लेख – बालकांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जगदीश सु. जाधव

बालकाची जडणघडण ही आई-बाबा, परिसर, समाज, शाळा व त्याला मिळणाऱया सभोवतालच्या शिक्षणावरच अवलंबून असते. तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘ओले मूळ भेदी खडकाचे अंग’’ बालकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. वयाच्या दुसऱया, तिसऱया वर्षी मुलांना मनसोक्त खेळू द्या, बागडू द्या. यातूनच त्यांच्या मनामध्ये सर्जनशीलता, कल्पकता निर्माण होईल. ही ऊर्जा अशा पद्धतीने न वापरल्यास साचलेली हीच ऊर्जा मोठेपणी विनाशकारी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मुलांच्या पंखांना भरारी घेता येईल असे सर्वच दिशांना विस्तारणारे वातावरण घरात, समाजात, गावात तयार करा.

पालकांच्या शिक्षणाबरोबर आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा

परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत असतो. लहान मुले आई-बाबा कसे वागतात, कसे बोलतात, काय खातात, काय पितात याचे अनेक अंगांनी सूक्ष्म निरीक्षण करीत असतात. तसेच ते त्यांची तुलना बाहेर आपल्या मित्रांसोबत करत असतात. लहान बालके घरामध्ये सुरू असलेल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात, पण घरच्या मोठय़ा मंडळींना वाटते की, हे तर छोटेसे बाळ आहे, याच्या काय लक्षात येणार! पण चूक इथेच होते. मुलांना लहान समजण्याची खूप मोठी चूक मोठी माणसे करतात. त्याचा मुलांच्या भावविश्वावर खोलवर परिणाम होत असतो. घरामध्ये जर आई-वडील, आई-आजी यांची सतत भांडणे होत असतील तर मुले उदास होतात, त्यांना विविध प्रश्न पडतात. कोण बरोबर, कोण चूक याची ते तुलना करतात. त्यामुळे कटाक्षाने लहान मुलांसमोर घरातील मोठय़ा माणसांनी रागावणे, वादविवाद, भांडण करणे टाळले पाहिजे. लहान मुलांसमोर बोलताना चांगले विचार मांडले पाहिजेत, एकमेकांना समजून घेतले पाहिजे, एकमेकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. शक्यतो बरेच पालक मुलांना खरे बोलण्यास सांगतात व स्वतः मात्र त्यांच्या समोरच खोटे बोलतात. मुलांना हे कळत नाही की, मला नेहमी खरे बोलावे म्हणून सांगणारे माझे आई- बाबा दुसऱयांशी खोटे का बोलतात?

बऱयाच पालकांना विडी, सिगारेट, खर्रा, तंबाखू, गुटखा, ड्रिंक यांचे व्यसन असते. प्रथम पालकांनी या व्यसनांना तिलांजली दिली पाहिजे. हे व्यसन सोडणे शक्य नसले तरी कमीत कमी आपल्या लहान मुलांच्या समोर ते आपण कटाक्षाने टाळले पाहिजे. मुलांसमोर आपण आदर्श असावे, जेणेकरून ती भविष्यात उत्तम नागरिक बनतील.

खेडय़ातील काही पालक आम्ही पाहतो, ते मुलांनाच सिगारेट, तंबाखू, खर्रा, गुटखा आणायला सांगतात. मुलांना वाटते, आपले बाबा हे खातात म्हणजे नक्की यात काहीतरी विशेष आहे. मग या उत्सुकतेपोटी मुले व्यसनाला बळी पडतात. आईवडील मोबाईलमध्ये गुंतलेले असतात आणि मुलांना मोबाईल पाहू नका असे सांगतात. तर हे शक्य नाही. तुम्ही मुलांना जे सांगता ते स्वतः आचरणात आणले तरच मुलांवर त्या गोष्टीचा प्रभाव पडतो अन्यथा ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ अशी अवस्था होऊन जाते.

बालकाचा विकास हा आईच्या जीवनाशी जास्त निगडित आहे. बालकाची शिक्षण ग्रहणाची क्रिया ही आईकडूनच होत असते. गर्भावस्थेसह पहिली दोन वर्षे बालक नैसर्गिकरीत्या आईच्या परंपरागत जीवनातून मूलभूत शिक्षण घेत असते. त्याच्या मनात विविध विचार, चिकित्सा, जिज्ञासा, अवलोकन, ग्रहण, दुर्लक्षितपणा अशा बाबी सुरूच असतात. बालक चालू लागताच, बोलू लागताच काहीतरी त्याच्या दृष्टीने नवीन, अद्भुत साहसी क्रिया करण्याचा प्रयत्न करत असते. नेमके याचवेळी पालक अति काळजीमुळे मुलांना साहसी क्रियेपासून रोखतात. त्यांच्या मनात भीती निर्माण करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना धाडसी, साहसी, वीर, बलवान, विद्वान, ज्ञानी बनवायचे की मठ्ठ हा पालकांनी निर्णय घ्यायचा आहे. आपण मुलांना जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, उमाजी नाईक, अहिल्याबाई होळकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख तसेच अनेक थोर वीरांच्या, शास्त्र्ाज्ञांच्या, संतांच्या कथा विविध कार्यक्रम आणि प्रबोधनातून सांगत असतो. त्याचा बालकाच्या जडणघडणीवर उत्तम प्रभाव दिसून येतो.

