विवाह असाही!

670

हल्ली विवाह म्हणजे शाही सोहळा. अमाप खर्च, मौजमजा आणि वारेमाप जेवण… या पार्श्वभूमीवर सत्यशोधक विवाहाचे साधेपण मनास भावते.

सध्याच्या आधुनिक काळात विवाह म्हटलं की, भरघोस खरेदी… मानपान… हुंडा… हे सारं आलंच, मात्र या सर्व खर्चांना फाटा देत आजची तरुण पिढी स्वजातीय, आंतरजातीय अशा सत्यशोधक विवाह पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये मुहूर्त न पाहता सोयीची वेळ पाहून विवाह करता येतो. नाहक खर्च, हुंडा, मानपान असा कोणताही अडसर येत नाही.

नुकताच सत्यशोधक केंद्राच्या वतीने अक्षर शेख आणि सोनाली साळुंखे यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला. त्यांच्या या वेगळ्या निर्णयाविषयी सोनाली सांगते, आमचं अनेक वर्षे प्रेम होतं. अशा पद्धतीने  लग्न करण्याचा निर्णय एकमेकांच्या सहमतीने घेतलाय.

या विवाहाविषयी सत्यशोधक विवाह केंद्राच्या प्रमुख  प्राध्यापिका प्रतिमा परदेशी माहिती देतात की, ज्यांना वैदिक पद्धतीने विवाह करायचा नाही अशा जोडप्यांसाठी हा विवाहाचा एक वेगळा मार्ग आहे. यामध्ये वैदिक विवाह पद्धतीप्रमाणे कर्मकांड, पुरोहितांना महत्त्व देण्याऐवजी दोन जीवांचे मीलन आहे. यासाठी लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी कुणीही हा विवाह लावून देऊ शकतात. याकरिता विशिष्ट जातीवर्गासाठी मर्यादित नाही. या पद्धतीमध्ये आम्ही आता सुधारित पद्धतीने सत्यशोधक विवाह लावतो. पुण्यात दोन महिन्यांपूर्वीच 7 जून 2018 रोजी सत्यशोधक विवाह केंद्र सुरू केलं. या केंद्राच्या माध्यमातून सध्या ‘सुधारित सत्यशोधक पद्धती’च्या माध्यमातून लग्न लावून दिलं जातंय. फक्त सह्या करून लग्न करणं असा रुक्षपणाही यात नाही. खूप बडेजावही नसतो. त्यामुळे लग्नाला नातेवाईक, मित्रंडळी यांनाही हा विवाहसोहळा आवडतो आणि आम्ही अशाच विवाह पद्धतीचा विचार करू अशी प्रतिक्रिया ते व्यक्त करतात.

विवाहेच्छुकांचे समुपदेशन

ज्या वधु-वरांना सत्यशोधक विवाह पद्धतीप्रमाणे विवाह करावासा वाटतो. तेव्हा ते आमच्याशी संपर्क साधतात. तेव्हा त्यांना अशा पद्धतीने विवाह का करावासा वाटतो हे आम्ही जाणून घेतो. त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या समजून घेतो. गरज असल्यास त्या दोघांच्या कुटुंबीय, आई-वडील यांच्याशीही आम्ही बोलतो. विवाहावेळी मुला-मुलीचे नातेवाईक उपस्थित राहावेत याकरिता प्रयत्न करतो. म्हणजे अडचणी येणार नाहीत. काही वेळा दोघांपैकी एकाचेच नातेवाईक येतात, तराही हा विवाह सहमतीनेच केला जातो. त्यामुळे घरून विरोध कमी होतो.

अनोख्या मंगल ओव्या

लग्न लावताना मंगलाष्टका म्हणण्याऐवजी मंगल ओव्या म्हटल्या जातात. याचं वैशिष्टय़ असं की, पहिलं नमन पालनकर्त्यांना केलं जातं. त्यांनी कष्ट करून वाढवलं, शिकवलं यासाठी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. दोघांच्या मतांनी संसार करूया, समतेचं स्वप्न मनी धरूया, शिवाय  भांडण-तंटय़ाखेरीज आयुष्य जगण्याचं वचन एकमेकांना या मंगल ओव्यांच्या माध्यमातून दिलं जातं.

सुधारित सत्यशोधक विवाह पद्धत

  • या पद्धतीमध्ये सर्व प्रकारच्या आंतर जातीय, सजातीय, आंतर धर्मीय असा कोणताही विवाह करता येतो.
  • याकरिता सुरुवातीला विधी वगैरे अशी कोणतीही बंधन नाहीत.
  • सज्ञान पुरुष आणि स्त्री ज्यांना या पद्धतीप्रमाणे लग्न करण्याची इच्छा आहे, अशांचे लग्न लावून दिले जाते.
  • विना हुंडा, मानपान या प्रकारांमुळे मान-अपमानाचे प्रसंग घडतात अशा कृतींना येथे महत्त्व नसते.
  • या पद्धतीमध्ये मुला-मुलीला 35 सत्यशोधक समाजातील कार्यकर्ते म्हणजेच सत्यजनांसमोर शपथ घ्यावी लागते. ती अशी की, ‘आम्ही सत्यजनांना साक्षी मानून सहजीवनाला सुरुवात करतोय आणि तुझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा मी सन्मान करीन. समतेनं-ममतेनं आपण जीवन व्यतीत करू.’ ही शपथ दोघांनाही घ्यावी लागते.
  • हार घातले जातात आणि वधु-वरांवर पुष्पवृष्टी केली जाते. अक्षता म्हणून तांदळाचा वापर केला जात नाही, कारण तांदूळ वाया जातात. दुष्काळ परिस्थिती निर्माण होते, शेतकरी आत्महत्या करतात, अन्नदात्याचा अपमान होतो. याकरिता फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात.
  • आपटय़ाचं पान द्विदल पान सुकलं तरी तसंच राहतं. त्याची विभागणी होत नाही. अशा प्रकारचं सहजीवन जगण्याची प्रेरणा पती-पत्नीला मिळावी यासाठी आपटय़ाचं पान वधु-वरांना दिलं जातं.
  • सत्यशोधक विवाह केंद्राच्या वतीने प्रमाणपत्र दिलं जातं. या पद्धतीने आई-वडिलांनी आपल्या मुलांचं लग्न केल्याबद्दल त्यांनाही प्रमाणपत्र दिलं जातं.
आपली प्रतिक्रिया द्या