
>> डॉ. अनुराधा कुलकर्णी
कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी जबाबदार स्त्री कुटुंबात असेल तर ते कुटुंब यशस्वी होतं. इतिहास घडवतं! राधाबाईंनी पेशव्यांच्या तीन पिढय़ा घडवल्या. मराठेकाळातील एकत्र विजयी भव!टुंबाच्या प्रमुख स्त्रीचे मूर्तिमंत उदाहरण राधाबाईंच्या पत्रव्यवहारातून आपल्यासमोर येते.
मराठेकालीन समाजरचनेत एकत्र कुटुंबपद्धती होती. या काळातील वास्तुशैलीप्रमाणे बांधलेले मोठमोठे चौसोपी वाडे, शहरातील पेठेच्या कडेने बांधलेली दुमजली घरे, पिढय़ान्पिढय़ा चालणारे व्यवसाय यांच्यामधून एकत्र कुटुंबाचे स्वरूप समोर येते. कुटुंबात तीन-तीन पिढय़ा एकत्र नांदत असत. या सर्वांना एकत्र ठेवून त्यांच्यावर सुसंस्कार करण्याची जबाबदारी कुटुंबप्रमुख स्त्रीवर असे.
मराठेकाळातील पत्नी, आई, आजी अशा स्त्रीरूपाचे प्रतिनिधित्व करणाऱया स्त्री म्हणजे डोळय़ांसमोर येतात त्या म्हणजे राधाबाई. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पत्नी. थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पांची आई आणि नानासाहेब पेशव्यांच्या आजी.
राधाबाईंनी मराठय़ांचे स्वातंत्र्य युद्ध प्रत्यक्ष पाहिले होते. पेशवेपदाची धुरा सांभाळणाऱया आपल्या पराक्रमी पतीची बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची झंझावाती कारकीर्द अनुभवली होती. प्रत्यक्ष मुगलांच्या पैदेतून छत्रपतींचा कुटुंबकबिला सोडवून त्यांना परत महाराष्ट्रात आणणाऱया आपल्या पतीचा राजकारणी स्वभाव व जबाबदारी त्यांना माहिती होती. पुत्र बाजीराव व चिमाजी अप्पांचा पराक्रम, विजयी घोडदौड व बेदरकारपणाही त्यांना चांगलाच ठाऊक होता. त्यामुळे राधाबाईंच्या पत्रांतून ‘परस्थळी जाणे झाले तरी कोण्हाचा विश्वास न धरणे, समाधान रक्षून आपले कार्य सिद्धीस पावे ते करावे आणि या दोन्ही पुत्रांचा संकट अंगावर घेऊन, त्यातून पार पडण्याचा गुण जाणून शरीर संरक्षण करून बहुत सावधतेने असावे,’ अशी उपदेशपर काळजीही दिसते.
राधाबाईंनी पेशवे कुटुंबियांना लिहिलेली पत्रे आहेत. मात्र राधाबाईंनी केवळ थोरल्या बाजीरावांना लिहिलेल्या पत्रांच्या मायन्यातच ‘विजयी भव’ असा आशीर्वाद आहे. बाजीरावांना ‘विजयी बाजीराव’ म्हटले जाते आणि हा विजयी होण्याचा आशीर्वाद राधाबाईंनी थोरल्या बाजीरावांना दिलेला आहे.
बाजीरावांप्रमाणेच पुत्रवत असणाऱया मराठे सरदारांबरोबरही राधाबाईंचे संबंध जिव्हाळय़ाचे होते. मराठे सरदारांनी राधाबाईंना लिहिलेली पत्रेही उपलब्ध आहेत. सरदार संभाजी जाधवांनी राधाबाईंना ‘आदिपर्व’ ही पोथी वाचण्यासाठी पाठवली होती. आणि ही पोथी सावकाश वाचून परत करावी असे लिहिले होते. नवरात्रीतील घटस्थापना, गंगोदकाची कावड, आळंदीची श्री ज्ञानेश्वरांची यात्रा, जेजुरीच्या श्री खंडोबाचे दर्शन, काशीयात्रा अशा त्यांच्या पत्रातील उल्लेखांवरून राधाबाईंची धार्मिकता समजते अािण मराठेकालीन समाजरचनेतील या धार्मिक बाबींचा रिवाजही समजतो.
शनिवारडय़ात राधाबाईंनी फळाफुलांची बाग फुलवली होती. 1745 साली पाऊस वेळेवर पडला तरी मुठा नदीचे पाणी आटून कमी झाले होते. तरी पुण्यातील काही प्रतिष्ठत लोक आपल्या वाडय़ातील बागा फुलविण्यासाठी नदीचे पाणी मोट लावून वापरत होते. दुष्काळाचे सावट ओळखून यावेळी राधाबाईंनी नानासाहेब पेशव्यांना सांगून शनिवारवाडय़ातील मोट बंद केल्याच, पण त्याबरोबरच पुण्यातील इतर वाडय़ांतील मोट बंद करावयास लावल्या. या पत्रात त्या लिहितात, ‘बाग वाचवून शहर पाण्यावाचून हैराण करावे हे कार्याचे नाही. नदीत पाणी नाही, याजकरिता हा बंदोबस्त आम्ही केला आहे. या मोट चालल्या तर शहरात पाण्याकरिता आकांत होईल. ते काही आमच्याने आइकवणार नाही.’ अशा उल्लेखांवरून राधाबाईंचे सामाजिक कार्यातील लक्षही समोर येते. राधाबाईंनी पेशवेपदाची जबाबदारी, मान फार जवळून पाहिला होता. पेशवेपदाची सामाजिक व धार्मिक जबाबदारी त्या पूर्णपणे ओळखून होत्या. त्यामुळेच आणि एक आई व कुटुंबप्रमुख या नात्याने ‘मस्तानी’ प्रकरणात त्यांनी विरोध करणे स्वाभाविक होते. कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी जबाबदार स्त्री कुटुंबात असेल तर ते कुटुंब यशस्वी होतं. इतिहास घडवतं! राधाबाईंनी पेशव्यांच्या तीन पिढय़ा घडवल्या. मराठेकाळातील एकत्र कुटुंबाच्या प्रमुख स्त्रीचे मूर्तिमंत उदाहरण राधाबाईंच्या पत्रव्यवहारातून आपल्यासमोर येते.





























































