पोलीस डायरी : न्यायमूर्तींनीही हात जोडले, आता देवावरच भरोसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । मुंबई  

पंधरा दिवसांपूर्वी चेन्नईच्या एका न्यायमूर्तींनी वाहन अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका याचिकाकर्त्याला नुकसानभरपाईचा आदेश देताना एका मोटरसायकलस्वारास अशरशः हात जोडले. ते म्हणाले, मी तुला हात जोडतो, पण येथून पुढे तू Rash Driving करू नकोस. अतिवेगामुळे निरपराध्यांचे बळी जातात. मोटरसायकलस्वार असोत अथवा अन्य वाहनचालक असोत त्यांनी वाहतुकीचे नियम हे पाळलेच पाहिजेत, असेही न्यायमूर्तींनी त्याला बजावले. तेव्हा सारे कोर्ट थक्क झाले. न्यायमूर्तीही माणूसच असतो. त्यांनाही भावना असतात. त्या त्यांनी भरन्यायालयात व्यक्त केल्या. याची बेफामपणे वाहने चालविणारे विशेषतः मोटरसायकलस्वार थोडी तरी बूज राखतील अशी अपेक्षा करूया. चेन्नईच्या न्यायमूर्तींच्या आवाहनाचा पुणेकरांवर काही परिणाम होईल असे वाटत नाही. कारण पुणे शहरातील बहुसंख्य वाहनचालकांनी हेल्मेट बंदीलाच विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पुणे शहरात वाहन अपघातात 1 हजार जणांचे बळी गेले आहेत. तरीही पुणेकर हेल्मेट वापरायला तयार नाहीत. वाहतूक पोलिसांनी मुंबईसह महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दंड वसुली करण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे, ई-चलान पद्धत अद्ययावत केली आहे. नवीन कॅमेरा व मशीन्समुळे कुठेही नियम मोडला गेला तरी वाहतूक विभागाला त्याची माहिती मिळते आणि ई-चलान घरी पोहोचते. त्यामुळे सुमारे 100 कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम मुंबई वाहतूक पोलिसांना वाहनचालकांकडून येणे बाकी असून न्यायालयाच्या आदेशावरून ती रक्कम सरकारच्या तिजोरीत आज ना उद्या जमा होणारच आहे. कारण बरेच वाहनचालक दंड ठोठावूनही त्याची पूर्तता लगेच करीत नाहीत. त्यामुळे बरीच दंड वसुलीची प्रकरणे प्रलंबित आहेत.

अलीकडे वाहतूक पोलीस अधिक सतर्क झाल्यामुळे मृत्यूची संख्या काहीशी कमी झालेली आहे. तरीही मुंबईसारख्या शहरांमध्येही दरवर्षी सुमारे 500 जणांचा वाहन अपघातात बळी जात आहे. गेल्या वर्षी 475 जण वाहन अपघातात ठार झाले, त्यात 20 ते 25 वयोगटांतील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. विशेष म्हणजे अलीकडे स्कूटर चालविताना तरुण मुलींनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत. हातातोंडाशी आलेली तरुण मुलं मोटारवाहन अपघातात बळी पडतात. त्याला अनेकदा रॅश ड्रायव्हिंग कारणीभूत असते. वेगाचे टेम्पटेशन सर्वांचा घात करीत आहे. मुंबईत वाहतुकीची प्रचंड कोंडी असतानाही रोज सरासरी दोघांचा तरी वाहन अपघातात बळी जात आहे, तर रोज महाराष्ट्रात 30 ते 40 जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. बंगळुरू, चेन्नई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, कोलकाता, अहमदाबाद आदी शहरांतही तीच परिस्थिती आहे. दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांमध्ये काहीशी घट झाली, परंतु अपघात मात्र कमी झालेले नाहीत. अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी 4500 वाहनचालकांचे परवाने रद्द केले, तर महाराष्ट्रात  अलीकडे 14 हजार वाहन परवाने बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांना जरब बसावी म्हणून कॅन्सल करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रात बेदरकारपणे वाहने चालविणार्‍यांविरुद्ध अशीच धडक कारवाई सुरू राहिली तर नक्कीच अपघातांवर नियंत्रण येईल. मृत्यूंची संख्या घटेल.

आज आपल्याकडे वाहनचालकांची नीट वैद्यकीय तपासणीच होत नाही. आज मानवी चुकांमुळे सुमारे 70 टक्के अपघात होत असतात. अपुरे ज्ञान, शारीरिक व मानसिक दुर्बलता, मद्यपान आदी चुकांमुळे अपघात घडत असतात. आज आपल्या देशात दरवर्षी सवा ते दीड लाख लोक वाहन चालविताना मरण पावतात तरीही लोक कोणतीही काळजी घेत नाहीत याचे दुःख वाटते. आज न्यायमूर्तीसारख्या सर्वज्ञ व्यक्तीला वाहनचालकांसमोर हात जोडावे लागतात, विनंती करावी लागते यासारखी शोकांतिका नाही. आपल्या देशात शिस्त न पाळणे हाच नियम झाला आहे. आज नियम पाळणार्‍यांना आपल्या देशात मूर्ख समजतात, तर सिग्नल तोडणार्‍यांना शहाणा समजतात. मग असेच शहाणे लोक स्वतःचे व निरपराध्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत. वेगाच्या मोहात असलेल्या व अतिघाई करणाऱया वाहनचालकांपासून सावध राहाणे हाच एकमेव उपाय आहे. आज आपल्याकडे नैसर्गिक व आजारपणामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांपेक्षा अपघातात मरण पावणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा बायरोड प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखेच आहे. स्टिंअरिंगवर बसलेला व रेसिंगच्या धुंदीत असलेला कुठला यम आपल्या अंगावर येईल आणि आपला बळी घेईल याचा नेम नाही. गेल्या वर्षभरात मुंबईसह महाराष्ट्रात 11 हजार दारुड्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. यावरून आपला देश कुठे चालला आहे ते पहा! स्वतःच्या जिवाची, कुटुंबीयांची काळजी नाही असे दारुडे कुणाचाही बळी घेत आहेत. त्यामुळे आपणही देवावर भरोसा ठेवूनच जीवनाची वाटचाल करूया!