित्यिकांचे कथा, कादंबऱया, काव्यसंपदा, ललित साहित्य, चरित्रे आत्मचरित्रे आहेत ते वाचा. शिवचरित्र वाचा. दासबोध वाचा, तुकाराम गाथा वाचा, अमृतानुभव, भावार्थ दीपिका, योगवशिष्ठ वाचा. वर्षात हजारांच्या संख्येने पुस्तके, शेकडो दिवाळी अंक प्रसिद्ध होतात यातले आपण किती वाचतो? वर्तमानपत्र किती जण वाचता? कुठल्या वाचनाला प्राधान्य देतो? वर्षभरात मराठीतले काही वाचण्याचा संकल्प करा. किमान पाच-सात पुस्तके वाचा. वाचून जवळच्याला प्रवृत्त करा. काही चांगले ग्रंथ खरेदी करा. वाढदिवसाला, लग्न समारंभात पुस्तकांची भेट द्या. इंग्रजी माध्यमातून मुलाच्या शिक्षण असेल तरी त्यांना मराठीपासून तोडू नका. शाळा, कॉलेजेस, वाचनालये यातूनही कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, जेणेकरून वाचक-विद्यार्थी-मराठीशी जोडला राहील. मराठी भाषेची जपणूक, संवर्धन म्हणजे काय डोंगर, पहाड, चढणे आहे का? अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून आपल्या कृतीतूनच ते होत असते. जे तुम्ही, आम्ही, सर्वांनी मिळून करायचे आहे. संस्कार कृतीतून होतात. आपल्या हातात मोबाईल पाहून मुलगा मोबाईल मागत असेल तर तुम्ही हातात पुस्तक घ्या, ते नक्कीच पुस्तक मागतील.

निरनिराळ्या कार्यालयात कार्यालयीन कामकाज मराठीत व्हावे म्हणून शासनाने निर्णय घेतले आहेत. सक्तीचे केले आहे, पण त्यातही प्रगती नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणच्या पाटय़ा मराठीतच हव्यात हा आग्रह धरला पाहिजे. ज्याला महाराष्ट्रात रहिवास करावयाचा त्याला मराठी भाषा अवगत असावी.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे. हा दर्जा ज्या भाषेला दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्याला भरीव अनुदान मिळते. मराठी भाषेला ते मिळायलाच हवे. तो दर्जा मिळेलच ही अपेक्षा करूया!