लेख – ऑलिम्पिकमधील यशाचे सातत्य राखण्यासाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानी खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेले यश नंतर पुन्हा मिळविण्यासाठी किंवा अत्युच्च कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करते किंवा कसे हे येणारी चार-पाच वर्षे ठरवतील. यश मिळालेले खेळाडू भविष्यात किती फिट राहतात, त्यांचा फॉर्म कसा राहतो हे सर्व निर्णायक ठरते. संघबांधणी ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याने येत्या दोन-चार वर्षांत कसे व किती बदल होतील ते पाहावे लागेल. आपल्याला योग्य ‘रिप्लेसमेन्टस्’ मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शोध मोहीम हाती घ्यावी लागेल. त्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा, मग त्या ज्युनियर आणि सीनियर गटांच्या होणे अनिवार्य आहे.

टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानने तब्बल सात पदकांची कमाई करताना इतिहास रचला. नीरज चोप्राने भालाफेकीमध्ये सुवर्णपदक मिळवून,मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग स्पर्धेत, कुस्तीमध्ये रवीकुमार दहियाने रौप्यपदक, पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये, लव्हलिना बोर्गेहेनने बॉक्सिंगमध्ये, बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये, तर पुरुष संघाने हॉकी स्पर्धेत ब्रॉँझ पदकाला गवसणी घातली. या सगळ्यांचेच कौतुक केले पाहिजे. त्याचबरोबर थोडक्यात पदक गमावलेला महिला हॉकी संघ, गोल्फपटू अदिती अशोक, थाळीफेकपटू कमलप्रीत कौर, नेमबाज सौरभ चौधरी व कुस्तीपटू दीपक पुनिया यांचेही तितकेच कौतुक केले पाहिजे. नशिबाची थोडी साथ मिळती तर त्यांचाही समावेश पदक विजेत्यांमध्ये झाला असता.
हिंदुस्थानच्या नेमबाज, धनुर्धरांनी मात्र या स्पर्धेत निराशा केली. गेली वर्षभर जागतिक स्पर्धांमध्ये विजेतेपदांची कमाई करणाऱया या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये मात्र या दोन्ही खेळांमध्ये ती किमया साधता आलेली नाही. त्याची योग्य ती कारणमीमांसा व्हायलाच हवी.

यंदाच्या पदक विजेत्यांमधील बहुतेक पदक विजेते हे ग्रामीण किंवा लहान शहरांतून पुढे आलेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवीत त्यांनी इथपर्यंत मजल मारली आहे. खेळाडूंमधील गुणवत्ता ओळखून वेळीच त्यांना संधी देण्याचे काम राष्ट्रीय क्रीडा संघटना, भारतीय क्रीडा प्राधिकरण व क्रीडा मंत्रालयाने केले.

हिंदुस्थान सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक 2014 मध्ये सुरू झालेला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) अंतर्गत गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानला मोठे यश मिळाले आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रतिभावंत खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, उच्च दर्जाची उपकरणे खरेदी करण्याची संधी आणि प्रतिष्ठत प्रशिक्षकांखाली प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली गेली. तसेच खेळाडूंसाठी क्रीडा मानसशास्त्र्ाज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांचीही नियुक्ती केली गेली. तसेच खेळाडूंना दरमहा 50 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. त्याचा लाभ घेणाऱया तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्ती, ऍथलेटिक्स, टेबल टेनिस, हॉकी आणि पॅरा-स्पोर्टस्मधील हिंदुस्थानातील 126 खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले.

शास्त्र्ाशुद्ध प्रशिक्षण व व्यावसायिक व्यवस्थापनामुळे यश मिळाले. एक उदाहरण, नीरज चोप्राला या स्पर्धेपूर्वी विविध 27 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्याच्यासाठी खास तीन वेगवेगळे प्रशिक्षक नियुक्त केले गेले होते. हा सगळा खर्च सरकारने व क्रीडा संघटनेने केला आहे. नीरजवर करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा परतावा त्याने ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकाच्या रूपाने देशाला दिला.

