वार्धक्यः समस्या व उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >>>माधुरी सहस्रबुद्धे

विज्ञान-तंत्रज्ञानातील अद्ययावत शोधामुळे, सातत्याने होणाऱया प्रगतीमुळे मानवी जीवनावर मुळापासून परिणाम झाला आहे. जन्म आणि मृत्यू दोन्हीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवू शकणारे. विज्ञान माणसासाठी वरदान ठरत आहे तर दुसरीकडे त्यातून वाढते आयुष्य ही समस्या उभी राहत आहे. दीर्घायुष्याची इच्छा असणं आणि तो काळ सुसह्य असणं हे माणसाच्या हाती नेहमीच असतं असं नाही. वार्धक्य व त्यातील अवस्था, समस्या, व्याधी यामुळे माणूस त्रस्त झालेला असतो. यावेळी आपल्या जगण्यावर, मरणावर आपला असल्या यशस्वी साधकबाधक चर्चा व दृष्टिकोन लेखकाने प्रस्तुत पुस्तकातून मांडला आहे.

विज्ञानाच्या शोधांमुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढत आहे. माणसाचं वार्धक्य सुसह्य, सुखकर असं होईल, ज्येष्ठांचे अखेरचे दिवस शांततेत सुखकर होतील यासाठी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, समाज साऱयांचाच सहभाग आवश्यक आहे. पण त्याचबरोबर कायदाही ज्येष्ठांचे हित जपणारा असायला हवा. वृद्ध, वार्धक्य, वृद्धाश्रम, कठोर आर्थिक वास्तव हे सारे स्वीकारणं अपरिहार्य आहे. या संदर्भात वृद्धांसाठी निवडीचा हक्क या विषयावर लेखकाने चर्चा करून नवा व काळानुरूप स्वीकारला जावा असा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाच्या मते ‘राइट टू लिव्ह विथ डिग्निटी’ असायला हवे. माणसाला जगण्याचा जसा हक्क आहे तसाच जगणं संपवण्याचा हक्क असायला हवा. स्वेच्छामरण व इच्छामरण यातील फरकही स्पष्ट केला आहे. स्वेच्छामरण हा शब्द लेखकाला जास्त योग्य वाटतो.

वार्धक्यात अनेक समस्या उभ्या राहतात. या विविध कारणांची, आर्थिक परिस्थिती, निवृत्तीचे वय, वेतनश्रेणी, दीर्घकालीन सेवेचा फायदा, अपुरे निवृत्ती वेतन, आजारपण अशा वैयक्तिक, सामाजिक, राजकीय समस्या उभ्या राहतात. वृद्धावस्थेतील शारीरिक अवस्था, असह्य रोग, अपुऱया वैद्यकीय सोयी-सुविधा यामुळेही जगणे असह्य होत जाते. तरीही सगळेच स्वेच्छामरणाचा मार्ग स्वीकारत नाहीत कारण माणसाची जीवनेच्छा, जीवनप्रेरणा अधिक प्रबळ असते. त्यातून वृद्धाश्रमांची गरज वाढत आहे. एकेकटे वृद्ध, मुलांचे दुर्लक्ष, त्यांचे आरोग्य हे प्रश्न, तर कधी आर्थिकदृष्टय़ा संभव असूनही स्वातंत्र्य हवे म्हणूनही वृद्धाश्रमाकडे माणसं वळतात.

पुस्तकात लेखकाने उपयुक्त माहतीही दिली आहे. भवनची स्थापना, विविध संदर्भ, पाश्चात्यांची मते, तेथील परिस्थिती तसेच जीवन संपवण्याचा एक मार्ग म्हणजे उपोषण, समाधी घेणे ही पूर्वापार कल्पना. समाधी म्हणजे स्वेच्छामरणच. त्याचप्रमाणे नेत्रदानासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला हवी. हे सर्व स्वीकारताना कायद्याचे संरक्षण हवे, मानसिक स्थिती नॉर्मल असताना मृत्युपत्र करायला हवे. यासाठी भावनांपेक्षा विवेकाने निर्णय घेणे आवश्यक आहे असे लेखकाचे मत आहे.

वृद्धांसाठी निवडीचा हक्क

लेखक: विनायक राजाराम लिमये

प्रकाशन: शहा पब्लिकेशन

पृष्ठ:166, मूल्य: 170 रुपये