मालिक

>> मिलिंद शिंदे

राजेश पिंजानी. नाव अमराठी पण पदार्पणातच त्यांचा बाबु बँड बाजा या मराठी चित्रपटाने दिल्ली गाठली

कॅम्प-टी कॅण्टोनमेंट (लष्कराची छावणी)

ही नागपूर शहराला लागून असलेली हिंदुस्थानी लष्कराची छावणी… सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर शेजारच्या देशातून अनेक परिवार हिंदुस्थानात आले. त्यात पिंजानी कुटुंबीय होते. ते आले… ते कॅम्प-टी छावणीत राहिले. आणि मग स्थायिक झाले. तिथेच, त्याच परिसरात एक मुलगा होता राजेश पिंजानी… तो मोठा होत होता, पण त्या संपूर्ण कालौघात कॅम्प-टी कॅण्टोनमेंटचे नाव कॅण्टोनमेंट कधी झाले ते कुणालाच उमगलं नाही. पण त्या लष्करी छावणीतून राजेश पिंजानी नावाचा हिंदुस्थानी सिनेमासाठी महत्त्वाचं पान असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराला गवसणी घालतो आणि त्या आपल्या कॅण्टोनमेंटमध्ये घेऊन जातो… आपल्या आईला दाखवतो, आपल्या परिवाराला दाखवतो किती वेदनांवर फुंकर या एका सन्मानानं मिळाली असेल आणि त्याचा आनंद आपण मोजमाप करू शकत नाही इतका आहे.

तो साधा आहे फार… त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ‘बाबू बॅण्ड बाजा’ या सिनेमासाठी. पण त्याच्या वागण्यात ते दिसत नाही… अगदी साधा आहे… एकदम विरघळून जातो. इतका की हा पुरस्कार यालाच मिळालाय? हाच त्या सिनेमाचा दिग्दर्शक आहे? हा आहे डायरेक्टर? असे प्रश्न उपस्थित व्हावे इतका साधा. तो स्वतःला आपण काही आहोत, असे काही मानतच नाही. नाहीतर अलीकडे पिंपळगाव मौजे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एखादं पारितोषिक मिळालेला कलाकारही ऐकत नाही कुणाला… त्याला माणसं आवडतात. तो त्यांच्यात रमून जातो.

पत्रकार म्हणून त्यानं सुरुवात केली. मग त्याला जोडून त्यानं अलीकडेच नव्यानं अवतरत असलेला उद्योग (इव्हेंट मॅनेजमेंट) सुरू केला. त्यात तो बऱयापैकी रमला. मग वॉकमनवर गाणी ऐकणारी पिढी अस्तंगत होत गेली आणि मोठ्ठा संगणकही छोटा होऊ लागला, जोडून संगणकाला डिजिटलला जनक करणारी जनरेशन आकार घेऊ लागली. प्रवाहाचा भाग होत राजेश जाहिरातीकडे वळला आणि मग त्याला माहितीपट खुणावू लागले. त्यातूनच साकार झाला ‘उडान’ नावाचा माहितीपट. स्मिता जाधव आणि राजेश पिंजानी यांनी मिळून तयार केलेल्या माहितीपटाला खूप ठिकाणी गौरविण्यात आले. मुलगी वाचवा या विषयावरच्या माहितीपटाची सर्वदूर चर्चा झाली. पण इथून सृजनाची भूक तयार झाली आणि त्या क्रिएटिव्ह हंगरमधून काहीतर वेगळं करावं यातून राजेशनं पुणं गाठलं. सोबतीला स्मिता जाधव होत्याच…

पुणे आणि ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (पीआयएफएफ) याचं अतूट नातं आहे. ओघातच राजेश या महोत्सवाला हजेरी लावू लागला. आणि त्याचा चित्रपटविषयक दृष्टिकोन एकदम बदलला. तो आपल्या डोक्यात ज्या सिनेविषयक कल्पनाशी झगडू लागला आणि तो त्याच्या डोक्यात असलेल्या सिनेमाचा शोध घेऊ लागला. तिथून एक बीज अंकुरलं राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘बाबू बॅण्ड बाजा’ लेखन शंतनू रोडे, छायाचित्रण राजेश फडतरे, निर्मिती अर्थातच स्मिता जाधव यांची… या संपूर्ण प्रक्रियेत पुरुषोत्तम जाधव आणि त्यांचा परिवार राजेशसोबत होताच.

