
>> विठ्ठल जाधव
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे हे अभ्यासू आणि संघटनेतील विविध जबाबदाऱया पार पाडणारे नेते होते. 1972 साली काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष पी.के.सावंत यांनी प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी रणपिसे यांच्यावर सोपविली तेव्हापासून आजतागायत प्रदीर्घ काळ संघटनेने सोपविलेल्या अनेक जबाबदाऱया रणपिसे यांनी अतिशय संयमाने आणि कुशलतेने सांभाळल्या. गांधी घराण्याशी निकटवर्ती आणि काँग्रेस एकनिष्ठ म्हणून ते ओळखले जात. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार, नाशिकराव तिरपुडे , प्रभा राव यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. काँग्रेसच्या अनेक शिबिरांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधान परिषदेच्या गटनेतेपदाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपविली ती जबाबदारीही ते समर्थपणे सांभाळत होते. काँग्रेसचे निष्ठावंत असले तरी आंबेडकरी विचारांशी त्यांची बांधीलकी होती. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. देशभर बौद्ध विहार संघांना मदत आणि समाज प्रबोधन करण्यात ते अग्रेसर राहिले.
शरद रणपिसे यांनी राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालून काम केले. ते अविवाहित राहिले. पुण्यात रामराज्य शिक्षण संस्थेची उभारणी, उर्दू शिक्षण संस्था, इंदिरा नगर, महाराष्ट्र युथ वेल्फेअर फाऊंडेशन या संस्थांबरोबरच रामराज्य सहकारी बँकेची स्थापना त्यांनी केली. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण व समाज कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य, पुणे शहर इंदिरा काँग्रेस अध्यक्ष, पक्षाचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य, 1985 ते 95 च्या दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार, त्यानंतर विधान परिषदेचे तीनवेळा सदस्य राहिले. गुजरात राज्याचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले. प्रत्येक पदावर काम करताना सामान्य माणूस आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांचा असे.
1999 च्या विधानसभा निवडणुकीत रणपिसे यांना पर्वती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असूनही उमेदवारी नाकारण्यात आली. रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर झाली. यादरम्यान पुणे शहर काँग्रेसमध्ये तत्कालीन नेते सुरेश कलमाडी यांचा दबदबा होता. बागवे हे कलमाडी समर्थक. रणपिसे हे बंडखोरी करून निवडणूक लढवतील म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी कलमाडी समर्थकांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा टाकला होता, परंतु काँग्रेसच्या पक्षशिस्तीमध्ये वाढलेले रणपिसे यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला. पक्षकार्य चालू ठेवले. पुढे त्यांना तीनवेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली.
विधान परिषदेचे अभ्यासू नेते म्हणून संपूर्ण विधिमंडळ आणि महाराष्ट्र व त्यांची ओळख होती.विधान मंडळात त्यांच्या कामकाजाची छाप त्यांनी अभ्यासपूर्ण आणि जोशपूर्ण भाषणांतून पाडली. त्यांची भाषणे आणि मांडणी ऐकण्यात वेगळा अनुभव मिळत असे. अर्थसंकल्पीय चर्चा आणि मागण्यांवर सभागृहात बोलण्याआधी ते पूर्ण तयारी करून येत. संसदीय आयुधांचा पुरेपूर वापर करून विरोधकांना कोंडीत पकडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते.फायली आणि संदर्भ कागदपत्रांचा गठ्ठा बाकावर ठेवून एक-एक संदर्भ देत भाषण करण्याची त्यांची कार्यपद्धती, मंत्र्यांनाही अनेकदा कोंडीत पकडून वस्तुस्थिती समोर आणणारे शरद रणपिसे हे एक लढवय्ये नेते. सभागृहातील कामकाज नियमानुसार व्हावे यासाठी त्यांचा कटाक्ष असायचा. अनेकदा भरकटलेले कामकाज त्यांनी पुन्हा नियमावर आणल्याचे दाखले विधिमंडळाच्या पटलावर आहेत. त्यातून अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला झाली. शरद रणपिसे यांच्या निधनामुळे काँग्रेसमधील निष्ठावंतांच्या फळीतील एक तारा निखळला. काँग्रेसची त्यामुळे मोठी हानी झाली. राजकीय कारकीर्दीबरोबरच रणपिसे यांचे समाज प्रबोधनाचे कामदेखील तेवढेच मोठे होते. या कामाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. त्यांचे काम राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभ म्हणून प्रेरणा देणारे आहे.






























































