
>> प्रशांत गौतम
मौज, सत्यकथा या वाङ्मयीन नियतकालिकांमधून मोजक्याच, पण सकस आणि दर्जेदार कथा लिहिणारे संवेदनशील कथालेखक सखा कलाल यांच्या निधनाची बातमी वाचण्यात आली. अलीकडच्या काळात सखा कलाल नावाचे कोणी लेखक मराठी साहित्यात होऊन गेले, असा प्रश्न पडू शकतो. कारण प्रसिद्धीपासून ते कायम दूर असत. सभा, संमेलने, व्यासपीठावर ते कधीही मिरवले नाहीत. भाराभर लिहून पुस्तकांवर पुस्तकं लिहून या ना त्या मार्गाने पुरस्कार मिळवून मिरवणाऱया लेखकांपैकी ते नव्हेत. मुळातच कलाल यांचा स्वभाव मितभाषी असल्याने त्यांना व्यवहारातल्या अशा खटपटी लटपटी करणे कधीही जमले नाही. वास्तविक पाहता सखा कलाल हे 1960 नंतरच्या काळातील मराठी साहित्यातील महत्त्वाचे ग्रामीण कथालेखक होत. ‘माणूस’ हाच त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू असायचा. मी माणसाविषयी लिहितो आणि माझ्या लेखनाचा माणूस हाच केंद्रबिंदू आहे, ही त्यांची लेखक म्हणून धारणा होती जी त्यांनी शेवटपर्यंत जपली व जोपासली.
सखा कलाल यांनी एका काळात सत्यकथा, मौज या दबदबा असलेल्या अस्सल वाङ्मयीन नियतकालिकांत ग्रामीण कथांचे लेखन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात र.वा. दिघे, ग.ल. ठोकळ, श्री. म. माटे, वामन कृष्ण चोरघडे यांनी ग्रामीण विश्वकथेत आणले. त्यात रंजनप्रधानता जास्त होती. मात्र नंतरच्या काळात ग्रामीण कथेच्या तळाचा शोध घेणारी, मानवी मन, भावभावनांचे प्रत्ययकारी चित्रण करणारी व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, महादेव मोरे ही मंडळी आली. सखा कलाल यांनीही आपल्या कथालेखनाचा प्रारंभ स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात जोमाने केला. त्यांच्या लेखन प्रवासासोबतच प्राचार्य रा.रं. बोराडे, आनंद यादव, चारूता सागर यांचेही कथालेखन सुरू झाले. 1959 च्या सुमारास कलाल यांची पहिली कथा ‘हिरवी काच’ ही सत्यकथेमध्ये प्रसिद्ध झाली. या कथेत अभावग्रस्त श्यामच्या निरागसपणाचे जे चित्रण दिसते ते दुसऱया तिसऱया कुणाचेही नसून ते सखा कलाल यांचेच वाटावे असे आहे. कारण त्यात कलाल यांनी बेळगाव येथील रायबाग या बालपणीच्या काळातील हिरव्या माळरानावरील दिवसाचे चित्रण रेखाटले आहे. सखा कलाल यांनी फार फार तर तीस पस्तीस व्यथा-लिहिल्या असतील, पण त्यातून त्यांनी ग्रामीण माणसांचे जगणे, त्यांच्या व्यथा, मानसिक वेदना आपल्या कथांमधून प्रवाभीपणे मांडल्या आहेत. या संदर्भाने विहीर, रान, फेड या अस्सल कथांचा उल्लेख करणे अगत्याचे ठरते. या अशा अनेक कथांमधून कलाल यांनी ग्रामीण जीवनातील कौटुंबिक पातळीवरील मानसिक आंदोलनांचे चित्रण अत्यंत कलात्मकरीतीने केले आहे. आक्रस्ताळेपणा न करता संयतपणे त्यांची लेखणी वाचकांच्या मनात स्थान मिळवत राहिली. ढग, सांज, उैन, रान, राज अशा महत्त्वाच्या कथांमधून निसर्गाच्या विविध छटांचे दर्शन वाचकांना होत जाते. निसर्गाची विविध रूपे, प्रतीकांच्या माध्यमातून ते मांडत असत म्हणून त्यांच्या अस्सल ग्रामीण आणि मानवी मनाचा वेध घेणाऱया कथेने त्या काळात थेट सत्यकथा, मौजमध्येच आपल्या लेखनाची नाममुद्रा उमटवली. मौज प्रकाशनाने 1974 मध्ये त्यांचा ‘ढग’ हा कथासंग्रह व 1983 साली याच प्रकाशनाने ‘सांज’ हा दुसरा कथासंग्रह प्रसिद्ध केला. धरती, मराठा, बिल्वदल, किर्लोस्कर मासिकांतूनही त्यांचे कथालेखन प्रसिद्ध होत असे. 1959 साली प्रसिद्ध झालेली सत्यकथामधील ‘हिरवी काच’ ही कथा राज्य पुरस्काराने सन्मानित झाली.
बेळगाव येथील रायबागमध्ये 1938 साली जन्मलेले सखाराम भीमराव कलाल हे हिंदी भाषिक, पण तत्त्वज्ञानाच्या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कोल्हापुरातील कॉमर्स महाविद्यालयात गंथपाल म्हणून रुजू झाले व तिथूनच सेवानिवृत्त झाले. लेखन-वाचनासाठी महाविद्यालयातील वातावरण पोषक नसले तरी त्यांच्या अस्सल ग्रामीण कथालेखनावर फार मोठा परिणाम झाला नाही. शिक्षणाबद्दलची ओढ अजिबात कमी होऊ न देता त्यांनी कष्ट उपसले. सरस्वतीची आराधना केली. शब्दबंबाळ लिहिण्यापेक्षा साधं सोपं, वाचकांना आपलं वाटणारं अस्सल साहित्य ते देत राहिले. बेळगाव ही जन्मभूमी असली तरी त्यांनी करवीरनगरी (कोल्हापूर) हीच कर्मभूमी मानली आणि 81 व्या वर्षी अखेरचा श्वासही तिथेच घेतला.





























































