दागिन्यांचा साज, फेटय़ांची शान

>> अश्विन बापट

मंगलमूर्ती मोरयाचा गजर एव्हाना मुंबईसह ठिकठिकाकाणी ऐकायला येऊ लागलाय. सार्वजनिक मंडळांचे बाप्पा मंडपात विराजमान होतायत, तर घरगुती गणपती बाप्पांच्या मूर्तीही तयार होतायत. याच मूर्तींना दागिन्यांचा साज चढवणे, फेटे आणि धोतर यांनी त्यांचे रूप आणखी खुलवणे यासाङ्गी कलाकार मंडळींची लगबग सुरू आहे. अशीच एक युवा कलाकार सलोनी शेटयेकालेकर. मूळची मुंबईकर, आता गोवास्थित. सध्या सकाळी 8 ते रात्री 12 असा तिचा दिनक्रम आहे.

या कलेकडे वळलीस कशी? असे विचारले असता सलोनी म्हणते, लहानपणी चित्रकला, हस्तकलेची मला खूप आवड होती. सतत काहीतरी क्रिएटिव्ह करत राहायचे, वेगळे करत राहायचे हा विचार असायचा. मग कधी पेपर रोलपासून कंदील साकारणे किंवा कधी बांगडय़ांपासून दरवाज्याचे तोरण बनवणे, तर कधी एखाद्या गिफ्टसाठी वेगळय़ा स्टाइलचे पॅकिंग अशी धडपड सुरू असायची. मित्रपरिवार, ओळखीच्यांनी माझी कला पाहिली. पुढे मी गणेशोत्सव समन्वय समिती अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांच्याशी माझा संपर्क करून दिला. तिथून बाप्पांसाठी फेटे, धोतर आणि दागिने असा प्रवास सुरू झाला. या प्रवासात दहिबावकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरलेय. आता लग्नानंतर मी गोव्यात असले तरी तेव्हा मी परळला राहत होते. कोरोनासारख्या खडतर काळाने मला या नव्या संधीचे दालन आणखी मोठ्या प्रमाणात खुले करून दिले. कोरोना काळातील परिस्थिती पाहून माझ्या लक्षात आले होते की, आता नोकरी मिळणे कठीण आहे. एव्हाना आर. एम. भट शाळा, एसएनडीटी कॉलेज, एमडी कॉलेजमधून कॉमर्सची डिग्री असा माझा प्रवास झालेला, तरीही ओढा कलेकडेच होता.

साधारण पाच वर्षांपूर्वी 2018 मध्ये आठ गणपती मूर्तींपासून माझी सुरुवात झाली, तर यंदा 2023 मध्ये 350 हून अधिक मूर्तींना मी सजवतेय. यामध्ये मुंबईतले साधारण 45 गणपती आहेत, तर बाकीचे गोव्यातले आहेत. आठ सार्वजनिक गणपती मूर्तींसाठीही मी काम करतेय, असे सलोनीने सांगितले.

उत्सवांचे दिवस सरल्यावर लग्नांचा मोसम असतो. मग साखरपुडा, सुपारी डेकोरेशन, श्रीफळ सजावट, कलश डेकोरेशन, डेकोरेटिव्ह बॉक्सेस, गृहप्रवेशासाठीचे सप्तपदी मॅटही या ऑर्डर्स सुरू होतात. ही कला जोपासण्यासाठी आई, तीन भावंडे, सासूबाई आणि नवरा या सर्वांची खंबीर साथ आहे. या माझ्या कलेसाठी आर्टिस्ट मिलिंद सकपाळ यांचे बहुमोल मार्गदर्शन मला लाभलेय. तसेच सूरज मोरे यांनी मला या वर्षी खूप सहाय्य केलेय, असे तिने सांगितले.

कलाकुसरीचे काम

सलोनी म्हणाली, दागिने, धोतर आणि फेटे या तिन्हींमध्ये सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे दागिन्यांचे. स्टोन चेन, बॉल चेन, अँक्रेलिक, ग्लास स्टोन, मोत्यांसारखे सोन्याच्या रंगाचे मणी यापासून मी हे दागिने तयार करत असते. मुकुट, बाजूबंद, नेकलेस, पैंजण, कमरपट्टा, सोंडपट्टा, कर्णफुले असे अनेक दागिने साकारते. धोतरांसाठी मी साडय़ांचे सिल्क, सॅटिनचे, ब्रोकेडचे कापड वापरते, तर फेटय़ांसाठी मी पैठणीच्या कापडाचा वापर करते. एका मूर्तीच्या कामाचा विचार केल्यास घरगुती गणपतीकरिता ज्वेलरी, धोतर आणि फेटा तिन्हीला मिळून तीन तास लागतात, तर मोठ्या मूर्तींकरिता नुसत्या दागिन्यांसाठीच चार तास, धोतर नेसवायला एक तास असे वेळेचे गणित असते.

(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसरसीनिअर न्यूज अँकर आहेत.)