साय-फाय – डीप फेकच्या जादुई विश्वात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

‘जादूची नगरी’ हे आबालवृद्धांना मोहवणारे जग असते. वय कोणतेही असो, जादूच्या नगरीत जाण्याची संधी प्रत्येकालाच हवी असते. सतत बदलत जाणाऱया आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानाने मानवासमोर अशीच एक भव्य जादुई नगरी उभी केलेली आहे आणि त्यात विविध तंत्रज्ञानाने तयार झालेले अनेक जादूचे प्रयोगदेखील आहेत. मात्र जादूच्या नगरीत पऱया असतात तसे राक्षसही असतात हे कायमच ध्यानात ठेवायला हवे आहे. सध्या या जादू नगरीतील डीप फेक तंत्रज्ञानाने तयार झालेल्या ‘Deep Nostalgia AI’ या नव्या टूलने इंटरनेट विश्वाला भुरळ पाडलेली आहे. सर्वच वयोगटांतील लोक या ‘Deep Nostalgia AI’च्या मागे धावत सुटलेले आहेत. हे टूल नक्की आहे तरी काय, ज्याला जगभरात एकदम एवढी लोकप्रियता मिळते आहे? या टूलच्या मदतीने अगदी सामान्य संगणक वापरकर्तादेखील एखाद्या साध्या फोटोला जिवंत करू शकतो. अर्थात फोटोमध्ये भावना निर्माण होऊन तो हसताना वा मान डोलवताना तर कधी डोळे मिचकावताना आपल्याला दिसायला लागतो. काही काळापूर्वी या ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाबद्दल फारशी चर्चा नसायची. अगदी कुजबुजत्या स्वरूपात तरुणाईत कुठेतरी याची चर्चा कानावर यायची. याचे मुख्य कारण म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांसाठी याचा प्रामुख्याने होणारा वापर. एखाद्या फोटोला अथवा व्हिडीओला मॉर्फ करणे, एका चेहऱयावर दुसरा चेहरा चिकटवणे अशा व्हिडीओ अथवा फोटोबरोबर अश्लील साहित्य जोडून सदर व्यक्तीला ब्लॅकमेल करणे हा जगभरातील हॅकर्सचा पैसे कमावण्याचा प्रमुख मार्ग आहे. गुन्हेगारी विश्वातच नव्हे, तर निवडणूक काळात आपल्या प्रतिस्पर्ध्याला बदनाम करण्यासाठी, एखाद्या दिवंगत व्यक्तीविषयी चुकीची माहिती पसरवण्यासाठी, एखादा अभिनेता, खेळाडू यांना बदनाम करण्यासाठीदेखील या तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे अनेक गुन्हे जगभरात घडले आहेत आणि घडत आहेत. मग कधी पुठल्या नेत्याचा फोटो गुन्हेगाराबरोबर जोडला जातो, तर कधी एखाद्या अभिनेत्रीची खोटी अश्लील चित्रफीत तयार केली जाते. या सगळ्या मागे करामत असते ती या आर्टिफिशल अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवरती चालणाऱया ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाची. आज कितीही मोहक रूप घेऊन दाखल झालेले हे तंत्रज्ञान इंटरनेट विश्वाला स्वतःकडे खेचून घेत असले तरी या चेहऱयामागच्या धोक्यालादेखील वेळीच ओळखण्याची खरी गरज आहे. सध्या ‘Deep Nostalgia AI’ रूपात आलेले हे तंत्रज्ञान खरे तर अत्यंत सुलभ आणि साध्या पद्धतीने काम करते. `Myheritage’ या ऑनलाइन कंपनीने सादर केलेल्या  टूलमध्ये युजर्सला स्वतःचा वा दुसऱया एखाद्या व्यक्तीचा फोटो अपलोड करणे एवढेच फक्त काम करायचे असते. एकदा का असा फोटो अपलोड झाला की, हे टूल आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या आणि फेशियल मूव्हमेंट्सच्या मदतीने या चित्रात जिवंत भावना निर्माण करते. तुम्ही फोटो अपलोड केल्या केल्या सर्वात आधी हे टूल त्या पह्टोला एनलार्ज करून घेते. त्यानंतर तुमच्या आकृतिबंधाचा, हावभावांचा अभ्यास करून, तुमचे हास्य कसे असेल, तुम्ही डोळे कसे मिचकावत असाल याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे तुमच्या फोटोला जिवंत करते. आजवर नुसता फोटोत दिसणारा चेहरा आता कधी हसत असतो तर कधी डोळे मिचकावत असतो. याच जादूने जगभरात लोकांना भुरळ पाडली असून लोक स्वतःच्या फोटोबरोबरच आपल्या जग सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तींच्या फोटोंनादेखील आभासी जिवंत करून त्याच्या सोबतीचा आनंद मिळवत आहेत. अनेक युजर्स या तंत्रज्ञानाला देणगी समजत असले तरी सायबर सुरक्षा क्षेत्रातील अनेक तज्ञ मात्र हे तंत्रज्ञान आणि भविष्यातील त्याचा वापर याविषयी चिंता व्यक्त करत आहेत. तंत्रज्ञान शेवटी कितीही उपयोगाचे असो, पण शेवटी ते कोणत्या हातात पडते हे आजकाल जास्त महत्त्वाचे ठरू लागले आहे.