साय-फाय – आभासी जगताचे वास्तव

>> प्रसाद ताम्हनकर ([email protected])

अनुराग द्विवेदी हे सोशल मीडिया अर्थात आभासी जगतातले एक प्रसिद्ध नाव. फॅटसी क्रिकेट एक्सपर्ट आणि यूटय़ूबर म्हणून प्रसिद्ध असलेला अनुराग द्विवेदी सध्या त्याच्याशी संबंधित 10 ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यांमुळे चर्चेत आलेला आहे. या छाप्यात करोडो रुपयांच्या आलिशान चारचाकी गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यात अनुरागची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात समोर आल्याने ही कारवाई केल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

17 डिसेंबरला दिल्ली, लखनऊ, उन्नाव अशा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली.  अनुरागच्या यूटय़ूब चॅनेलवर 70 लाख सदस्य आहेत, तर इंस्टाग्रामवर 24 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तरुणाईमध्ये खास प्रसिद्ध असलेल्या अनुरागवरती अशा प्रकारे आरोप लागल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. अनुरागने फक्त बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मला प्रोत्साहनच दिले नाही, तर त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यांमध्ये बऱयाच मोठय़ा रकमा वेळोवेळी जमा झालेल्या असून, या रकमेचा कोणताही कायदेशीर हिशेब मिळालेला नाही. एवढेच नाही तर अनुरागने हवाला चॅनेलच्या माध्यमातून बनावट खाती उघडून या बेकायदेशीर बेटिंग अॅपमधून मोठय़ा प्रमाणावर पैसे देखील कमावलेले आहेत.

अनुराग सध्या हिंदुस्थानच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणावर अनुरागने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिािढया दिली असून हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अनुरागने यावेळी प्रसार माध्यमांनादेखील दोषी ठरवले आहे. मला स्वत विषयी जेवढी माहिती नाही, तेवढी प्रसार माध्यमांनी दोन दिवसांत गोळा केली आहे असे त्याने म्हटले आहे. कोणीही उठतो आणि काहीही रकमेचे आकडे जाहीर करतो. हा सगळा मूर्खपणा आहे. लोक मीडियाला कसे सहन करत असतील हे मला आता समजते आहे, असेदेखील त्याने लिहिले आहे. कधी काळी आपण सायकलवर हिंडायचो असे सांगणाऱया अनुरागकडे लॅम्बोर्गिनी, मर्सिडिज आणि बीएमडब्ल्यूसह अनेक आलिशान गाडय़ा सापडल्याने चाहते मात्र थक्क झाले आहेत.

अनुरागकडे 190 कोटीची संपत्ती असल्याचा दावा त्याने एका पॉडकास्टमध्ये केला असल्याची चर्चादेखील मोठय़ा प्रमाणावर होत आहे. आलिशान आयुष्य जगणारा अनुराग सगळ्यात जास्ती चर्चेत आला तो त्याच्या लग्नामुळे. 22 नोव्हेंबर रोजी त्याने लखनऊच्या एका मुलीशी दुबईमध्ये अत्यंत खर्चिक सोहळ्यात विवाह केला. या लग्नासाठी त्याने आपल्या नातेवाइकांच्या जोडीने गावातील 100 लोकांनादेखील स्वखर्चाने दुबईला नेले होते. तिथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची सर्व व्यवस्थादेखील अनुरागने केली होती. त्याचा हा थाटमाट आणि प्रसिद्धीचा दिखावाच त्याला अडचणीत टाकून गेल्याची चर्चा आहे.

5 जून 2025 रोजी ईडीने एका ऑनलाईन बेटिंग रॅकेटला उद्ध्वस्त केले होते. या प्रकरणातील आरोपींकडून पुढे 17 ाsढडिट कार्ड आणि 10 कोटी कॅश जप्त करण्यात आली. पकडण्यात आलेल्या आरोपींकडे अनेक म्यूल अकाउंट असल्याचेदेखील समोर आले होते. म्यूल अकाउंट म्हणजे अशी बँक खाती की, जे असतात एकाच्या नावावर मात्र त्याचे सर्व व्यवहार दुसराच कोणी हाताळत असतो. यावेळी काही सोशल मीडिया इन्प्लुएन्सर्स, यूटय़ूबर अशा बेकायदेशीर बेटिंग रॅकेटला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ बनवत असल्याचे आणि त्याद्वारे सामान्य लोकांना या बेटिंग अॅपकडे आकर्षित करत असल्याचेदेखील उघड झाले होते. असे व्हिडीओ बनवण्यासाठी या लोकांना प्रचंड मोठी रक्कम देण्यात आली होती. व्हिडीओ बनवण्याच्या जोडीने या लोकांनी सामान्य लोकांना या रॅकेटशी संबंधित म्यूल अकाउंटमध्ये पैसे भरण्यास आणि बेटिंग करण्यास उद्युक्त केल्याचेदेखील उघडकीस आले होते.

तरुणाईच्या अनेक फसव्या आदर्शांचे चेहरे गेल्या काही काळात सातत्याने समोर येत आहेत. अविचाराने आपण कोणा अयोग्य व्यक्तीच्या मागे तर धावत नाही आहोत ना याचा पुन्हा एकदा शांतपणे विचार करण्याची वेळ या घटनेने पुन्हा एकदा तरुणांवर आली आहे हे नक्की!