आपल्या आजी-आजोबांच्या काळात म्हणजे जवळपास 40 ते 50 वर्षांपूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. त्यामुळे घरामध्ये आजी-आजोबा, काका-काकी व अनेक भावंडे एकत्र राहत असत. त्यामुळे एकत्र खेळणे, एकत्र फिरणे, एकत्र अभ्यास करणे, एकत्र काम करणे, एकत्र झोपणे, एकोप्याने राहणे असे करत करत आपण लहानाचे मोठे झालो. मुलांच्या बऱयाच प्रश्नांची त्यावेळी उत्तरे मिळाली. शेतीशी निगडित सर्व गोष्टी त्यांना माहीत होत. मग शेतात फिरणे, पोहणे, चिखलात खेळणे अशा गोष्टी त्या काळी सहज होत असत. आजकाल कुटुंबे विभक्त झाली. मुलांना फक्त आई- वडील या दोघांचा सहवास लाभतो. त्यातही दोघे नोकरी करत असतील तर आणखीच वाईट अवस्था निर्माण होते. मुलांना जिज्ञासेपोटी पडणाऱया प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे बालक एकलकोंडे बनते. शरीराची वाढ होते, पण मानसिकदृष्टय़ा ते दबलेले असते.

कदाचित ‘हम दो हमारा एक’ या कल्पनेमुळे एकुलत्या एक अपत्यामुळे पालक बालकाला जास्त जपत असावेत, पण बालकाच्या उत्कृष्ट जडणघडणीसाठी त्यांना मुक्तपणे खेळू दिले पाहिजे. मुलांच्या चिकित्सक प्रश्नांची उत्तरे माहीत नसल्यास ‘‘विचारून व माहिती घेऊन नंतर सांगेन’’ असे उत्तर द्या, परंतु वेळ मारून नेण्यासाठी काहीही सांगू नका. बालकांना योग्य वयात तुमच्या जीवनातील सर्व व्यवहार कळू द्या. बालकांना सतत जगातील भव्यदिव्य असेल त्याची माहिती द्या. ऐपत असल्यास घरात कॉम्प्युटर, लॅपटॉप, विविध विषयांची पुस्तके, स्पर्धा परीक्षा मासिके अवश्य आणा. बालकाच्या मनावर राष्ट्रवाद, निधर्मीवाद, समतावाद, मानवतावाद बिंबवण्याकडे लक्ष द्या.

तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘ओले मूळ भेदी खडकाचे अंग’’ बालकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. वयाच्या दुसऱया, तिसऱया वर्षी मुलांना मनसोक्त खेळू द्या, बागडू द्या. यातूनच त्यांच्या मनामध्ये सर्जनशीलता, कल्पकता निर्माण होईल. ही ऊर्जा अशा पद्धतीने न वापरल्यास साचलेली हीच ऊर्जौ मोठेपणी विनाशकारी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मुलांच्या पंखांना भरारी घेता येईल असे सर्वच दिशांना विस्तारणारे वातावरण घरात, समाजात, गावात तयार करा. बालकांना गाऊ द्या, नाचू द्या. नाचता, गाता शिकू द्या. गोष्टी ऐकू द्या, गोष्टी सांगू द्या, ऐकत सांगत शिकू द्या. नाना प्रश्न विचारू द्या, प्रश्न विचारत शिकू द्या. कल्पनाविश्वात रमू द्या, कल्पना करत शिकू द्या. तोडू द्या, जोडू द्या, तोडत जोडत शिकू द्या. हिंडू द्या, पाहू द्या. हिंडत, पाहत शिकू द्या. बऱयाच वेळा पालक आपल्या मुलांवर स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करावी यासाठी आग्रही असतात, पण बालकाच्या आवडी निवडी, छंद यांचा विचार करून त्याला त्याच्या कलाप्रमाणे एखादे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. नाहीतर जबरदस्तीने एखाद्या क्षेत्रात मुलगा गेला तर तो तेथे प्रगती करू शकत नाही. मग अपयश त्याच्या वाटय़ाला येते. त्यामुळे मुलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पालकांनी धडपडले पाहिजे.