मतकरींची नाटय़लेखणी अभिवाचनातून प्रकटली

713

>> क्षितिज झारापकर

गांधीअंतिम पर्वरत्नाकर मतकरींच्या नाटकाचे अभिवाचन ऐकणे हाही एक संपन्न अनुभव असतो.

नाटक मुळात कुणाचं? या प्रश्नाचं उत्तर आजवर अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर काही सापडलं नाही. नाटक नाटककाराचं म्हणावं तर हल्ली नाटय़लेखक नाहीत अशी आवई उठते आहे. नाटय़ संहिता लेखनाची मार्गदर्शनपर शिबिरं होताहेत. नाटय़लेखन स्पर्धा होताहेत आणि तरीही मराठी रंगभूमीची फॅक्टरी वर्षाला पंच्याहत्तर ते शंभर नाटकं रंगमंचावर आणतेच आहे. नाटक दिग्दर्शकाचं म्हणावं तर मराठी नाटय़सृष्टीच्या इतिहासातल्या सुवर्णकाळात प्रेक्षक पसंती पावलेल्या बऱयाचशा नाटय़कृतींना लेखकाने दिलेल्या (कंसातल्या ) सूचना तंतोतंत पाळून नाटक उभं करणारे तालीम मास्तर असत. दिग्दर्शक ही संकल्पना नंतर आली असावी. नाटक हे नटांचं म्हणावं तर स्वतःच्या खांद्यावर नाटकाचा भार पेलू शकणारे नट आज हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच उरले आहेत. तरीही नाटकं येतच आहेत. त्यामुळे नाटक हे माध्यम नेमकं कुणाचं? या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. विद्यापीठाच्या नाटय़विषयक अभ्यासक्रमात कदाचित ते असेलही, पण तिथलं काहीचं प्रचलित रंगभूमीला लागू होत नाही. मग याचं उत्तर तरी कसं होईल, परंतु सध्या नाटय़क्षेत्रात एक विलक्षण चळवळ सुरू आहे आणि त्या चळवळीतून कदाचित या प्रश्नाचं उत्तर सापडू शकेल.

ratnakar-matkari

नाटय़ अभिवाचन ही एक सध्या प्रचंड जोर पकडत चाललेली नाटय़क्षेत्रातली नवीन शाखा आहे. नाटक ही एक सांघिक क्रिया आहे असं मानलं तर मग वरील नमूद सर्व बाबतीचं योगदान असल्यावरच नाटक शक्य आहे असं होतं पण नाटक एक क्रिएटिव्ह क्रिया आहे. त्यामुळे समजा एखादी बाजू नसेलच तरी उरलेल्यांच्या क्रिएटिव्हिटी मधून नाटक शक्य आहे हे या नाटय़ अभिवाचनाच्या चळवळीतून दिसून येतं. नाटक सुचतं ते नाटककाराला. नाटककाराच्या वैचारिक कल्पकतेमधून नाटक जन्माला येतं. सगळय़ांची सगळी नाटकं काही रंगमंचावर सादर होत नाहीत. कारण निर्मिती प्रक्रियेतील निर्माता हा घटक सर्वव्यापी असतो. त्याला पटलं तरच नाटक रंगमंचावर दिसू शकतं. मग बाकीच्या नाटकांचं काय? इथे हा अभिवाचनाचा घाट उपयोगी येतो. अभिवाचन ही काही नवीन संकल्पना नव्हे. पूर्वी निर्मात्यांकडे काही निवडक श्रोत्यांसमोर नाटककार आपलं नाटक वाचत. आज थेट प्रेक्षकांच्या समोर आपलं नाटक वाचण्याचा घाट नाटय़ अभिवाचनाच्या माध्यमातून नाटककार घालताना दिसताहेत. यात नाटय़सृष्टीला खूप फायदे आहेत. सादरीकरणासाठी नाटय़गृह, नेपथ्य, प्रकाश योजनेची गरज नसते. त्यामुळे हे अत्यंत अल्प खर्चात शक्य असतं. कलाकारही लागत नाहीत. केवळ नाटक, नाटककार आणि प्रेक्षक एवढंच गरजेचं असतं. केवळ नवीन, होतकरू नाटककार हा मार्ग स्वीकारतात असंही नाही. परवा माध्यम या संस्थेतर्फे ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या ‘गांधी – अंतिम पर्व’ या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम केला गेला. विलक्षण वेगळ्य़ा पद्धतीने स्वतः मतकरींनी ‘गांधी – अंतिम पर्व’ साठय़े कॉलेजमध्ये सादर केलं.

