आभाळमाया – न दिसलेले कंकणाकृती…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

गेल्या 10 तारखेला आपल्याकडे दिवसा अंधार करणाऱया मेघमालेसह धो धो पाऊस धुमाकूळ घालत असताना तिकडे पृथ्वीच्या उत्तर धुव प्रदेशात कंकणाकृती सूर्यग्रहणाचा नयनरम्य प्रयोग रंगला. त्यातील एक ‘नासा’चा फोटो सोबत आहे. हे ग्रहण हिंदुस्थानातून दिसलं नाही. मग कुणी म्हणेल की त्याची माहिती कशासाठी? पण खगोलीय घटना सर्व पृथ्वीवासीयांसाठी त्यांची वैज्ञानिक माहिती ज्ञानवर्धक आणि मनोरंजकही ठरते.

10 जूनचे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर-पूर्व कॅनडातून सुरू झालं आणि ग्रीनलॅण्ड वगैरे ध्रुवीय प्रदेशातून त्याचा ‘टोटॅलिटी’ किंवा ‘ऍन्युलॅरिटी’ मार्ग जात तो चीनच्या उत्तर भागापर्यंत येऊन पोहोचला. अनेक खंडांमधील लोकांनी हे मध्यान्हीला सुरू झालेलं ग्रहण सूर्यास्तापर्यंत त्या त्या देशातील वेळेनुसार पाहिलं. असं ग्रहण पाहायला मिळणं ही आयुष्यातील दुर्मिळ संधी असते. खग्रास चंद्रग्रहण खूप ठिकाणांहून दिसते, पण खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायचं तर पृथ्वीवर चंद्राची गडद छाया पडते. तेवढय़ा चिंचोळय़ा पट्टय़ातच जावं लागतं. हा चंद्रछायेचा पट्टा सुमारे 70 ते 270 किलोमीटर रुंदीचाच असतो. ही ग्रहणंही त्यानुसार कधी काही सेकंदं तर कधी अनेक मिनिटं दिसतात. उदा. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वी-चंद्र-सूर्य यांची सरळ रेषेतील स्थिती अत्यंत अनुकूल असेल तर ते साडेसात मिनिटांपर्यंत दिसू शकते. कंकणाकृती त्यापेक्षा थोडे अधिकही दिसते.

सूर्यग्रहण नेहमी अमावास्येला आणि चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. दोन्ही वेळी सूर्य-पृथ्वी-चंद्र एका सरळ रेषेत येतात हे खरं असलं तरी प्रत्येक पौर्णिमा-अमावास्येला तसं घडत नाही. त्याविषयी पुन्हा केव्हा तरी, पण खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येतो आणि त्याची सावली पृथ्वीवर पडते. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी चंद्र-सूर्याच्या मधे येऊन पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. सूर्यग्रहणाची वेळ अर्थात दिवसाची आणि चंद्रग्रहण रात्रीच होत असते.

16 फेब्रुवारी 1980 रोजी खग्रास सूर्यग्रहण पहिल्यांदाच पाहण्याचा योग आम्ही काही मित्रांनी जुळवला आणि त्यासाठी टोटॅलिटी पाथ किंवा ‘खग्रास पट्टा’ असलेल्या आंध्र प्रदेशात गेलो. दुपारी पावणेतीनच्या सुमारास जवळपास अडीच मिनिटं सूर्य, चंद्रबिंबाने पूर्णपणे झाकला. भर दुपारी अंधार पसरला. डायमंड, रिंग, बेलीज बीडरचं आणि चंद्राची भूपृष्ठावरची सरकती छाया असे विभ्रम अनुभवणारे सारेच रोमांचित झाले. पक्षी, संध्याकाळ झाल्याच्या समजुतीने घरटय़ाकडे निघाले आणि आकाशात तारे चमकताना दिसू लागले.

हे सारं अनोखं, कधी न पाहिलेलं असं काहीतरी विलक्षण होतं. पुढे असेच काही विलक्षण क्षण 1995 आणि 1999 मध्ये अनुभवले. त्यानंतर 2010 मध्ये कन्याकुमारी येथून अप्रतिम कंकणाकृती सूर्यग्रहणही दिसले. 2019 चे तसेच ग्रहण पाहायला आमच्या खगोल मंडळातील सभासद दक्षिण हिंदुस्थानात उटी येथे गेले. 1980 नंतर हिंदुस्थानी लोकांना सूर्यग्रहणाच्या अशा अनेक संधी थोडय़ा कालावधीत लाभल्या. कारण 1898 नंतर 1980 पर्यंत म्हणजे जवळजवळ 82 वर्षांत आपल्या भूमीवरून अशी ग्रहणं (एखादा अपवाद वगळता) दिसली नव्हती. शिवाय 1980 मध्ये सौरचष्मे उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांना ग्रहण पाहणे सोपे गेले. नंतरच्या काळात तर एकूणच निरीक्षणात खूप प्रगती झाली. अन्यथा नुसत्या डोळय़ांनी तेजस्वी सूर्याकडे, ग्रहणकाळातही पाहणे धोक्याचे असते हे आम्ही वारंवार सांगतो.

कंकणाकृती ग्रहणात सूर्य सोन्याच्या बांगडीसारखा लखलखीत दिसतो. काही वेळा खग्रास म्हणजे पूर्ण सूर्य झाकणारे आणि कंकणाकृती म्हणजे चंद्र सूर्यबिंबावर मधोमध आला तरी सूर्याला पूर्ण झाकू शकत नसल्याने सूर्याची तेजस्वी कडा, कंकणाकृती दाखवणारे ग्रहण एकाच वेळी (दोन ठिकाणांहून) दिसते. त्याला ‘हायब्रीड’ किंवा दुहेरी सूर्यग्रहण म्हणतात. त्यात असं घडतं की पृथ्वीच्या आकारामुळे काही भागात चंद्र पृथ्वीच्या थोडा जवळ असतो तिथे खग्रास आणि इतरत्र दूर दिसतो तेथे कंकणाकृती अशी गंमत घडते.

कंकणाकृती ग्रहण चंद्र पृथ्वीपासून दूरच्या कक्षेत असतानाच घडते. आता चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर जातोय. त्यामुळे काही शतकांनी पृथ्वीवासीयांना केवळ कंकणाकृती सूर्यग्रहणच दिसेल. तोपर्यंत ‘खग्रास सूर्यग्रहणाचा अवर्णनीय आनंद संधी मिळेल तेव्हा, परंतु 2034 पर्यंत हिंदुस्थानातून असं ग्रहण दिसणार नाही. 2020 च्या जूनमध्ये उत्तर हिंदुस्थानातून दिसलेलं ‘कंकणाकृती’ ग्रहण पाहण्याची संधी ‘कोविड’ने हिरावून घेतली, परंतु अशा अवकाशी घटना विज्ञान सहज शिकवतात आणि आपल्या जाणिवेला वैश्विक परिमाण देतात म्हणूनच तर दिसलेल्या कंकणाकृती ग्रहणाविषयी लिहिले.