इथं योग आला आमच्या भेटीचा…
मैं एक फिल्म बना रहा हूं… मुझे आपके कुछ फोटोग्राफ्स चाहिए भेज दिजिए…
मी म्हणालो, ‘‘गुगलला जा तिकडे माझे खूप फोटो आहेत. व्हिडिओज आहे ते पहा’’ माझ्या कदाचित त्याला उद्धट वागणाऱया बोलण्यामुळं एखादा म्हणाला असता की हा कलाकार नकोच आपल्याला. किती तो उद्धट? पण त्याने पुन्हा फोन केला… कथानक ऐकवलं आणि आमचं मैत्र जुळलं ते आजतागायत…

तो चिकाटीचा आहे. सिनेमातला ‘बाबू’ या लहान मुलाच्या शोधासाठी त्याने अनेक ऑडिशन्स (चाचणीसत्र) घेतल्या. हवा तसा मुलगा मिळेपर्यंत. शेवटी विवेक चाबुकस्वार या मुलाला निवडलं. त्यालाही त्या वर्षीचा बालकलाकारासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्याने निवडलेल्या (अमर्याद अनेक चाचणीसत्रांनंतर) मिताली जगतापला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय सन्मान मिळवून दिला. या सगळय़ा पुरस्कारांचं श्रेय तो आपला ज्येष्ठ बंधू मुरलीधर पिंजानी यांना देतो. त्यांच्यामुळेच हे शक्य झालं असं तो मानतो. चित्रीकरणादरम्यान त्याला अनंत अडचणी आल्या. त्यावर तो मात करत होता. पण एक दिवस त्याला एका कलाकाराचं (सिनीयर) काम पसंत पडत नव्हतं. तो जे सांगत होता आणि त्या जे करत होत्या… ते काही जुळून येत नव्हतं. शेवटी त्याला हवं तसं मिळत नसल्यानं त्यानं शूटिंग थांबवलं. जणू काही काहीच झालं नाही की आजचं पॅकअप… उद्या भेटू. इतकं सहज साधं. रात्री तो माझ्या खोलीत आला आणि त्याची घुसमट सांगितली.. आणि निर्णयही सांगितला की मला ‘कंफर्टेबल’ वाटतं का? आपण बदलूया. आणि नावं सुचवली… मी काही नावं सुचवल त्यातलं त्यानं एक फायनल केलं. पण सिनेमाक्षेत्रातले जाणकार समजू शकतात की चालू शूटिंगमध्ये कलाकार बदलणं किती जिकरीचं आहे. सर्व अर्थाने. पण त्याला हवं तसं काम होत नाही, मिळत नाही म्हणून त्यानं हा निर्णय घेतला होता. त्याच्या या हिमतीला आणि त्याच्या

सिनेनिर्मितीच्या प्रामाणिकतेला नमन…
अनंत अडचणी, मग दुरुस्त्या, कायदेशीर लढाया यातून सिनेमा मार्ग काढत थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचला… पण हा साधाच होता. जमिनीवरचा एकदम. आणि जो पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाहून त्यानं प्रेरणा घेतली होती तिथलाच तो सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान घेणारा विजेता होता. काय सुखद योगायोग. इथंच राजा फडतरेलाही सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा बहुमान मिळाला… मग सिनेमा जगभर फिरला. राजेशही सिनेमासोबत होताच अनेक महोत्सवांत… साधारणतः सिनेमा संपला की या प्रोफेशनल युगात बंध संपतो. पण आमचा अर्थात आणखी घट्ट झाला. आम्ही आणखी जवळचे मित्र झालो… अर्थात हे सगळं त्यानंच सांभाळलंय मी थोडा जरा अगदीच हा आहे ना म्हणून…

मला आठवतंय जेव्हा त्यानं मला सिनेमासाठी करारबद्ध केलं तेव्हापासून मी चर्चांसाठी जेव्हा जेव्हा पुण्याला जात असे, राजेश माझा संपूर्ण प्रवास ‘मॉनिटर’ करत असे… कहाँ पहुचे? क्या खाया? कितना टाइम? खाने को क्या मंगाऊ… इ.. इ..

