पोलिसांचे श्वान फोडणार कैद्यांचे बिंग, कारागृहांमध्ये होणार तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशीष बनसोडे

राज्यातील कारागृह आता अधिक सुरक्षित होणार आहेत. मोठय़ा चलाखीने प्रतिबंधित वस्तू अथवा अमली पदार्थ कैद्यांनी आत नेले तरी त्याचे आता टेन्शन राहणार नाही. कारण पोलिसांचे श्वान कारागृहांत जाऊन कैद्यांचे बिंग फोडणार आहेत.

कारागृहामध्ये ड्रग्ज सापडले तर कधी मोबाईल अथवा प्रतिबंधित वस्तू सापडली असे प्रकार अधेमधे समोर येत असतात. मोठय़ा शिताफीने सुरक्षा रक्षकांना चकवून अमली पदार्थ अथवा आक्षेपार्ह वस्तू कारागृहात नेल्या जातात. याचीच कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकाराला आळा बसावा, आत ड्रग्ज किंवा प्रतिबंधित वस्तू गेल्या तरी त्या वेळीच पकडल्या जाव्यात आणि चलाखी करणाऱयांचे मनसुबे उधळले जावेत यासाठी पोलिसांच्या श्वानपथकांची मदत घेण्याचे आदेश कुलकर्णी यांनी कारागृह अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचल यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिले असून श्वानपथकाकडून कारागृहात तपासणी करावी अशी विनंती करण्यात आली आहे. तर ठाणे, रत्नागिरी आदी कारागृहांत तेथील पोलिसांच्या श्वानपथकाकडून तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित कारागृहांमध्येदेखील श्वानांकडून तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

चलाखीने अमली पदार्थ किंवा आक्षेपार्ह वस्तू कारागृहात आणल्या गेल्या असतील तर त्या वेळीच पकडल्या जाव्यात यासाठी श्वानपथकाची मदत घेतली जाणार आहे. कारागृह प्रशासन व पोलिसांच्या समन्वयाने कधीही तपासणी केली जाईल. कैद्यांनी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी श्वानांमुळे तशा वस्तू अथवा अमली पदार्थ आम्हाला पकडता येणार आहे. – अंकुश शिंदे (महानिरीक्षक, कारागृह)

…तर गुन्हा दाखल करून चौकशी

श्वानांच्या तपासणीत कैद्याजवळ आक्षेपार्ह वस्तू किंवा ड्रग्ज सापडले तर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल. मग संबंधिताची पोलिसांकरवी चौकशी केली जाईल. चौकशीत काही तथ्य आढळले तर कायदेशीर कारवाई होईल असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कारागृहात कुठल्याही आक्षेपार्ह वस्तू अथवा ड्रग्ज जाऊ नये यासाठी कारागृह सुरक्षा रक्षकांकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते. पण कधी कधी इतके करूनही लपूनछपून काही वस्तू आत जातात. त्या आत गेलेल्या वस्तू बऱयाचदा सापडत नाहीत. त्यामुळे ते शोधून काढण्याचे काम श्वानांकडून करून घेण्यात येणार आहे.