लेख – पाचा वर्तुळांची कहाणी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमधील सात पदकं आणि विशेषतः 41 वर्षांनंतर मिळालेल्या हॉकीतील यशाने यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला उत्साहाची किनार लाभली. 1980 मध्ये रशियन ऑलिम्पिकमधल्या शेवटच्या सुवर्णपदकानंतर हिंदुस्थानच्या हॉकी क्षेत्रात पसरलेली मरगळ, यावेळच्या कांस्य पदकाने दूर झाली. महिला संघानेही उपांत्य फेरीपर्यंत धडक मारून चमक दाखविली. बऱयाच दिवसांच्या अंधारानंतर आलेले आशेचे किरण सुखावह ठरतात तसं झालं. कोविड काळातल्या सततच्या निराशाजनक बातम्या ऐकता-वाचताना ऑलिम्पिकमधल्या मर्यादित, परंतु प्रेरणादायी ब्रेक वार्ता निराशा दूर करणाऱया ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरल्या. टोकियोत झालेल्या यंदाच्या ऑलिम्पिकचं प्रतीक होतं मीराइटोवा. त्याचा अर्थ भविष्यकालीन शाश्वती. 1980 च्या रशियन ऑलिम्पिकचं ‘मिशा’ हे अस्वलाचं प्रतीक खूप गाजलं होतं. कारण तोपर्यंत टीव्ही जगभर पोहोचला होता. 1982 च्या आशियाई स्पर्धा हिंदुस्थानात झाल्या त्यावेळचं प्रतीक म्हणजे ‘अप्पू’ हत्ती. तोही खूप लोकप्रिय झाला होता. अशा प्रतिकांमधून यजमान देशांची संस्कृती प्रगट होत असते.

आता थोडा ऑलिम्पिकचा मागोवा. टोकियोत झालं ते ‘समर’ ऑलिम्पिक. त्याशिवाय विक्टर आणि तिसरं दिव्यांगांसाठीचं पॅरालिम्पिक ते 1948 पासून (दुसऱया महायुद्धानंतर) सुरू झालं. 1908 पासून बर्फातल्या खेळांचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश होऊन ‘आइस हॉकी’चे सामने खेळात रंग भरू लागले. ऑलिम्पिकच्या इतिहासात खूप मागं जायचं तर या क्रीडा प्रकारांना ग्रीसमधल्या ऑलिम्पिया येथे इसवी सन पूर्व आठव्या शतकात जावं लागेल. त्या काळी जगभर राजेशाहीच होती. राजे-महाराजे त्यांच्या मनोरंजनासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करत. आपल्याकडेही धनुर्विद्या, गदायुद्ध, द्वंद्व (कुस्ती), मुष्ठयुद्ध (बॉक्सिंग) आणि प्राण्यांसोबतचे खेळही होत असत, परंतु ऑलिम्पिक स्पर्धा सलग बाराशे वर्षे सुरू होत्या. पुढे राजकीय धकाधकीत त्या बंद पडल्या तरी त्याची स्मृती युरोपियन देशांनी जपली होती. त्यातूनच सतराव्या शतकात रॉबर्ट डेव्हर यांनी 1612 ते 42 या काळात ‘ऑलिम्पिक’ नावानेच क्रीडास्पर्धा आयोजित केल्या. 1796 ते 98 या काळात फ्रान्समध्येही असा प्रयोग झाला. स्वीडनमध्ये 1843 मध्ये झालेल्या ‘ऑलिम्पिक’ला 25 हजार प्रेक्षक हजर होते. 1852 मध्ये ब्रुक यांनी ‘वेनलॉक ऑलिम्पिक’चे आयोजन केले तर 1821 मध्ये ऑटोमन साम्राज्यातून स्वतंत्र झाल्यावर, ऑलिम्पिकचा जन्मदाता असलेल्या ग्रीसने पुन्हा ऑलिम्पिकचा डाव मांडला. तिथल्या प्राचीन पॅनेथोनिक स्टेडियमची दुरुस्ती करून क्रीडा जल्लोष झाला. 1896 मध्ये आजच्या ऑलिम्पिकची प्रथा हळूहळू साकार होऊ लागली. त्या वर्षी 14 देशांच्या 241 खेळाडूंनी 43 प्रकारचे खेळ सादर केले. तोपर्यंत आलेल्या फोटोग्राफीमुळे या ऑलिम्पिकचे (1904) फोटो गुगल-विकीपिडीयावर पाहायला मिळतात. 1904 मध्ये भाग घेणाऱया 650 खेळाडूंमध्ये एकटय़ा अमेरिकेचेच 540 खेळाडू होते! त्या स्पर्धेत जिंकलेल्या एका मॅरेथॉन धावपटूचा, मध्येच कारने अंतर कापल्याचा फोटो प्रसिद्ध झाला आणि त्याचे बक्षीस रद्द झाले.
ऑलिम्पिकच्या इतिहासात असा किंवा ‘डोपिंग’ म्हणजे अमली पदार्थांच्या प्रभावाखाली खेळणे असे प्रकारही नंतरच्या काळात घडले, परंतु सर्व क्रीडा जगताने त्याचा निषेध केला. 1894 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या गोष्टींची दखल घेते. स्पर्धेचा यजमान देश कोण असणार तेसुद्धा ही समिती आणि इच्छुक देशांच्या समितींमध्ये चर्चा होऊन ठरतं. ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची क्रीडांगणं आणि मूलभूत सोयीसुविधांचे आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करू शकणाऱया देशालाच यजमानपद मिळतं. आजपर्यंत सर्वाधिक चार ऑलिम्पिक स्पर्धा अमेरिकेत झाल्या आहेत. पुढच्या वर्षी पॅरिसचं नाव जाहीर झाल्याने फ्रान्सला तो सन्मान लाभेल.

