
>> नवनाथ दांडेकर
जेमतेम 16 वर्षांचा आर. प्रज्ञानंद अभिमन्यूसारखा आईच्या पोटातूनच बुद्धिबळाचे धडे घेऊन या जगात जन्माला आला. चेन्नईत जन्मलेल्या या बालरत्नाने लहानपणापासूनच आपले बुद्धिबळातील खेळ चातुर्य दाखवायला सुरुवात केली होती. कारण आई आणि वडील हे दोघेही बुद्धिबळाचे निस्सीम चाहते. मोठी बहीण बुद्धिबळातील महिला ग्रँडमास्टर. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत प्रज्ञानंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून हिंदुस्थानच्या महान बुद्धिबळपटूंच्या पंगतीत जाऊन बसण्याचा भीमपराक्रम साकारला.
प्रज्ञानंद ऊर्फ प्रग्गूने सातव्या वर्षी 2013 मध्ये अंडर 18 गटाचे जागतिक विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केलाय. त्यानंतर 2015मध्ये त्याने अंडर 10 वयोगटाचे जगज्जेतेपद पटकावत आपल्या शिरपेचात मानाचे आणखी एक मोरपीस खोवले. आता सोळाव्या वर्षी जगज्जेता आणि जगातील नंबर वन बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. भारतभूमी ही नररत्नांची आणि अवतारी व्यक्तींची खाण आहे असे म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय प्रज्ञानंदने आपल्या बुद्धिबळातील मेगा यशाने दाखवून दिला आहे. माजी बुद्धिबळ विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याला जागतिक ज्युनियर विश्वविजेतेपद पटकावण्याची वयाच्या 18व्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती, तर रमेशबाबू प्रज्ञानंदने वयाच्या 10व्या वर्षीच जागतिक बुद्धिबळातील बाल आणि ज्युनियर विश्वविजेतीपदे पटकावण्याचा पराक्रम केला आहे. प्रज्ञानंदची मोठी बहीण वैशाली रमेशबाबू हीसुद्धा हिंदुस्थानची महिला ग्रँडमास्टर आहे.
चेन्नई येथे 10ऑगस्ट 2005 ला एका क्रीडाप्रेमी कुटुंबात जन्मलेला प्रज्ञानंद बालपणापासूनच चौकस आणि चतूर बुद्धीचा आहे. त्याने कमी वयातच बुद्धिबळाच्या पटावरील आपली बुद्धी दाखवायला सुरुवात केली होती. घरातच बुद्धिबळाचे वातावरण असल्याने प्रज्ञानंदला आपल्या खेळात वेगाने प्रगती साधता आली. 12 वर्षे 10 महिने 13 दिवस इतक्या कमी वयात बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर बनणारा प्रज्ञानंद हा जगातील सर्वात कमी वयाचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला. त्याच्या आधी रशियाचा सर्जेई कर्जाकिन याने 10 वर्षे 7 महिने या वयात ग्रँडमास्टर बनण्याचा पराक्रम साकारला होता. कर्जाकिन आणि प्रज्ञानंद यांचा विक्रम मोडत हिंदुस्थानच्या अभिमन्यू मिश्रा याने 12 वर्षे 4 महिने 25 दिवस इतक्या कमी वयात ग्रँडमास्टर किताब पटकावण्याचा पराक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. याशिवाय जगज्जेत्या कार्लसनला हरवण्याचा पराक्रम करणारा तिसरा हिंदुस्थानी बुद्धिबळपटू म्हणून प्रज्ञानंदच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. याआधी असा पराक्रम माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि ग्रँडमास्टर पी. हरिबाबू यांनी साकारला आहे. एअर थिंग्स रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन याला 39 व्या चालीत पराभव पत्करायला लावून प्रज्ञानंदने जगातील भल्याभल्या बुद्धिबळपटूंना आश्चर्याने चकीत केले आहे.
प्रज्ञानंदने टाटा इंडिया चेस ब्लिट्झ स्पर्धेत वयाच्या 12 व्या वर्षी हिंदुस्थानचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदशी अगदी धाडसाने दोन हात केले. आनंदही या छोटय़ा ग्रँडमास्टरच्या खेळाने अतिशय प्रभावित झाला होता. या छोटय़ात प्रचंड बुद्धिमत्ता असून त्याचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा अभिप्राय आनंदने या स्पर्धेत खेळताना दिला होता. जपानचा अग्रगण्य बुद्धिबळपटू नाकामुरा यालाही प्रज्ञानंदने आपल्या खेळाने प्रभावित केले होते. विश्वनाथ आनंदचा विश्वास प्रग्गूने आता सार्थ ठरवला आहे. याशिवाय कार्लसन या महान खेळाडूला पराभूत केले म्हणजे मी कुणी महान बुद्धिबळपटू ठरत नाही अशी प्रतिक्रिया देत प्रज्ञानंदने मोठय़ा यशानंतरही आपले पाय जमिनीवरच आहेत हे दाखवून आपल्यातील महान गुणांची प्रचीती सर्वांना दिली होती. प्रज्ञानंदला आता आस लागली आहे ती आपल्या आपल्या पहिल्या जगज्जेतेपदाची. त्याची जिगर, विश्वास आणि प्रचंड बुद्धी पाहता लवकरच आनंदसारखा प्रज्ञानंद बुद्धिबळ जगज्जेता झाल्याचा आनंद लवकरच हिंदुस्थानी क्रीडाशौकिनांना लाभेल अशी अपेक्षा आहे.






























































