
>> मेधा पालकर
ज्येष्ठ इतिहासतज्ञ आणि विचारवंत डॉ. राजा दीक्षित यांची राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविलेल्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षपद आणि संपादकपदाची जबाबदारी डॉ. राजा दीक्षित या हाडाच्या संशोधकाकडे सोपवून राज्य सरकारने महाराष्ट्रातील व्यासंगी परंपरेचा गौरव केला आहे. इतिहास संशोधक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, चतुरस्र लेखक आणि व्यासंगी वक्ता ही सर्व विशेषणे डॉ. राजा दीक्षित यांना लागू होतात. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचे चालते बोलते इतिहासकार म. श्री. दीक्षित यांचा वारसा त्यांचे चिरंजीव श्रीधर तथा राजा दीक्षित समर्थपणे पुढे चालवीत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून आणि आंतरप्रणाली अभ्यास केंद्राचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी ठसा उमटविला आहे. तीसहून अधिक अभ्यासकांना त्यांनी एमफिल व पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. विज्ञान शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास अशा संशोधकांकडून दुर्लक्षित राहिलेल्या विषयांचा वेध आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून घेण्याबाबत त्यांनी पाठपुरावा केला. त्यांचे ‘आधुनिकता आणि केशवसुत’, ‘महाराष्ट्रातील मध्यमवर्ग’, ‘मराठीतील विज्ञानविषयक व इतिहासविषयक लेखन’ आदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ या जुन्या ग्रंथाचे संपादन व लेखन करून दीक्षित यांनी दीडशे वर्षे साजरे केलेल्या या संस्थेचा पट नव्या पिढीसमोर मांडला. त्यांच्या नियुक्तीमुळे विश्वकोशाचे कामकाज वेगाने पुढे जाऊ शकेल; मात्र त्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आणि सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आता विश्वकोशाच्या निमित्ताने वाईशी जुळलेले ऋणानुबंध वृद्धिंगत झाले आहेत, अशा भावना डॉ. दीक्षित यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर व्यक्त केल्या. ‘विश्वकोश आणि ज्ञानकोश ही ज्ञानाच्या लोकशाहीकरणाची साधने आहेत. त्यांचे सामाजिक पातळीवरील महत्त्व निरंतर आहे. विश्वकोशाला खूप प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे. तर्कतीर्थ लक्षमणशास्त्र्ााr जोशी, मे. पु. रेगे, प्रा. रा. ग. जाधव यांच्यासारख्या विद्वानांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. तिघांविषयी मला नितांत आदर आहे. 27 मे हा तर्कतीर्थ लक्षमणशास्त्र्ााr जोशी यांचा स्मृतीदिन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वर्धापनदिन. साहित्य परिषदेत दीपप्रज्वलनासाठी गेलो असताना म. श्री. दीक्षित पायरीचे दर्शन घेऊन आलो आणि जणू वडिलांचे आशीर्वादही मिळाले, हा विलक्षण योगायोग आहे,’ असे डॉ. राजा दीfिक्षत म्हणाले त्यालाही एक महत्त्व आहे. कारण विश्वकोश, ज्ञानकोश ही अभ्याससाधने आहेत. त्यांना कधीच पूर्णविराम नसतो. विश्वकोश ही प्रवाही प्रक्रिया आहे. विश्वकोशाचे 20 खंड प्रकाशित झाले असले तरी जुन्या नोंदींची फेररचना, काळाच्या ओघात कराव्या लागणाऱया दुरुस्त्या, नव्या नोंदींची भर हे काम अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. नवतंत्रज्ञान, जागतिकीकरणाच्या युगात विश्वकोशामध्ये नव्या युगाचा संदर्भ महत्त्वाचा असतो. अभ्यास साधनांचे सामाजिक संदर्भातील मूल्य मोठे असते. आजवर ज्ञानापासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत विश्वकोश पोहोचावा, यासाठी प्रयत्न करेन असं दीक्षित यांनी सांगितले आहे. त्यांना त्यांच्या कार्यकाळात सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात यश लाभो. तसे झाले तर ते मराठी, महाराष्ट्रच नव्हे तर सगळय़ांच्याच दृष्टीने लाभदायी ठरेल.






























































