ठसा – प्रभाकर कर्डक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  भरत गोविंद जोशी  

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडस्चे महाराष्ट्र राज्यातील आदरणीय आणि उत्कृष्ट शिक्षक म्हणून ज्यांचे नाव घेता येईल ते म्हणजे प्रभाकर कर्डक सर. राज्यातील स्काऊट गाईड चळवळीला त्यांच्यामुळे मोठा वाव मिळाला. महाराष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून हिंदुस्थानातील ‘कब’ विभागाला एक चांगली दिशा देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतित केले. महाराष्ट्राचे पहिले कब लीडर ट्रेनर आणि स्काऊटचे गुरुवर्य असलेले प्रभाकर कर्डक यांनी निःस्वार्थीपणे स्काऊट-गाईड चळवळीत महत्त्वाचे कार्य केले. मात्र 21 जून रोजी त्यांचे निधन झाले आणि स्काऊट गाईड चळवळीतील एक महत्त्वाचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला. प्रभाकर कर्डक सर हे ‘ध्रुव’ तार्‍यासारखे अढळ आणि स्काऊट-गाईड कार्यात स्थिर आणि उदात्त भावनेने अविरत कार्य करणारे आदर्श शिक्षक होते.

मुंबईतील शीव येथील डी. एस. हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडविले. त्यांचा सर्वांगीण विकास करत असतानाच स्काऊट-गाईडच्या नीतिमूल्यांचे धडे त्यांच्याकडून गिरवून घेतले. आपल्या विद्यार्थ्यांनी, स्काऊटस् गाईडस्नी आपल्यापेक्षा पुढे जावे ही कर्डक सरांची तळमळ होती. शिक्षणसेवेत त्यांनी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुला-मुलींचा सर्वांगीण विकास होऊन ते देशाचे शिस्तप्रिय, ध्येयनिष्ठ नागरिक कसे घडतील हा त्यांचा त्यामागील दृष्टिकोन होता.

कर्डक सर म्हणजे राज्यातील स्काऊट गाईडचे अध्वर्यूच होते. त्यांनी स्काऊट गाईडस चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांचे ध्येय एकच होते ते म्हणजे स्काऊट-गाईडस्ना सातत्याने विविध प्रशिक्षण देणे. कर्डक सरांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रशिक्षण शिबिरांमध्ये जाऊन आठ-आठ दिवस राहून हजारो स्काऊटस्ना घडविले. स्काऊटस्ची तयारी करून घेऊन शेकडो स्काऊटस्ना राज्यपाल पुरस्कार, त्याचप्रमाणे राष्ट्रपती पुरस्काराची तयारी करून अनेकांना ते पुरस्कार मिळतील अशा पद्धतीने घडविले. त्यांची प्रशिक्षण देण्याची पद्धत मुलखावेगळी होती. स्काऊटस्ना विश्वासात घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवून सर त्यांना प्रशिक्षण द्यायचे. पद कवायत, सांघिक प्रार्थना, स्काऊटचे ध्येय, वचन आणि नियम यांची माहिती देताना ते एकाग्र व्हायचे हे मी कित्येक वेळा प्रशिक्षण शिबिरात अनुभवले आहे. गाठींचे प्रकार, प्रार्थना, ध्वजगीतापासून ते तंबूंची उभारणी करणे त्याचबरोबर नकाशा वाचनाबरोबर कर्डक सर बौद्धिकसुद्धा घेत असत. हजारो स्काऊटस्चा आनंद मेळावा (जांबोरी) कसा असावा. त्याची रचना, सुरक्षा, प्रशिक्षण, त्याचप्रमाणे निवासव्यवस्था, भोजनव्यवस्था याचा त्यांना खूप मोठा अनुभव होता. अशा या अष्टपैलू ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय कर्डक सरांना फेलोशिप ऑफ स्काऊटस् आणि गाईडस्तर्फे स्काऊट पॅव्हेलियन, दादर येथे आयोजित केलेल्या भव्य समारंभात ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले होते.

त्यावेळी स्काऊट गाईडचे त्यावेळचे मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल उपस्थित होते. सर्वांना प्रशिक्षण देणारे तसेच एका शिस्तबद्ध रितीने घडविणार्‍या कर्डक सरांचा वारसा महाराष्ट्र स्काऊट गाईड पुढे त्याच पद्धतीने चालवेल आणि आदर्श स्काऊट गाईड्स घडवेल. हीच कर्डक सरांना खरी श्रद्धांजली ठरेल.

 (जिल्हा आयुक्त – स्काऊट मुंबई)