
>> ह.भ.प. गुरुनाथ भाग्यवंत महाराज
आपण ‘आत्मा’आहोत, आपण देह नाही असा संशयरहित होणे याला ‘आत्मसाक्षात्कार’ म्हणतात. जो देहामध्ये जीव होता, तो शिव झाला. त्याचा विजय झाला. तो ब्रह्मसत्तेने नांदू लागला. आत्मरूप झाला! या निर्गुण विजयाचा परिपूर्ण आविष्कार म्हणजे थोर संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन कृष्ण षष्ठाrला म्हणजेच शनिवारी आहे. त्यानिमित्त लेख…
सत्याची जाणीव करून घेणे याचे नाव ‘सो।़हं ज्ञान…सो।़हं आत्मा’ आपण आहोत. हाच परमार्थातील शाश्वत निर्धार आहे. आपण देहरूप नसून आहे ते सर्व ब्रह्ममय आहे. आत्म्याशिवाय आपले नाव कोणीही सांगत नाही. जे अनिर्वाच्य आहे, त्याला नाव काहीही ठेवा. कारण होणार आहे ते आधीच झाले आहे, होऊन आले आहे. मग कल्पनेनेच आपण नाव ठेवतो. देव निराकार आहे. आता अनुमान नको, स्वयंसिद्ध वस्तूच्या ठायी वस्तू आहेच असा ज्याचा निश्चय झाला तो सिद्ध पुरुष! असे सिद्ध पुरुष होते संत एकनाथ महाराज!
भजन निष्काम होऊन करणे म्हणजे ब्रह्म होऊन साधन करणे. या सकळ विश्वामध्ये आपण कोणीएक आहे हे शोधून बघतो ज्ञानी पुरुष! सर्वांचा तपास करतो, पण आपणाला ओळखू शकत नाही. जो सर्वांची परीक्षा घेतो, परंतु आपली स्वतःची परीक्षा करत नाही त्याला कधीच ब्रह्मज्ञान होणार नाही. आपण आहोत म्हणण्याची वृत्ती गेली की, काही उरत नाही. उरते ते फक्त ब्रह्म आणि ते ब्रह्म आपणच आहोत अशी परमार्थाची खूण पटणे अगाध आहे. यालाच अध्यात्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार म्हणतात.
वेदाने काय अभ्यास करावा? तीर्थाने तीर्थाला कशासाठी जावे? देवाने कोणत्या देवाला भेटावे? अमृताने कोणते अमृत प्यावे? अनंताने कोणत्या अनंताला भजावे? निर्गुणाने कोणत्या निर्गुणाला भजावे? स्वरूपाने स्वरूपात रंगावे कसे? निरंजनाने निरंजनाचा अनुभव कसा घ्यावा? ध्येयाचे ध्यान कसे करावे? एकदा का परमार्थात स्वरूप स्थिती प्राप्त झाली, मग सर्व अनिर्वाच्य होते. अनिर्वाच्य निमग्नता सिद्ध झाली की, माणूस साधू होतो, स्वयंसिद्ध होतो. आपण ‘आत्मा’आहोत, आपण देह नाही असा संशयरहित होणे याला ‘आत्मसाक्षात्कार’ म्हणतात. जो देहामध्ये जीव होता, तो शिव झाला. त्याचा विजय झाला. तो ब्रह्मसत्तेने नांदू लागला. आत्मरूप झाला! या निर्गुण विजयाचा परिपूर्ण आविष्कार म्हणजे थोर संत एकनाथ महाराज.
जनार्दन स्वामींच्या सान्निध्यात अखंड तपश्चर्या करत असताना एकनाथांना श्री गुरुदेवदत्त प्रभूंनी आपल्या मूळ स्वरूपात दर्शन दिले. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन करताना नाथ म्हणतात…
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान।
हरपले मन झाले उन्मन।
मी तू पणाची झाली बोळवण।
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान।
नाथांच्या मुखात सदैव ‘दत्त दत्त’ असा नामघोष असे. त्यांची वृत्ती दत्तस्वरूपात तदाकार झाली होती. श्री दत्तात्रयांकडूनच नाथांना निर्गुण अनुभूती मिळाली होती.
