आभाळमाया – आकाशगंगेचा गाभा टिपला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

अवकाशात  हबल दुर्बिणीसारख्या दुर्बिणी गेल्यापासून सबंध विश्व नजरेच्या टप्प्यात आलं. इतकंच नव्हे तर विश्वाच्या ज्या भागात केवळ डोकावण्याचीही कल्पना कठीण होती तिथले थेट फोटोच यायला लागले. माणसाची ‘दृष्टी’ आता विश्व साठवण्याइतकी विशाल झाली. विज्ञानाच्या या देणग्यांचा वापर आपण क्षणोक्षणी करीत असतो, पण त्याचा तारतम्याने वापर करून माणसासह एकमेव ज्ञात जीवसृष्टी अबाधित राखायला हवी, असा विचार मात्र क्वचितच करतो. तरीही नित्यनवे वैज्ञानिक संशोधन सुरूच असते. कारण संशोधनाने एकदा गती घेतली की, ते आत्मगतीने पुढे जात राहते. ते थांबवता येत नाही. त्यातूनच अज्ञाताची ओढ वाढते आणि त्यातील काही गूढरम्य गोष्टींचा सुगावा लागतो.

आपली आकाशगंगा कधी पाहिलीयत? आताचे दिवस पावसाळय़ाचे आहेत, पण ऑगस्टमध्ये पाऊस ओसरून थोडंसं ‘झाले मोकळे आकाश’ अशी स्थिती आली की एखाद्या काळोख्या रात्री अवकाशावर नजर रोखा. विशेषतः खेडय़ातून आकाशगंगेचं मनोहारी दर्शन होईल. झांजेच्या आकाराच्या या आकाशगंगेच्या धूसर पट्टय़ाचेच आपणही एक घटक आहोत ही कल्पना रोमांचित करील. विश्वाशी थेट नातं जोडायला आणि जाणून घ्यायला एक नजर पुरेशी ठरते. आकाशगंगेच्या विराट विस्तारात आपण आहोत दोन भाग जोडणाऱ्या एका ‘पुला’वर! ज्याला ओरायन आर्म म्हणतात तिथे आपल्या सूर्यमालेचं वास्तव्य आहे.

तरीही घरात बसूनच घर न्याहाळावं तसं आपण हे सारं पाहू शकतो. सोबत दुर्बिण असल्यास अतिउत्तम, पण नसली तरी आकाशगंगेत नजरेने डुबकी मारायला काहीच हरकत नाही. आपण म्हणजे आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रकापासून 27 हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आकाशगंगेचा एकूण विस्तार (व्यास) सुमारे 1 लाख प्रकाशवर्षांहून जास्त आहे. त्यात आपण गाभ्यापासून दोन तृतीयांश अंतरावर आहोत. आपली सूर्यमाला या गाभ्याभोवती सुमारे 22 कोटी वर्षांत एक परिक्रमा पूर्ण करते, हे लक्षात घेतले तर सूर्याच्या आतापर्यंतच्या पाच अब्ज वर्षांच्या (अर्ध्या) आयुष्यात सूर्यमालेने आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती 20 ते 21 फेऱ्या मारल्या आहेत आणि तेवढय़ाच फेऱ्या सूर्याचा कायमचा अस्त होण्यापूर्वी बाकी आहेत.

आकाशगंगेच्या गाभ्यात एक महाप्रचंड शक्तिशाली कृष्णविवर असून त्याची कल्पना संशोधकांना पूर्वीपासून होती, मात्र ते ‘बघता’ येऊ शकेल एवढं तंत्रज्ञान त्यावेळी पुढे गेलं नव्हतं. आता ते गेलं असल्याने गेल्या 13 मे रोजी ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ (यूएसए) या अवकाश संस्थेच्या कार्यक्रमांतर्गत एक यशस्वी प्रयोग झाला. आकाशगंगेच्या गाभातलं विराटकाय कृष्णविवर ‘टिपता’ आले आणि त्याची खरीखुरी प्रतिमा प्राप्त झाली. आधुनिक अवकाश संशोधनातली ही महत्त्वाची घटना. 2016 मध्ये गुरुत्वीय लहरी सापडण्यावर जसा आनंद वैज्ञानिक वर्तुळात पसरला तसाच यावेळीही झाला.

आपल्या सूर्यमालेचा आकाशगंगेच्या याच गाभ्याभोवती फिरण्याचा वेग सेकंदाला सुमारे 220 किलोमीटर आहे. त्यात पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा प्रतिसेकंद 30 किलोमीटरचा वेग मिसळला तर आपला सर्वांचा अंतराळात ‘गरगरण्याचा’ वेग सेकंदाला 250 किलोमीटर एवढा होतो! त्यापुढे कुठलं रॉकेट, कुठली बुलेट ट्रेन आणि कुठली हायपरलूप बस! या वैश्विक वेगाशी बरोबरी करणं केवळ दुरापास्त. त्याचे आपण केवळ साक्षीदार नव्हे तर त्यातले सहभागी आहोत. ही जाणीव आपलं मन मोठं करायला खरं तर पुरेशी आहे, पण…

असं असलं तरी आपली विश्वनिर्मितीनंतर लगेच तयार झालेली आकाशगंगा विश्वातली सर्वात जुनी दीर्घिका (गॅलेक्सी) नाही आणि आपला सूर्यही आकाशगंगेतला सर्वश्रेष्ठ तारा नाही. आपण आपले सर्वसाधारण वैश्विक सूर्यापेक्षा कैक पटींनी मोठा स्क्युटी तारा आकाशगंगेतला ‘दादा’ आहे आणि जीएनझेड-11 ही दीर्घिका (सध्या तरी) सर्वात जुनी किंवा वयस्कर मानली जाते.

आपल्या आकाशगंगेत सूर्यासारखे, सूर्यापेक्षा लहान-मोठे असे सुमारे दीडशे ते दोनशे अब्ज तारे आहेत, त्यापैकी किमान दहा हजार ताऱ्यांना ग्रहमाला असू शकतात. मग तिथे जीवसृष्टी असेल का? असेल किंवा नसेलही. कदाचित एखाद्या ताऱ्याभोवतीच्या एखाद्या ग्रहावरची जीवसृष्टी नष्टही झाली असेल. काही ठिकाणी ती खूपच अप्रगत असेल. कारण आपणही अशाच अवस्थेतून विकसित झालो आहोत. आणि आता कुठे आपल्याला विश्व थोडं थोडं कळायला लागलंय, पण हेही नसे थोडके!

[email protected]