ठसा – सरोज खान

1083

>> प्रशांत गौतम

‘एक दो तीन, धक धक करने लगा, हवा हवाई, निम्बुडा निम्बुडा, डोला रे डोला, तम्मा तम्मा…’ अशा सुपर डुपर ठरलेल्या लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या कोरिओग्राफर सरोज खान बॉलीवूडच्या मास्टरजी होत्या. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत आपल्या नृत्य-दिग्दर्शन या गुणविशेषाने छाप पाडली होती. त्यांच्या निधनाने एक ‘सरोज पर्व’ संपले आहे. विख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे त्यांच्याशी तर गुरू-शिष्याचे नाते होते. बॉलीवूडच्या अनेक छोटय़ा-मोठय़ा कलाकारांना आपल्या तालावर नाचवणाऱया त्या मास्टरजी होत्या. ‘तेजाब’मध्ये माधुरी दीक्षित, ‘ताल’मध्ये ऐश्वर्या राय, ‘मिस्टर इंडिया’मध्ये श्रीदेवी तर ‘जब वी मेट’मध्ये करीना कपूर यांना आपल्या तालावर त्यांनी नाचवले. मात्र यातील आवडती विद्यार्थिनी ही माधुरीच होती. तिच्यासोबत काही चित्रपटांत कामही केले. नृत्य दिग्दर्शनाच्या निमित्ताने या सर्व कलाकारांशी त्यांचा अतूट असा स्नेह निर्माण झाला होता. नृत्य शिक्षणासाठी येणाऱया प्रत्येक कलावंताला त्या सारखेच प्रेम देत असत. मात्र नृत्य दिग्दर्शनासाठी कलाकाराला सांगितलेली एखादी स्टेप चुकली की त्यांच्यातली मास्टरजी जागी व्हायची. अगदी करीना कपूर असो की काजोल असो, सेटवर मात्र त्या सर्वांसमोर चूक काढण्यास मागेपुढे बघत नसत. कलाकारांच्या मेहनतीला सरोज यांच्या कोरिओग्राफीचे कोंदण लाभले असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरलेल्या अनेक नृत्यगीतांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले. ‘देवदास’मध्ये ‘डोला रे डोला’ या गाण्यात तर माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय होत्या. दोघीही अव्वल दर्जाच्या अभिनेत्री. अशा वेळी सरोज खान यांच्या कोरिओग्राफी कौशल्याचा खरेच कस लागला; परंतु सरोज यांनी दोघींनाही समसमान न्याय दिला. सरोज या केवळ नृत्य बसवत नसत, तर अन्य बाबींकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. अशी सूक्ष्म बारकाई त्यांना बी. सोहनलाल यांच्याकडून शिकता आली. अनेक रिऑलिटी शोमध्ये सरोज खान यांनी परीक्षण करण्याची अवघड जबाबदारी लीलया पार पाडली. नृत्य सादरीकरणासाठी येणाऱया नव्या कलावंतास नृत्य अचूक होण्यासाठी त्या टिप्स देत असत. ती स्टेप कलावंतास नाहीच जमली तर स्वतः करून दाखवत असत. कलेबद्दलची आत्मीयता आणि कला विकासासाठी जास्तीत जास्त परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असे. त्यांच्या कसोटीस एखादा कलाकार उतरला तर त्याच्याकडून पूर्ण तयारी त्या करवून घेत असत. म्हणूनच त्यांच्याविषयी कलाकारांमध्ये आदरयुक्त भीती होती, धाक होता. असे सांगितले जाते की, करीना कपूरने सरोज खान यांची खूप बोलणी खाल्ली. नृत्य शिकवणीच्या प्रसंगी करीनाकडून एखादी स्टेप चुकली की व्यवस्थित करण्यास पुनः पुन्हा सांगत. रात्री-मध्यरात्रीपर्यंत शिकवणी चालायची. करीनाची स्टेप चुकली की त्या खरडपट्टी काढायच्या. शेवटी मास्टरजींच्या धाकाने ती स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेत असे आणि मास्टरजींनी शिकवलेल्या स्टेप नव्याने करण्याचा सराव करीत असे. मास्टरजी गेल्यानंतर आपल्या शिकवणीच्या अनुभवाची एक भावपूर्ण श्रद्धांजली पोस्ट तिने सोशल मीडियावर टाकली व सरोज खान यांच्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त केली.

सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 सालचा. कुशचन साधू सिंह आणि नोनी साधू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे मूळ नाव निर्मला कुशचन साधू सिंह नागपाल असे होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानातून हिंदुस्थानात आले. मुंबईत आल्यावर ‘नजराना’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. प्रसिद्ध कोरिओग्राफर बी. सोहनलाल यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले व नंतरच्या काळात त्यांच्याच जीवनसाथी झाल्या. 1974 साली त्यांनी सर्वप्रथम ज्या सिनेमाची कोरिओग्राफी केली तो म्हणजे ‘गीता मेरा नाम’. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी बॉलीवूडला आपल्या तालावर नाचवले. सरोज खान म्हणजे हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचा चालता-बोलता साठेक वर्षांचा इतिहास. या काळात त्यांनी अनेक चढ-उतार बघितले. स्पर्धेत टिकून राहिल्या. ‘हावडा ब्रिज’ चित्रपटात ‘आईये मेहरबान’ या गाण्यात मधुबालाच्या मागे नाचणारी ही दहा वर्षांची चिमुरडी बेबी सरोज, अनेक कलावंतांच्या मास्टरजी होत्या. दोनशेहून अधिक चित्रपटांची आणि दोन हजारांहून अधिक गाण्यांची त्यांनी कोरिओग्राफी केली. ‘लगान’साठी अमेरिकन कोरिओग्राफी अवॉर्ड तसेच तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सरोज खान यांचा सन्मान झाला होता. नृत्य दिग्दर्शनासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱया त्या एकमेव नृत्य दिग्दर्शिका होत. पदन्यासाचा ‘ताल’ आता 71व्या वर्षी मुंबईत विसावला आहे. सरोज खान यांच्या निधनाने नृत्यदिग्दर्शन क्षेत्रातील एक युगाचा अस्त झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या