ठसा – प्रा. मिलिंद जोशी

1368

>> मेधा पालकर

‘व्यवसायाने अभियंता, वृत्तीने वक्ता आणि लेखणीचा चाहता असे प्रा. मिलिंद जोशी यांचे व्यक्तिमत्त्व आहे’, अशा शब्दांत दिवंगत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी प्रा. मिलिंद जोशी यांचे वर्णन केले आहे. धाराशीव जिह्यातील परंडा तालुक्यातील माणकेश्वर या छोटय़ाशा खेडय़ात सामान्य शेतकरी कुटुंबात मिलिंद जोशी यांचा जन्म झाला. शाळकरी असल्यापासून मिलिंद हे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाचे भक्त बनले. त्यांचा त्यांना जवळून सहवास लाभला. पुढे प्राचार्यांचे चरित्रही त्यांनी लिहिले. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना पाणिनी, आचार्य अत्रे यांसारख्या नामवंत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जिंकणाऱया मिलिंद जोशींनी पदवीनंतर कॉर्पोरेट जगात काम करतानाही वक्तृत्वाची कास सोडली नाही. अभ्यास आणि व्यासंगाला चिंतनाची जोड देऊन त्यांनी आपल्या वक्तृत्वाला स्वतःच पैलू पाडले. अफाट वाचन, स्मरणशक्तीचे वरदान, विलक्षण भाषा प्रभुत्व, भोसले कुळाशी नातं सांगणारी ओघवती वक्तृत्व शैली, अभिनिवेशापेक्षा आशयाला दिलेले प्राधान्य, नर्म विनोदाचा प्रसन्न शिडकावा, समोर कागद न ठेवता तास-दोन तास श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवण्याची शक्ती, विचारांची स्पष्टता आणि विषयाच्या मुळापर्यंत जाण्याचा त्यांचा स्वभाव व समाजाभिमुख वृत्ती यामुळे त्यांची भाषणे केवळ मंत्रमुग्ध करत नाहीत, तर विचार देत अंतर्मुखही करतात याचा अनुभव आल्यामुळे त्यांना मोठा श्रोतृवर्ग मिळाला. महापुरुषांची चरित्रे, संतसाहित्यापासून ते विवेकानंद-अरविंद यांसारख्या महामानवापर्यंत, साहित्यापासून ते समाजापर्यंत कोणताही विषय त्यांच्या वाणीला वर्ज्य नाही. भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकाची आणि विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाची जबाबदारी, विचारभारती मासिकाचे संपादक पद तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या सर्वांत जुन्या साहित्य संस्थेचे कार्याध्यक्षपद सांभाळताना कराव्या लागणाऱया कसरतीतही त्यांनी आपले वक्तृत्व आणि लेखन टवटवीत ठेवले आहे हेही तितकेच महत्त्वाचे.

प्रा. जोशींनी ललितलेखन, कथालेखन, विनोदी साहित्य, व्यक्तिचित्रे, तत्त्वचिंतनपर लेखन, माहितीपर लेखन, संतसाहित्यातील आधुनिकता मांडणारे लेखन, स्तंभलेखन, सदरलेखन, समीक्षा लेखन अशा साहित्याच्या विविध प्रांतात चौफेर मुशाफिरी केली आहे. त्यांची 17 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या त्यांच्या लेखनकार्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठsच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

सीमावासीयांची खंबीरपणे पाठराखण करणाऱया प्रा. जोशींनी उचगाव, कुद्रेमनी, बेळगुंदी अशा सीमा भागात होणाऱया साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवून ठामपणे भूमिका मांडली. महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असणाऱया महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 113 वर्षांच्या इतिहासातले ते सर्वात तरुण कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख केले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिषदेच्या कार्याचा विस्तार केला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणूक न घेता साहित्यिकांना निवडीने सन्मानपूर्वक दिले जावे यासाठीच्या घटनाबदलासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याला यश आले. त्यामुळे साहित्यरसिकांना त्यांच्या मनातले साहित्य संमेलनाध्यक्ष मिळाले.

पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला केंद्रस्थानी आणले. उपक्रमातील सातत्य, वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे साहित्यरसिकांचा परिषदेतला राबता वाढला तो प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारख्या समाजमनाची नस ओळखणाऱया नेतृत्वामुळे.

छोटय़ाशा खेडय़ातून सामान्य शेतकरी कुटुंबातून एक मुलगा उरात स्वप्नं घेऊन पुण्यात येतो. कसलीही कौटुंबिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी नसताना पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात तिथल्या राजकारणाशी दोन हात करत स्वतःचे पाय घट्ट रोवून उभा राहतो, लेखक-वक्ता म्हणून नांव कमवितो ही प्रा. जोशींची वाटचाल आजच्या तरुण पिढीला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरावी अशीच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या