
>> अदिती राणे
कुटुंब नावाच्या सामाजिक संस्थेमध्ये एकीकडे स्त्रीला संरक्षण दिले जाते, तर दुसरीकडे त्या संरक्षणाच्या मोबदल्यात तिच्यावर अनेक अंकुश लादले जातात. आयुष्याच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर ‘स्त्री’ हे एकाकीपणाचे दुःख मूकपणे सहन करीत असते. खरं तर समाजाने आखून दिलेल्या चौकटीतच जगणे अपेक्षित असते, पण जेव्हा ही चौकट मोडून वेगळं अपवादात्मक जगण्याचा मार्ग स्वीकारला जातो, तोदेखील एका ‘स्त्री’कडून, तेव्हा तिच्याकडे टीकात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातं.
समाजात अशा कितीतरी स्त्रिया आहेत, ज्या ‘एकटेपणाचे जीवन’ जगत आहेत. काहींनी स्वतःहून हे एकाकीपण स्वीकारलेलं असतं, तर काहींच्या बाबतीत परिस्थितीनुसार आलेलं असतं. जे त्यांना नाइलाजाने स्वीकारावं लागतं. या स्त्रियांच्या गटामध्ये प्रामुख्याने अविवाहित स्त्रिया, विधवा स्त्रिया (त्यातही दोन गट – वृद्ध विधवा आणि तरुण विधवा), घटस्फोटिता, परित्यक्त्या स्त्रिया आणि लग्न होऊनसुद्धा एकटय़ा हे प्रकार मोडतात. कधी लग्न होत नाही, कधी व्यंग असतं, कधी रूप कमी पडतं, कधी लग्नाचं बघणारं कोणी नसतं, कधी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटतं म्हणून अविवाहित राहावं लागतं. त्यामुळे एकटेपणा येतो. काहींची संसारासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी करण्याची तयारी नसते. काहींनी एखाद्या कामाला वाहून घेतलेलं असतं. त्या कार्याच्या झपाटय़ात स्वतःचं आयुष्य स्वतःचं राहत नाही. त्या दुसऱ्या कोणाबरोबर ते आयुष्य कसं काय वाटून घेऊ शकणार? अशा सगळय़ा अविवाहित राहतात आणि म्हणून त्या एकटय़ा असतात.
एक नवीन वर्ग आहे, ज्यांनी आपणहून जोडीदाराला त्यांच्या स्वतःच्या काही कारणांसाठी सोडून दिलेलं असतं. त्याही ‘एकटय़ा’ असतात. कधी पटत नाही, जमत नाही, एकमेकांना समजून घेण्यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे त्याची परिणती शेवटी घटस्फोटामध्ये होते. त्यामुळे एकटेपणा येतो. समाजातील विधवा स्त्रियांची स्थितीही फार बिकट असते. यामध्ये बऱ्याच जणींना (सरसकट नाही) घरातून ‘अलिप्त वागणूक’ कळत नकळत दिली जाते. घरात असूनही त्या उपेक्षित, एकाकीपणाचे जीवन जगत असतात. यात साठीच्या वरच्या अनेक जणींनी अध्यात्मातून आधार शोधलेला दिसतो.
नवऱ्याच्या घरात राहूनही एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियांची संख्या बऱ्यापैकी आहे. अनेकदा भरलेल्या संसारात स्त्रिया मानसिक पातळीवर भयाण पोकळी अनुभवतात. ‘न दिसणारे अंपगत्व’ त्या भोगत असतात. म्हणजेच कणा नसलेल्या, आवाज नसलेल्या, अर्थात नवरा असूनही नसल्यासारख्या असल्याचे कटू वास्तव त्या अनुभवत असतात. याशिवाय काही जणी मतभेद असणाऱ्या पतीशी संसार करण्यापेक्षा पतीशिवाय जीवन जगणे हाही एक प्रतिष्ठेने जगण्याचा मार्ग म्हणून स्वीकारतात. तेदेखील एक प्रकारचं ‘एकटेपण’. एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियांमधला सर्वात मोठा गट हा विधवांचा आहे. घटस्फोटित स्त्रियांचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. त्याच्या खालोखाल संसारात राहून ‘एकाकी’ आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचा समावेश होतो.
‘एकटी स्त्री’ मग ती अविवाहित असो, घटस्फोटिता असो, परित्यक्त्या असो वा विधवा असो, समाजाच्या कुतुहलाचा, कुचेष्टेचा, कधी सहानुभूतीचा, तर कधी टीकेचा विषय बनते. कमी शिकलेल्या आणि गरीब स्थितीतल्या आणि लहान गावातल्या मुली – बायकांना अर्थातच जास्त त्रास होतो. त्या मिळवत्या नसतील तर त्या अधिकच लाचार- अगतिक होतात, पण आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र आणि सुशिक्षित शहरी स्त्रीलादेखील कमी – जास्त प्रमाणात ‘एकटी’ असल्यामुळे वेगळय़ा प्रकारच्या पुरुषी नजरेला आणि आव्हानांना तोंड द्यावं लागतं. याचा अर्थ एवढाच की, या स्त्रिया अजूनही धीटपणे बोलू लागल्या नाहीत, तर वंचित दलित, आदिवासी स्त्रियांची परिस्थिती आजही ‘जैसे थे’ आहे असे एका सर्वेक्षणातून दिसून आले.
आपले ‘स्वत्व’ टिकविण्याची स्त्रीची धडपड आणि लढाई ही फक्त त्यांना एकटे पाडणाऱ्या पुरुषांविरुद्ध नसून संपूर्ण समाजाविरुद्ध आहे. अशा अनेक एकाकी स्त्रिया, ज्या मानसिक व भावनिकदृष्टय़ा मनाने खचलेल्या आहेत, त्यांच्या दुःखांना वाचा फुटलेली नाही. या मूक संघर्षाची दखल घेतली जात नाही हे वैश्विक सत्य आहे.
दररोजच्या जगण्यात अनेक प्रसंग असे येतात की, त्यावेळी लग्न, कुटुंब या चौकटीचा आधार वाटतो, तर अनेकदा याच चौकटीत गुदमरून जावं इतकं ओझं वाटू लागतं. म्हणूनच अशा चौकटीबाहेर झेप घेण्याची क्षमता असू शकते हे लक्षात घ्यावं. सहजीवन फक्त पुरुषच देऊ शकतो का? स्त्रियाही स्त्रियांना मानसिक सुरक्षितता, स्थैर्य, भावनिक आधार देऊ शकतात. म्हणून अशा सर्व स्त्रियांनी निर्जीव, उदासीन आयुष्य न जगता वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक पातळय़ांवर लढा द्यावा. कारण या जगण्यात आशा, स्वप्ने आणि आनंदही आहे. आपल्या ‘एकटेपणाचा’ सदुपयोग निर्मितीक्षम पद्धतीने आपल्या जाणिवा, व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी करावा. त्यामुळे स्त्री प्रश्नांची लोकांना नव्याने जाणीव तरी होईल व त्यातून सकारात्मक दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाईल अशी किमान आशा तरी बाळगूया.

























































