आगळं वेगळं – वर्षा नृत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

वर्षा नृत्य कसं करावं हे मौखिक मार्गाने परंपरेतून एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे पोहेचलं आहे. सर्वसाधारणपणे पिसं आणि मोरपंखी रंगाचे कपडे वापरून हे नृत्य केलं जातं. जुनं इजिप्त ते मूळ (native) अमेरिकन अशा अनेक संस्कृतींत-उत्तर अमेरिका, आफ्रिका, चीन. थायलंड, युरोप इ. येथे हे नृत्य केलं जातं. मूळ अमेरिकनांकडे पाऊस थांबवण्यासाठी देखील एक नृत्य प्रकार आहे जसा जपानमधे ‘तेरू तेरू बोझु’ आणि इंडोनेशियामधे ‘पावांग हुजन’ आहे.

पृथ्वीवरच्या जीवनासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे वरुणराजाला जगभर आदराने वागवले जाते. त्याची पूजा केली जाते. जगातल्या अनेक संस्कृतींमधे पाण्याबरोबरच पृथ्वी, वायू, आकाश आणि अग्नी याना दंतकथा आणि पूजाअर्चा यामध्ये महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. सर्व संस्कृतींमध्ये पाण्याच्या मुबलकतेशी अनेक उत्सव जोडले गेले आहेत. कारण पर्जन्यराजाची कृपा म्हणजे मुबलक धनधान्याने येणारी समृद्धी. त्यामुळेच पाऊस हा लोकांच्या भावनिक व आध्यात्मिक विश्वाशी जोडला गेला आहे.

जणू आकाश रडतंय असं वाटणारा पाऊस लाखो वर्ष सुरूच आहे. मूळ अमेरिकेत लोकांनी-नावाजो आणि होपी टोळ्यांनी–पर्जन्यराजाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी वर्षा नृत्य करायला सुरुवात केली. नंतर इतर त्यांची वेशभूषा, पदन्यास आणि समारंभ शिकले. हे नृत्य वसंत ऋतूमध्ये पेरणीनंतर लगेच वा शरद ऋतूमध्ये केलं जातं अथवा ग्रीष्म ऋतूमध्ये पिकाला धोका आहे, दुष्काळ पडतोय असं वाटू लागलं तर केलं जातं. अमेरिकेच्या दक्षिणेकडील अनेक जमातींना ग्रीष्मातील हे नृत्य करावे लागते. कारण तिथे वारंवार दुष्काळ पडतो. पारंपरिक कर्मकांडानुसार वर्षा नृत्य हा त्यांच्या श्रद्धेचा एक भाग आहे.

1824 मध्ये ‘द ब्युरो ऑफ इंडियन अफेअर्स’ची स्थापना मूळ अमेरिकनांच्या आरक्षणाची व्यवस्था व जपणूक करण्यासाठी झाली. बीआयएने 1920 व 1930 च्या दशकांमध्ये टोळ्या वा जातीजमातींच्या धार्मिक नृत्यांवर बंदी घातली. वर्षा नृत्याप्रमाणेच सूर्य नृत्य अणि भूत नृत्यदेखील बेकायदा ठरविले. अर्थात, कोणत्याही सरकारने अशाप्रकारे बंदी घातलेल्या कृती, अनेक देशात छुप्याने चालू असताना दिसतात.

अलीकडच्या काही वर्षांत मात्र अमेरिकेतील सरकारचा देवावरचा विश्वास वाढल्यासारखा दिसतो. राज्यात पडलेल्या मोठय़ा दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जून 2007 मधे अलाबामा राज्याचे गव्हर्नर बॉब रिले यांनी तेथील लोकांना त्यांच्या त्यांच्या देवाला प्रार्थना करायला सांगितले. पिकं करपून जाण्याच्या भीतीने आणि सरकारचं लाखो डॉलर्सचं नुकसान होऊ नये म्हणून, टेक्सासचे गव्हर्नर रिक पेरी यांनी एप्रिल 22 ते 24, 2011 हे दिवस टेक्सासमध्ये पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करण्याचे असल्याचं घोषित केलं होतं.

आंतरराष्ट्रीयस्तरावर मात्र हा नृत्याचाच एक आविष्कार असतो. हेलसिंकी ते स्टॉकहोम या रात्रभराच्या बोटीच्या प्रवासात हा अनुभव सहजपणे मिळून जातो. (जसा मला मिळाला)

‘सिलया सेरेनेड’ या बोटीचं तिकीट काढतानाच, प्रवाशाला मध्यरात्री बोटीवर होणाऱया वर्षा नृत्याची कल्पना दिली जाते. संध्याकाळी बोटीवर चढल्यापासूनच सगळे प्रवासी रात्रीच्या बारा वाजण्याची वाट पाहू लागतात. आवडेल ते खातपित, वेळेआधी उत्सुक डोळ्यांनी सगळे स्थानापन्न होतात. बाराच्या ठोक्याला गडद निळ्या कपडय़ातील एक तरुणी हातात व्हायोलिन घेऊन स्टेजवर येते. स्टेजच्या मधोमध उभी राहून अभिवादन करून ती व्हायोलिन वाजवायला सुरुवात करते. लगेचच स्टेजच्या दोन्ही बाजूंनी निळसर-हिरवट रंगाचे तलम व ढगळ कपडे घातलेले अनेक तरुण-तरुणी हलकेच नृत्य करत दाखल होतात. सगळ्यांचे कपडे चमकत असतात. व्हायोलिनवाली पाऊस जाणिवेत भरू लागते. रिमझीम पाऊस मग हळूहळू वाढत जातो. नाचणाऱयांची पावलंही जास्त वेगाने थिरकू लागतात. मात्र पायांपेक्षा हात कमी हलत असतात. जसजसा व्हायोलिनचा वेग वाढत जातो तसतसं नृत्य करणाऱयांचं सारं शरीरदेखील जास्तच थिरकू लागतं. पावसाचा वेग हलणारी झाडं-वेली, गळणारी फुलं, अंगावर पडणारे पावसाचे थेंब अदाकारीतून दाखवले जातात. वेग वाढतो, थिरकणं वाढत जाते. शेवटी वेग एवढा वाढतो की नृत्य करणाऱयांचा पाय जमिनीवर टिकेनासा होतो. प्रेक्षकांची नजर एका जागी ठरत नाही. सगळं स्टेज पावसात भिजत असताना पावसाचे शिंतोडे आजूबाजूलाही उडतात. प्रेक्षकही पावसात चिंब भिजतात आणि धुंद होऊन नाचू लागतात. मग कोणत्या एका क्षणी तो संगीतात्मक पाऊस थांबतो.

पाऊस थांबवण्यासाठीदेखील एक नृत्य केलं जातं. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.