
आज बचत दिन आहे. आणि दिवाळीही अगदी दाराशी आली आहे. घरातील रोजचं नियोजन ही घरातील गृहिणीचीच जबाबदारी आणि घरातील रोजच्या खर्चासोबतच सणवारांचं नियोजन करणं… कुटुंबीयांना काही कमी पडू न देणं ही जबाबदारीही सख्यांनो तुमचीच. श्रीमतीही काही सोपे नियोजन तुम्हाला सुचवत आहे.
महत्त्वाचे खर्च लक्षात घ्या
महिन्याच्या अखेरीस जाणवणारी चणचण अलीकडे महिन्याच्या सुरुवातीलाच जाणवू लागते. त्यामुळे पैशाची आवक कशी वाढवायची हे गृहिणीला कायमचं कोडं होऊन बसलंय. महिना सुरू झाला की सगळ्यात आधी आवश्यक खर्च काय आहेत याची एका वहीत नोंदणी करून ठेवा. जे खर्च याच महिन्यात करायचे आहे ते करायलाच हवेत त्याला पर्याय नाही, पण ज्या गोष्टी नंतरही घेता येतील अशा गोष्टींची वेगळी यादी बनवा. म्हणजे पुढच्या महिन्यात हे खर्च विसरायला होणार नाही.
मोबाईलवर कमी खर्च करा
फोन ही आजची गरज आहे. पण त्यावर किती खर्च करायला हवा हे ज्याने त्याने लक्षात घ्यायला हवे. आज अनेक मोबाईल कंपन्या वेगगवेगळ्या ऑफर देतात. त्या ऑफर्स नीट तपासून अगदीच गरज असेल तरच मोबाईलवर खर्च करा. नाहीतर हा वायफळ खर्च शक्यतो टाळाच.
खरेदीसाठी भाव करणे महत्त्वाचे…
दिवाळीनिमित्त बाजारात कपडय़ांची, वस्तूंची खरेदी करताना अनेक ठिकाणी ऑफर्स दिसतात. काही ऑफर्स खरोखर चांगल्या असतात. त्यामुळे आपला फायदाही होतो आणि चार पैसे वाचतीलही… पण ऑफर्स नसतात त्या वस्तू खरेदी करताना भाव करता आला पाहिजे. आहे तीच किंमत देण्यापेक्षा थोडं भाव करायला शिकलात तर काही पैसे नक्कीच वाचतील.
दिवाळीचा बोनस
दिवाळीचा बोनस मिळाला असेल तर तो बाजूलाच ठेवून द्या. कारण ते तुमचे जास्तीचे पैसे आहेत. त्याची कुठेतरी गुंतवणूक करा किंवा आवश्यकता असेल तरच ते खर्च करा. दिवाळीनिमित्त, भाऊबीजसाठी पैसे दिले जातात. ते पैसेही बँकेत ठेवून द्या. जवळ रोख रक्कम असेल तेव्हाच आवश्यक गोष्टी घ्यायच्या हे पक्के ठरवून ठेवा.
प्रवास खर्च
बस किंवा लोकलने प्रवास करत असाल तर तिकीट काढण्यापेक्षा अशा प्रवासासाठी मासिक पास काढणे जास्त फायद्याचे ठरते. गाडीला सीएनजी बसवल्यानेही पेट्रोल खर्चातही बचत होऊ शकते. त्यामुळे प्रवासाचा खर्च आटोक्यात राहू शकतो.
भेट महागडीच हवी असे नाही
दिवाळीत भेट म्हणून महागड्याच वस्तूच दिल्या पाहिजेत असे नाही. आपल्या बजेटमध्ये बसेल आणि तुमच्या खिशाला परवडेल अशाच भेटवस्तू द्या. कारण भेट किती महागडी यावरून प्रेम ठरत नाही तर ती कोणत्या भावनेने देतो हे महत्त्वाचे असते.
वैद्यकीय विमा काढा
आजारपण हे सांगून येत नाही. पण ते हमखास येतं हे नक्की. त्यासाठी खबरदारीचा उपाय आणि भविष्याची तरतूद म्हणून वैद्यकीय विमा काढून ठेवा. तो असेल तर अचानक ओढवलेल्या आजारपणात फायदा होतो. रुग्णालयाचा खर्च त्याद्वारे आपोआप दिला जातो.
खर्चाची नोंद ठेवा
प्रत्येक दिवसाचा खर्च लिहून काढा. या सवयीने आपला कुठे आणि किती खर्च झाला याची माहिती मिळते. अनावश्यक खर्चाची माहिती मिळते आणि पुढे तो खर्च कसा टाळायचा यावरही आपण विचार करतो.





























