सतीश राजवाडेच्या एका सिनेमादरम्यान मला अचानक पायाच्या दुखण्यामुळे इस्पितळात भरती व्हावं लागलं. मग मला सासवडवरून पुण्याला हलवलं. सर्व तपासण्यांनंतर मला आणि सगळय़ांनाच त्या दुखण्याचं गांभीर्य लक्षात आलं आणि मला पहिला पुण्यात भेटणारा व्यक्ती (माणूस) होता राजेश पिंजानी… मी सात दिवस इस्पितळात होतो… राजेश पिंजानी हा माझं सगळं पाहत होता… माझ्या रिपोर्टस्पासून ते बिलापर्यंत.

पोलीस अधिकारी महेश सरतापे आणि राजेश पिंजानी सदैव माझ्या सोबतीला होते त्यावेळी. कारण मी इस्पितळात भरती आहे हे मी घरी सांगितलं नव्हतं… सगळं पिंजानी आणि सरतापे पाहत होते… चित्रपट कंपनी कधी मी बरा होणार याची वाट पाहत होती आणि डॉक्टर त्यांना माझा आजार किती सिरीयस आहे, मला विश्रांतीची गरज आहे हे सांगत होते… आणि पिंजानी मला ‘तेरे को कुछ नही हुआ’ है, हे सांगत होता…

डिस्चार्ज जरी मिळाला तरी मला डॉक्टरांनी चित्रीकरण न करण्याची ताकीद दिली होती. आणि घरीपण (नगरला) न जाण्याची समज दिली होती. इथंच रहा पुण्यात, कुणी आहे का…? अनेक नावं होती. एका नावावर मी ठाम होतो… पण मी काही बोलायच्या आत राजेशच म्हणाला मी आहेना… ‘मैं हूं’. राजेश माझा त्या हॉस्पिटलच्या कागदपत्रावर लोकल गार्डीयन होता. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. मलाच नाही माझ्या स्टाफलाही. (माझा असिस्टंट आणि चालक) आम्ही राहिलो तिथे. दररोज माझं रक्त चेक करणं… माझे रिपोर्टस तपासणं, गुगलला जाऊन त्याचं ऍनलेसीस (पडताळणी) करणं हे राजेश करत होता… माझ्या आहारावर त्याचं जातीनं लक्ष होतं. मी त्या आजारात थकून जाऊ नये म्हणून तो त्याचे सिंधी जोक्स मला सांगायचा आणि संजय पाखमोडे या त्याच्या डॉक्टर मित्राचेही किस्से सांगायचा. शेवटी डॉक्टरांनी मला चित्रीकरणाची परवानगी दिली. अर्थात सतीश राजवाडेनं त्याचं सगळं शेडय़ुल बदललं नसतं तर मला त्या सिनेमाला सोडावं लागलं असतं. पण सतीश थांबला. मला भारी वाटलं. राजेशच्या घरातून चित्रीकरणाला निघालो… मी राजेशला मिठी मारली आणि माझ्या डोळय़ांतून कृतज्ञतेचे थेंब पडू लागले… मी रडू लागलो… राजेश रडला नाही पण… छातीला छाती होती… मनाला भिडणारं मन होतं… त्याच्या डोळय़ातून टिपूस नाही पडलं… पण त्याच्या छातीतली गदगद मला धडकली होती… पूर्ण प्रवासभर मी राजेशनं माझ्यासाठी केलेल्या मदतीची उजळणी पुनः पुन्हा करत होतो… आणि मला अश्रूही येत होते.

आम्ही नेहमी फोनवर एकमेकांना ‘मालिक’ म्हणतो ‘तो मालिक कनीज से कब मिल रहे हो? मग पिंजानी म्हणणार… मालिक आपही आते नही…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या