मुद्दा – रेखा बैजल आणि प्रा. डॉ. प्रज्ञा पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गत दोन दशकांपासून जालना येथे ‘कवितेचा पाडवा’ हा साहित्यिक उपक्रम सुरू असतो. कोरोना काळामुळे त्यात काही खंड पडल्याने शनिवारी ‘कवितेचा पाडवा’ बहरणार आहे. जालना येथील जे.ई.एस. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात विनीत साहनी आणि डॉ. संजीवनी तळेगावकर यांच्या अथक परिश्रमामधून ‘कवितेचा पाडवा’ साजरा होतो आहे.

साहित्यातील समग्र योगदान, जीवन गौरव पुरस्कारासाठी यंदा लेखिका, कादंबरीकार रेखा बैजल यांची तर कै. राय हरिश्चंद्र साहनी स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दुःखी काव्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार यांची निवड झाली आहे. मराठी साहित्यातील सिद्धहस्त कथा लेखिका, कादंबरीकार ही रेखा बैजल यांची ओळख आहे. चौदा कथासंग्रह, बारा कादंबऱ्या, दोन नाटय़ लेखन, दोन ललित लेखन व दोन कवितासंग्रह अशी त्यांची मराठी साहित्यातील लेखन कामगिरी होय.हिंदी भाषेतही त्यांचे दोन कथासंग्रह, दोन कवितासंग्रह, दोन कादंबऱ्या आहेत. रेखा बैजल यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांत आपल्या लेखन साहित्याचा वाचक निर्माण केला आहे. अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही विषय त्यांच्या अनेक साहित्य प्रकारांतून समर्थपणे वाचकांसमोर येतात. अनेक कथा-कादंबऱयांमधून त्या माणसांच्या नानाविध स्वभाव व भावविश्वाचा मनोज्ञ वेध घेतात. साहित्याचा व्यासंग, चिंतनशील विवेचन, एकाच वेळी भूत, वर्तमान आणि भविष्यकाळाची उत्सुकता त्यांच्या लेखनात येते. एवढेच नाही, तर वर्तमानात राहून भूतकाळाचे स्मरण आणि भविष्याचा वेध असेही म्हणता येईल. ‘कवितेचा पाडवा’ या उद्या होत असलेल्या समारंभात त्यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान होत आहे.

प्रा. डॉ. प्रज्ञा पवार

‘कवितेचा पाडवा’ या साहित्यिक कार्यक्रमात ज्यांचा पुरस्काराने सन्मान होत आहे, त्या प्रा. प्रज्ञा दया पवार या महाराष्ट्रातील कवयित्री, कथा लेखिका, नाटय़ लेखिका व ललित लेखिका आहेत. प्रख्यात दलित साहित्यकार दया पवार यांचे साहित्याच्या क्षेत्रात भरीव आणि ठसठशीत योगदान राहिले आहे. साहित्य लेखन, वाचनाचे संस्कार हे वडिलांकडून प्रज्ञा यांच्याकडे आले असले तरी त्यांची वाटचाल ही वेगळय़ा वाटेची आहे.

आपल्या साहित्य प्रांतात त्यांचा म्हणून एक वाचक वर्ग आहे. अंतःस्थ, उत्कट जीवघेण्या धगीवर, मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा, आरपार लयीत प्राणांतिक आणि दृष्यांचा ढोबळ समुद्र हे प्रज्ञा पवार यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ हा कथासंग्रह शब्द प्रकाशनाने काढला. प्रज्ञा दया पवार यांच्या ‘कथेगळू’चा कन्नड भाषेत अनुवाद झाला. केंद्र आणि परीघ, टेहल टिकोरी, अर्वाचीन आरण हे ललित लेखन अनुक्रमे डिंपल, अक्षर आणि शब्द पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केले. खैरलांजी या बहुचर्चित विषयावर पवार यांचे ‘धादांत खैरलांजी’ हे नाटय़ लेखनाचे पुस्तक आले, ते मुंबईच्या प्रतिशब्द या प्रकाशनाने प्रदर्शित केले.

प्रज्ञा पवार यांनी दोन्ही महत्त्वाचे संपादन केले. ‘मी भयंकराच्या दारात उभा आहे’ हे कवी नामदेव ढसाळ यांच्या निवडक कवितांचे सहसंपादन शब्द प्रकाशन संस्थेतून आले, तर ‘विमुक्तांचे स्वातंत्र्य’चे सहसंपादन ठाण्याच्या परिवर्तनाचा वाटसरू या प्रकाशन संस्थेतून आले. प्रज्ञा यांना ‘अंतःस्थ’ या कवितासंग्रहासाठी राज्य पुरस्कार, विशाखा, पनगंटी स्मृती पुरस्कार तसेच कविवर्य बा. सी मर्ढेकर असे महत्त्वाचे पुरस्कार लाभले. ‘ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख असलेल्या प्रज्ञा पवार यांनी विविध संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे.