नर्मदे हर!

>> मंगल गोगटे

बकावा… नर्मदा परिक्रमेच्या वाटेवरचं गाव. नर्मदामैयाच्या विश्वासावर आयुष्य घालविणाऱया इथल्या प्रत्येक पाषाणात जणू शिवाचं अस्तित्व जाणवतं.

हा पुकार मध्य प्रदेशमधील नर्मदेच्या खोऱयात खूप ठिकाणी कानावर येतो आणि तो तसा नर्मदा परिक्रमाच्या संदर्भातच असतो. नर्मदा परिक्रमेच्या वाटेतच बकावा हे लहान गाव लागतं. हे गाव इथल्या निमर भागातच आहे आणि इथली भाषा आहे निमढ वा निमढी आणि हिंदी. जवळचं विमानतळ आहे नागपूर वा इंदूर आणि रेल्वे स्टेशन सनावाद.

नर्मदा परिक्रमा ही एक स्वप्नवत यात्रा आहे असं ती करणारे सांगतात. ही केली की, विश्वाची परिक्रमा केल्याचं पुण्य लाभतं असं मानतात. शिवाय नर्मदाही पृथ्वीवरची खास नदी आहे असंही मानतात. पूर्वी शंकराने इथल्या मेकल पर्वतावर बसून तपश्चर्या केली. या तपश्चर्येत त्यांच्या अंगातून घाम वाहिला त्याची नर्मदा नदी साकारली. म्हणून ही शंकराची मुलगी आहे असं मानलं जातं. पूर्ण देशात ही एकच नदी आहे की, जी पूर्वपश्चिम वाहते. अगदी प्रलयकाळातही ही नदी अंत पावत नाही.
या नदीतल्या प्रत्येक दगडात शंकराचा वास आहे, तो स्वयंभू आहे असं इथले वासी समजतात. त्यांचा विश्वास आहे की, नदीच्या ‘हर कंकर मे शंकर’ असतो. या परिसरातील लोकांची एवढी श्रध्दा आहे नर्मदेवर की, ते तिला माता मानतात. नर्मदा मैया! आपला विश्वास असो की नसो, पण या गावातील लोक या नर्मदा मैयाच्या विश्वासावर सगळं आयुष्य घालवतात. ती कधी कुणाला उपाशी ठेवणार नाही आणि कधी कुणाला दुःखी ठेवणार नाही असा त्यांचा दृढ विश्वास आहे. तिथलेच काय, पण कुठलीही बाहेरून तिथे गेलेली व्यक्तीदेखील सुखात राहील याची तेथील गावकरी काळजी घेतात. सगळ्यांना इथे मोफत जेवण व राहायला जागा मिळते. गावचेच लोक ही व्यवस्था करतात. जवळपास 100 कुटुंबे बकावा गावात राहतात आणि सगळ्यांचेच आयुष्य नर्मदा मैयाच्या वातावरणाने भारलेलं व सेवाभावाने ओत भरलेलं आहे. तिथल्या अनेकांशी बोलल्यानंतर हे माझ्या लक्षात आलंय.’अतिथी देवो भव’ ही त्यांची जीवन शैली आहे, जी ठायी ठायी दिसून येते. प्रत्येक नर्मदा परिक्रमावासीयाची सेवा आधी आणि नंतर शिवलिंग विकण्याचा व्यवसाय. सेवा करताना परिक्रमावासीयाच्या खिशाकडे ते कधीही पाहत नाहीत.

या गावाच्या जवळच्या नदीच्या पात्रात जे दगड मिळतात ते नर्मदेश्वर. हे लहानमोठय़ा आकाराचे असतात. गावातील पट्टीचे पोहणारे हे तिथून बाहेर काढतात आणि मग कारागीर त्यातून त्यांना एक विशिष्ट आकार देतात व पॉलिश करतात. रंगीबेरंगी शिवलिंग यातून जन्माला येतात – लाल, पिवळसर, हिरवट, तपकिरी, काळसर अशा अनेक वेगवेगळ्या रंगांची आणि गंध लावल्यासारखी, जानवं घातल्यासारखी, ओंकार काढल्यासारखी अशी अनेक प्रकारचं नैसर्गिक डिझाइन असलेली. प्रत्येक शिवलिंग वेगळ्या रंगाचं, वेगवेगळ्या छटांचं, वेगवेगळ्या आकाराउकारांनी नटलेलं, प्रत्येकावर नावीन्यपूर्ण खास डिझाइन, आकारमानही वेगळं. तसं म्हटलं तर प्रत्येक शिवलिंग दुर्मिळ म्हणावं असंच. त्यानंतर ते ठेवण्यासाठी त्या खाली ठेवायला एखाद्या धातूची वा दगडी बैठक बनवली जाते. गावातील अनेक कुटुंबे अशी शिवलिंगं विकण्याचा उद्योग करतात आणि त्यावरच त्यांची गुजराण होते. फेब्रुवारी 2000 मध्ये बकावा हे गाव नावारूपाला आलं. त्यावेळी तिथल्या बंधाऱयाविरुध्द प्रदर्शने झाल्याने ‘बकावा जाहीरनाम्या’वर स्वाक्षरी झाली, परंतु आता ते जगभर प्रसिध्द आहे तेथील शिवलिंगांसाठी.

शिवलिंग इथून निर्यात करण्याचा मोठा व्यवसाय आहे. अर्थात हे लिंग वजनदार असल्याने ते वाहणं हे सगळ्यांनाच शक्य नसतं. शिवाय बकावा अनेक यात्राकरूंसाठी परिक्रमेच्या रस्त्यात पडतं. त्यामुळे यात्रेत ते उचलून पुढे जाणंही कठीण आहे. त्यामुळे लोक ते इथे घेतात आणि व्यापारी ते लिंग त्यांच्या गावी पाठवायची व्यवस्था करतात. शिवभक्त तर जगभर आहेत. त्यामुळे स्वयंभू नर्मदेश्वर शिवलिंगांना जगभर मागणी आहे. त्यात सोशल मीडियाचा हातभार आहेच. आता तर शिवलिंगाला आणखी प्रसिध्दी मिळेल. कारण एका शिवलिंगाची अयोध्येच्या राममंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे असं कळतं.

बकावा आणि त्याच्या आजूबाजूच्या खेडय़ांचं भविष्य आता धोक्यात आलं आहे. कारण आहे नर्मदा तीरावर लवकरच उभं राहणारं महेश्वर हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट. पुनर्वसन तर होईलच, पण नर्मदेश्वरांच्या उपलब्धतेचं काय ? त्या व्यवसायावर अवलंबून असणाऱया कुटुंबांचं काय? बकावा गावाच्या अस्तित्वाचं काय? काहीतरी मार्ग नर्मदा सुचवेलच असं येथील लोकांना वाटतंय. नर्मदा मैयाच्या सेवेत असलेल्या भक्तांचा आवाज आज तरी पूर्ण परिसरात गुंजत असतो. नर्मदे हर !

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या