‘गांधी – अंतिम पर्व’ हे नाटक महात्मा गांधींच्या जीवनातील शेवटच्या तीन आठवडय़ांतील घडामोडींवर आधारित आहे. महात्मा गांधी हे नाटकाचे नायक आहेत. इतिहासात नोंद असलेल्या घटनांवर कोणतंही स्वतःचं भाष्य न करता मतकरींनी हे नाटक प्रस्तुत केलंय. ही गोष्ट विशेषतः महाराष्ट्रातल्या लेखकाकडून होणं कठीण आहे. गांधींच्याबद्दल बाकीच्या हिंदुस्थानपेक्षा महाराष्ट्रात खूप वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यात या नाटकाचा काळ गांधींच्या शेवटाकडचा. त्याचा क्लायमॅक्स साहजिकच महाराष्ट्राशी निगडित असणार. तरीही स्वतःचं मत येऊ न देता मतकरींनी हे शिवधनुष्य शिताफीने पेललेलं आहे म्हणून त्यांना वंदन. नाटकाच्या स्ट्रक्चरमध्येही मतकरींनी गंमत केली आहे. कादंबऱयांना जसा प्रोलॉग असतो तसा या नाटकात सुरुवातीला एक प्रस्तावनावजा छोटा प्रवेश आहे. बाकी प्रवेशांमध्ये सावल्यांच्या माध्यमातून घडणारे छायाप्रवेश आहेत. रत्नाकर मतकरी हे नाटकाच्या क्रांिंफ्टगमध्ये मास्टर मानले जातात याचं कारण यातून समजतं.

मतकरींनी ‘गांधी – अंतिम पर्व’च्या अभिवाचनातही गंमत केली आहे. बालनाटय़ चळवळीपासून रत्नाकर मतकरींची शिस्तबद्धता सर्वश्रुत आहे. ती शिस्तबद्धता या सादरीकरणात दिसून आली. स्वतः मतकरी धरून तब्बल नऊ वाचक कलाकारांच्या सहाय्याने ‘गांधी – अंतिम पर्व’ हे नाटक वाचिक अभिनयाच्या माध्यमातून उभं केलं गेलं. त्यातील प्रत्येक पात्राला वाचनाची तालीम करून जीवंत केलं गेलं. या सगळ्याचा परिणाम असा की, हा नाटय़ प्रयोग नसूनही जमलेले सर्व श्रोते मुग्ध होते. माहीत असलेला इतिहास इतक्या प्रभावीपणे मांडला गेल्यावर ही प्रतिक्रिया स्वाभाविकच होती. संजीव तांडेल, अभिषेक साळवी, रोहित मावळे, आदित्य कदम, योगेश खांडेकर, अपूर्वा परांजपे आणि दीप्ती दांडेकर या वाचक कलाकारांनी रत्नाकर मतकरींसोबत अत्यंत नाटय़पूर्ण अभिवाचनाची अनुभूती दिली. सादरीकरणादरम्यान या सर्वांची बसण्याची जाग ठरवण्यातही शिस्तबद्धता दिसत होती. मतकरी गांधी वाचत होते तर मनू वाचणारी अपूर्वा त्यांच्या शेजारी बसली होती. दीप्ती दांडेकर केवळ नाटय़ संहितेतील कंसातील सूचना वाचत होती. एकाच प्रवेशातील इतर पात्र वाचणारे अगदी शेजारी नसतील याची खबरदारी घेतलेली होती. याचा एकूण परिणाम ‘गांधी – अंतिम पर्व’ नुसत ऐकतानाही प्रयोगाचा फील यावा असाच होता.

माध्यम या संस्थेतर्फे नाटय़क्षेत्रात विविध नवनवीन कार्यक्रम सादर करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात. त्यात नाटकाच्या अभिवाचनाचा हा आगळावेगळा सोहळा खूप छान जमून गेला. जी नाटकं निर्मात्यांच्या अभावामुळे रंगमंचावर येऊ शकत नाहीत ती नाटकं या माध्यमातून लोकांपुढे निश्चित येऊ शकतील. या कार्यक्रमाचा खर्चही कमी असल्याने असे प्रयत्न जर सामान्य पेक्षकांकरिता केले गेले तर त्याचे तिकीट दरही माफक स्वरूपाचे ठेवता येतील आणि एकूणच नाटय़क्षेत्राला याचा खूप मोठा फायदा होईल.

नाटक         गांधी-अंतिम पर्व

निर्मिती       माध्यम

लेखक        रत्नाकर मतकरी

अभिवाचक   संजीव तांडेल, अभिषेक साळवी, रोहित मावळे,आदित्य कदम, योगेश  खांडेकर, अपूर्वा परांजपे,  दीप्ती दांडेकर आणि  रत्नाकर मतकरी

दर्जा            

आपली प्रतिक्रिया द्या