पुरुषी रंग फॅशनचे!

347

>> पूजा पोवार

पुरुषांची फॅशन… खूपच कमी बोललं जातं यावर. आज पुरुषांची फॅशन केवळ मोजक्या रंगात किंवा शर्ट–पँटमध्ये अडकून राहिलेली नाही. पाहूया पुरुषी फॅशनचे रंग.

बटण डाऊन शर्ट

शर्टला कॉलरच्या दोन्ही बाजूंना बटण असतात. याचे बटण लावल्यानंतर कॉलर खाली पडल्यासारखं दिसतं. जिन्स तसेच फॉर्मल, कॅझ्युअल लूकसाठी हे शर्ट वापरू शकता. त्यामुळे पार्टी, समारंभासाठी बटण डाऊन शर्ट एक वेगळाच लूक देतात. चिनोज, लिनन, ब्लेझर, लोफरवर वापरता येतात.

लाईट वॉश डेनिम

वर्षानुवर्षे डेनिम वापरले जाते. सध्याच्या फॅशनच्या ट्रेंडनुसार साधा, पण क्लासिक लूक डेनिममध्ये फारच खुलून येतो. लाईट ब्ल्यू आणि इंडिगो हे रंग डेनिममध्ये जास्त वापरले जातात. टी-शर्ट किंवा शर्टवर डेनिम घातले की ट्रडिशनल लूक येतो.

पोलो टी-शर्ट

पोलो टी-शर्टला कॉलर आणि बटण असतात. हा कॅझ्युअल पोषाख आहे. आवडीप्रमाणे हव्या त्या रंगाचे पोलो शर्ट प्रत्येक जण वापरतातच.

कॅझ्युअल कपडे

टी-शर्ट आणि कॅझ्युअल शर्ट नवीन ट्रेंडमध्ये व्ही नेकलाइन टी-शर्ट वापरले जातात. साधारणतः मुलं गोल गळय़ाचे टी-शर्ट जास्त वापरतात, मात्र आता व्ही गळय़ाचे प्लेन टी-शर्ट जास्त वापरले जातात. शिवाय त्यावर कोणत्याही प्रकारचा लोगो किंवा प्रिंट नसते. यामध्ये हलका पिवळा, शेवाळी, आकाशी, लाल, चॉकलेटी, राखाडी रंगांमध्ये हे टी-शर्ट वापरू शकता.

स्लिम फिट चिनोज

उन्हाळय़ात जिन्सवर चिनोज वापरता येतात. जिन्सवर चिनोज छान दिसतातही. ऑफ व्हाईट, लाल, पिवळा अशा रंगांचे चिनोज सर्रास मिळतात. ते पोलो टी-शर्ट, बटण डाऊन शर्टवर बूट आणि लोफर असा लूक उठावदार दिसतो. सध्या याचा ट्रेंडही सुरू आहेच.

डेनिम सर्वात आवडते

या वर्षी डेनिमचे वेगवेगळय़ा प्रकारचे ट्रेंड बघायला मिळतात. डेनिम हे तरुणांमधील सर्वात आवडते फॅब्रिक आहे. कट, वॉश आणि सफाईदारपणा यामुळे डेनिम जॅकेट्स आणि जिन्स या पोषाखामुळे तरूण चारचौघात उठून दिसतात. हे अत्याधुनिक डेनिम्स डेनिम पॅच, पिन आणि स्ट्रप्स यांसह सुशोभित केले जातात.

लिनन ब्लेझर

प्रत्येकाच्या कपाटात एकतरी लिनन ब्लेझर असलेच पाहिजे. जिन्स, टी-शर्ट, लोफरवर लिनन ब्लेझर परिधान केल्यास व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसायला मदत होते. याचं वैशिष्टय़ असं की, टाय लावून किंवा टाय नसतानाही लिनन ब्लेझर वापरलं जाऊ शकतं. अनेक रंगांच्या छाटांमध्ये बाजारात हे ब्लेझर विकत मिळतात.

फॉर्मल लूकसाठी पर्याय

 • कोट किंवा सूट हा पोषाखाचे महत्त्व म्हणजे तो भविष्यातही वापरला जाईल. कोट सैल घातलं की ते छान दिसत नाही. ते योग्य मापात असेल तरच छान दिसते. प्लेन शर्ट किंवा प्रिंटेट शर्ट कोट घालता येतं.
 • पांढरा किंवा गडद रंगाचे, चौकटीचे शर्ट कोणत्याही वेळी, कुठेही आवडीनुसार घालता येतात.
 • पॅटर्न शर्ट किंवा डिझायनर शर्ट हा ट्रेंड त्यांच्यासाठी आहे ज्यांना फक्त एका रंगाचे शर्ट आवडत नाहीत. त्याकरिता हल्ली मुलं कॉलर आणि शर्टची वेगवेगळी रंगसंगती असलेले शर्ट वापरतात.
 • बँड कॉलर (चायनिज कॉलर) किंवा प्रिंट शर्ट हे कार्यालयासाठीही ज्याप्रमाणे वापरले जातात यामध्ये आकाशी, लाल, करडा, रस्ट, पिवळा आणि हिरवा हे रंग ट्रेंडी आहेत.
 • मागच्या वर्षी मुलींसाठी अँकल लेन्थचे कपडे वापरण्याची फॅशन होती, मात्र या वर्षी मुलांमध्येही ती आता रुजू होत आहे. यामध्ये अँकल लेन्थ पँण्टचा पर्यायही उपलब्ध आहे. हा कार्यालयीन लूकसाठी हल्ली पुरुष वापरतात.
 • प्लेट ट्राऊजर्स स्टायलिश आणि सहजरीत्या वावरण्यासाठी उपयुक्त आहेत. शर्ट आणि ब्लेझरवर हे वापरता येतात.

बोट शूज, लोफर, स्कार्फ आणि बरंच काही…

 • भडक आणि उठावदार रंगाचे कपडे घालणं ट्रेण्डी ठरतं.
 • लेयरिंगचा पर्याय अर्थातच उत्तम ठरतो. सध्या लाल रंगाच्या अनेक छटा मुलांच्या फॅशनमध्येही वापरल्या जात आहेत.
 • लग्नसराईच्या काळात कपडय़ांवर थोडेफार दागिने हल्ली पुरुषही वापरू लागले आहेत,  व्यक्तिमत्त्व उठावदार दिसण्यासाठी याचा फायदा होईल.
 • पुरुषांच्या फॅशनमध्ये हल्ली स्कार्फचा वापर सर्रास होऊ लागला आहे. गुलाबी, हिरवा, लाल या रंगांच्या सढळ वापराबरोबरच शूज, शर्टदेखील प्रिंटेड वापरण्यावर भर दिसून येतो.
 • पारंपरिक पोषाखात दुपट्टय़ांचा वापर वाढला आहे.
 • जुन्या पद्धतीची घडय़ाळही हल्ली पुन्हा वापरली जाऊ लागली आहेत.
 • उन्हाळय़ात वापरण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. चिनोज डेनिम किंवा कॅझ्युअलसाठीही लोफर किंवा बूट शूज वापरले जातात.

लेखिका फॅशन डिझायनर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या