हॉकी संघांना योग्य पायाभूत सुविधा, ग्रामीण भागात रुजू लागलेली क्रीडा संस्कृती, योग्य वयात मिळालेली संधी, विचलित न होता खेळाडू व प्रशिक्षकांनी केलेले सातत्यपूर्ण कष्ट, योग्य प्रशिक्षण, व्यावसायिक व्यवस्थापन, एकत्रित प्रयत्न यामुळे यश मिळाले.

ऑलिम्पिक विजेते तयार होत नाहीत, ते घडवावे लागतात. यात अपार कष्ट व सुनियोजित प्रयत्न करावे लागतात. आपल्याला अजून बरेच काही करावे लागेल. हॉकीचे खऱया अर्थाने पुनरुज्जीवन होण्यासाठी नेमके काय करावयास हवे? देशभरामध्ये शे-दीडशे ऍस्ट्रोटर्फ हव्यात आणि तेवढय़ाच अकादमी. याला हजारो कोटी हवेत. त्या अकादमी या कॉर्पोरेटच्या मदतीने उभ्या राहाव्यात. असेच सगळ्या खेळांच्या बाबतीत आवश्यक आहे.

हिंदुस्थानात लहान गावांत, लहान शहरांत कितीतरी गुणवान खेळाडू आहेत. त्यांच्यातील गुणवत्ता जोखून क्रीडा क्षेत्राने त्यांच्यात योग्य ती गुंतवणूक केली, प्रामाणिकपणे मेहनत केली, उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर हे खेळाडू उद्या पदकांमधल्या सोन्याची लयलूट करतील.

नियमितपणे देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये गुणवंत तरुण खेळाडू शोधण्याकरिता प्रयत्न केले जावेत. त्यांना प्रशिक्षक ते सपोर्ट स्टाफ अशा सुविधा द्याव्यात. वेळोवेळी सराव आणि अभ्यासासाठी विदेश दौरे आखावेत. गरज आहे ती सातत्य राखण्याची.
चिनी व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्र विस्कळीत झाले आहे व सांघिक खेळांना त्याचा मार बसला आहे. शिवाय आपले खेळ तळागाळाला म्हणजे ‘ग्रासरूट्स’ला विस्तारलेले नाही. ‘सेकंड लाइन’ तयार केली पाहिजे, तरच आपण निश्चित प्रगती करू शकू.
आपल्या कोचेसनी गेल्या अठरा-एकोणीस महिन्यांमध्ये जे साध्य केले आहे, ते पाहता त्यांच्यावर विश्वास ठेवावयास हवा. त्यांनी किमान पुढील ऑलिम्पिकपर्यंत राहणे आवश्यक आहे.

खेळाडूंना आर्थिक ‘सिक्युरिटी’ हवी. त्यांचे स्पर्धा आयुष्य संपल्यानंतर नोकरी मिळाली पाहिजे. जिंकल्यावर आनंदाने उडय़ा मारणे नाही की पराभूत झाल्यावर दुःखाने कोसळणे नाही, अशी शैली असावी. नेहमी नवीन तंत्र शिकण्यावर भर असावा.

हिंदुस्थानी खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेले यश नंतर पुन्हा मिळविण्यासाठी किंवा अत्युच्च कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करते किंवा कसे हे येणारी चार-पाच वर्षे ठरवतील. यश मिळालेले खेळाडू भविष्यात किती फिट राहतात, त्यांचा फॉर्म कसा राहतो हे सर्व निर्णायक ठरते. संघबांधणी ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याने येत्या दोन-चार वर्षांत कसे व किती बदल होतील ते पाहावे लागेल. आपल्याला योग्य ‘रिप्लेसमेन्टस्’ मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शोध मोहीम हाती घ्यावी लागेल. त्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा, मग त्या ज्युनियर आणि सीनियर गटांच्या होणे अनिवार्य आहे.