एकदा श्रीरामप्रभूंनी नाथांच्या स्वप्नात येऊन सांगितले की, रामायणाचा मराठी अनुवाद कर. ती स्वप्नातील आज्ञा प्रमाण मानून नाथांनी ‘भावार्थ रामायणा’च्या रचनेला प्रारंभ केला. एके दिवशी लिहिता-लिहिता नाथ झोपी गेले असता श्रीरामप्रभूंनी स्वप्नात येऊन नाथांना उठवले आणि हातात दौत, लेखणी, कागद देऊन लिहावयास सांगीतले. नाथ जागे झाले व लिहू लागले. तो प्रसंग होता सीताशुद्धीचा. पवनपुत्र हनुमंताने महेंद्र पर्वतावरून उड्डाण केल्याची ओवी लिहिली, त्याच वेळी नाथांच्या अंगात संचार झाला व लिहीत असताना उड्डाण केले आणि ते शेजाऱ्याच्या अंगणात येऊन पडले. नाथांना नेहमी त्रास देणारा तो शेजारी होता. अंगणात काय पडले म्हणून शेजारी पाहू लागला असता त्याला नाथ दिसले आणि त्यांच्या हातातील ओवी पाहून त्याला पश्चात्ताप झाला. त्यांनी नाथांना घरी पोहोचविले व हा महाविष्णूचा अवतार असल्याची त्याची खात्री झाली, परंतु संशयी वृत्तीने त्याला नाथांचा अनुग्रह होऊ शकला नाही.
संत एकनाथांचे वाङ्मयकार्य थोर आहे. श्रीमद्भागवतातील भक्तीप्रधान अशा अकराव्या स्कंधावर नाथांनी प्राकृत भाषेत ‘एकनाथी भागवत’ ग्रंथ लिहिला. भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथकाव्याबरोबर त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ शुद्धीकरणही केले. भारुड, गवळणी, गोंधळी यांच्या सहाय्याने त्यांनी जनजागृती केली. जनसामान्यांना मोलाचा पारमार्थिक उपदेश केला. जोपर्यंत वृत्ती तदाकार होत नाही, तोपर्यंत देवाचे नाम जिव्हारी येत नाही. जे देवाला शरण जातात, त्यांना मृत्यूचे भय नाही. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे अशी साधी व सोपी शिकवण नाथांनी समाजाला दिली.
हरि बोला, हरि बोला
नाहीतर अबोला।
व्यर्थ गलबला करू नका।
नको नको मान, नको अभिमान।
सोडी मी तूं पण तोचि सुखी।
सुखी जेणें व्हावे। तेणें जग निववावे।
अज्ञानी लावावे सन्मार्गासी।
मार्ग जया कळे, भावभक्ती बळे।
जगाचिये मेळे न दिसती।
दिसती जनी वनी, प्रत्यक्ष लोचनी।
एका जनार्दनी ओळखिले।
विश्वमाऊली ज्ञानदेव नाथांच्या स्वप्नात येऊन त्यांना म्हणाले, ‘‘नाथा! तू आळंदीला येऊन माझी समाधी उघडून दर्शन घे. तिथे तुला माझ्या गळ्याला लागलेली अजाण वृक्षाची मुळी दिसेल. ती बाहेर आणून लाव आणि समाधी पूर्ववत कर! स्वप्नातील आदेशाप्रमाणे नाथ आळंदी येथे आले आणि ती झाडाझुडपांनी वेढलेली समाधी उघडली. तेथे वज्रासन घालून बसलेल्या तेजःपुंज माऊलींचे दर्शन झाले. समाधीला वेढलेली ती मुळी काढून समाधी पहिल्यासारखी बंद केली तसेच ‘ज्ञानेश्वरी’ची मूळ प्रत शुद्ध केली.
जगताला निर्वाणीचा संदेश देताना नाथ म्हणतात,
करा रे बापांनो साधन हरिचे। झणी करणीचे करू नका।
जेणें न ये जन्म यमाची यातना। ऐसे साधन करा काही।
साधनाचे सार मंत्रबीज हरि। आत्मतत्त्व धरी तोचि ऐक।
शंभरवेळा एका मोगलाने अंगावर थुंकूनही आपली शांती ढळू न देणारा तसेच पूर्वजांचे स्मरण म्हणून श्राद्धदिनी ब्राह्मणांचा रोष पत्करून, बहिष्कार पत्करून, अंत्यजांच्या पंक्ती बोलावून दीनदुखितांना जेवण घालून सर्वांभूती एकच परमेश्वर नांदतो आहे, परमेश्वर सर्वत्र जगतात भरून उरला आहे याचे वर्म सकळांस समजावून सांगितले.
असे हे भक्तशिरोमणी, जनसेवेचे थोर उपासक महान संत एकनाथ महाराज फाल्गुन कृ. षष्ठाr, शके 1521 रोजी 26 फेब्रुवारी इ. सन 1599 अनंतात विलीन झाले.

























































