लेख – आरोग्य सेवा आणि संवेदनशीलता

563

>> वैभव मोहन पाटील

शासकीय आरोग्य सेवांप्रति लोकांची विश्वासार्हता वाढावी यासाठी आरोग्य यंत्रणांचे जाणीवपूर्वक प्रयत्न खूप मोलाचे आहेत. त्यादृष्टीने आरोग्य सेवा कार्यरत राहणे आवश्यक आहे. सरकारी उपचारांप्रति लोकांची नकारात्मक भावना बदलण्यासाठी केंद्र राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाद्वारे या प्रयत्नांना मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. आता गरज आहे ती आरोग्य यंत्रणा अधिक संवेदनशील बनण्याची

 सार्वजनिक आरोग्य सेवा दिवसागणिक संवेदनशील बनत चालल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. आरोग्य सेवेतील काही असंवेदनशील घटकांमुळे पूर्ण विभागाला दूषणे लागतात. मात्र या सेवेत काम करणारे अनेक कर्मचारी रुग्णांप्रति प्रचंड सहानुभूती ठेवून काम करतात हेदेखील तितकेच खरे आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत याचा परिचय कोल्हापूर जिह्यात आला. कोल्हापुरातील निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या नीता खंदारे या गरोदर महिलेच्या कुटुंबीयांना हा शासकीय सेवेच्या आपुलकीचा रोमांचक अनुभव आला. साखरी येथे राहणाऱया नीता खंदारे यांना दुपारी बाराच्या सुमारास निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. मात्र तिथे प्रसूतीसाठी प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांची प्रकृती चिंताजनक बनू लागली. तिथे अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्वरित कोल्हापूर येथे हलवणे गरजेचे होते. मात्र कोल्हापूर- गगनबावडा या रस्त्यावर पावसाचे प्रचंड पाणी जमा झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने जिल्हा आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधला. त्यांनतर गगनबावडा पोलिसांचे पथक निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले.

त्यांनतर पोलीस व आरोग्य कर्मचाऱयांनी रुग्णवाहिकेतून सदर महिलेस किरवे गावाजवळ आणले. त्यांनतर कमरेएवढय़ा पाण्यातून स्ट्रेचरवरून महिलेस जवळपास 200 मीटर लांब लोंघे येथे आणण्यात आले. तिथून रुग्णवाहिकेद्वारे तिला कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथे तिची तपासणी केल्यानंतर तिला कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा प्रकारे गगनबावडा, कळे पोलीस आणि निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांनी अथक प्रयत्नांतून त्या गरोदर महिलेस कोल्हापूरच्या रुग्णालयात सुरक्षिततेसाठी यशस्वीपणे हलवले. अशा प्रकारे शासकीय आरोग्य सेवेच्या संवेदनशीलतेची अनेक उदाहरणे देता येतील. रुग्णसेवेसारख्या महत्त्वपूर्ण व जबाबदारीच्या सेवेमध्ये काम करत असताना कर्तव्याबरोबरच रुग्णांप्रति दाखवलेली कृतज्ञता शासकीय कर्मचाऱयांच्या समाधानाचे कारण बनते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी दिवसेंदिवस अधिक संवेदनशील बनत चालले आहेत.

राज्याच्या कानाकोपऱयात घडणाऱया या घटनांतून इतर घटकांनीही उचित बोध घ्यावा असे वाटते. सर्वांसाठी आरोग्य हे आरोग्य सेवेचे उद्दिष्ट आहे. आरोग्य सेवा देताना आपत्तीत अडकलेल्या तसेच  वंचित गटांचा विचार होणे अपेक्षित आहे. त्यांना येणाऱया अडचणी, त्याची कारणे व त्यावर मात करता येईल अशा उपाययोजना अंगीकरायला हव्यात. आरोग्य सेवांबाबत माहिती, उद्दिष्टे, सेवा हमी या सर्व बाबी आरोग्य संस्थांमध्ये तसेच सार्वजनिक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या सर्वात आरोग्य सेवेची विशेष गरज असणाऱया समाजगटांना विचारात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यात नाजूक अवस्थेत असणारे शिशू, गरोदरपण, स्तनदा माता, मातृत्व, दूषित दृष्टिकोनाचे बळी असलेले स्त्रिया, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, अपंगत्व तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे निर्वासित बनलेले नागरिक यांना विशेष आरोग्य सेवेची गरज असते. त्यांच्यासाठी त्या त्या भागात सेवा पोहोचवून भौगोलिक व सामाजिक अंतर कमी करणे, दुर्लक्षित समाजगटातूनच त्यांना सेवा देणारे कर्मचारी तयार करणे, आरोग्य सेवा देणाऱयांमध्ये लिंगभेद, लैंगिकता, भेदभाव, हिंसा आदी प्रश्नांबाबत संवेदनशीलता असणे गरजेचे आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन आरोग्य सेवांची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न होत आहे.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱयांची रिक्त पदे भरून आरोग्य सेवेची परिणामकारकता वाढवली जात आहे. औषधी व उपकरणांची उपलब्धता हेदेखील आरोग्य सेवेचे ध्येय आहे. प्रथम संदर्भ स्थळावरच अधिकाधिक आरोग्य सेवा उपलब्ध करून रुग्ण संदर्भित करण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ‘आरोग्यवर्धिनी’ या सर्वंकष सेवा देणाऱया योजनेमध्ये करण्याचा उपाय येत्या काळात नक्कीच प्रभावी ठरेल. मात्र आरोग्य सेवा सर्वार्थाने सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी तळागाळातील आरोग्य यंत्रणांनी कंबर कसायला हवी. शासकीय आरोग्य सेवांप्रति लोकांची विश्वासार्हता वाढावी यासाठी आरोग्य यंत्रणांचे जाणीवपूर्वक प्रयत्न खूप मोलाचे आहेत. त्यादृष्टीने आरोग्य सेवा कार्यरत राहणे आवश्यक आहे. सरकारी उपचारांप्रति लोकांची नकारात्मक भावना बदलण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाद्वारे या प्रयत्नांना मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. आता गरज आहे ती आरोग्य यंत्रणा अधिक संवेदनशील बनण्याची.

आपली प्रतिक्रिया द्या