हिंदुस्थानची ऑलिम्पिकमधली कामगिरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आहे. मात्र त्यावेळच्या इंग्लिश राजवटीमुळे ब्रिटिश खेळाडू तसेच 1947 पर्यंत अखंड हिंदुस्थानातील खेळाडू या उपखंडाचे प्रतिनिधित्व करत असत. हिंदुस्थानला हॉकीमध्ये मिळालेल्या आठ सुवर्णपदकांपैकी तीन स्वातंत्र्यपूर्व काळातली आहेत. 1948, 1952, 1965 आणि 1980 मध्ये स्वतंत्र हिंदुस्थानी संघाने जागतिक यश मिळवलं. त्यातही 1964 मधला पाकिस्तानचा विजय लक्षणीय होता. 1980 मध्ये रशियातील ऑलिम्पिकवर अमेरिकेसह अनेक देशांनी बहिष्कार टाकल्याने आपलं सुवर्णपदक ‘स्पर्धेविना’ मिळालं असं म्हटलं गेलं तरी शेवटी उपस्थित स्पर्धकांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवणं कमी महत्त्वाचं नव्हतं. त्या स्पर्धेतील एक खेळाडू मेर्विन फर्नांडिस याच्या आई, पेगी फर्नांडिस यांची मुलाखत घेण्याची संधी त्या सुवर्णपदकाच्या आनंदात मिळाली होती.

2020 चं पुढं ढकललेलं ऑलिम्पिक 21 मध्ये टोकियोत पार पडलं. कोविडमुळे नेमकं काय होतंय ही धास्ती असतानाही सर्व सोहळा आरोग्यदायी वातावरणात साजरा झाला. हिंदुस्थानला तीन व्यक्तिगत आणि हॉकीमध्ये सांघिक कांस्यपदक, दोन व्यक्तिगत रौप्यपदके मिळाली आणि अदितीचं गोल्फमधलं पदक थोडक्यात हुकलं याची खंत असतानाच नीरज चोप्राच्या कुशल भालाफेकीने शेवटचा दिवस तरी ‘गोल्ड’ झाला! त्या सुवतेजाने पाच खंडांच्या पाच वर्तुळांच्या ऑलिम्पिकची यावेळची कहाणी आपल्यासाठी सुफळ संपूर्ण झाली.