
>> विवेक दिगंबर वैद्य
गोदावरीचे सान्निध्य लाभलेल्या आणि अठरापगड जातींचे वास्तव्य असलेल्या ‘शिलधी’ वा ‘शिर्डी’ या खेडेगावाची पूर्वापार रचना दोन मशिदी, एक धर्मशाळा, चावडी, गणपती–शनी–शंकर–खंडोबा आदी देवदेवतांची नऊ देवळे अशा स्वरूपाची होती. मात्र श्रीसाईबाबांच्या आगमनानंतर येथे मशीद (द्वारकामाई), चावडी, लेंडी बाग, निंबवृक्ष गुरुस्थान आणि सध्याची श्रीसाईसमाधी या स्थानांची भर पडली आहे.
नगरच्या राहता जिल्ह्यातील शिर्डी नावाचे तत्कालीन दुर्लक्षित खेडेगाव येथे अवतरलेल्या आणि वास्तव्य केलेल्या श्रीसाईबाबांमुळे जगविख्यात झाले. श्रीसाईबाबांच्या आगमनामागे दीन-पतित, अनाथादी गोरगरीबांना आधार व सच्चा धर्मप्रसार हे मुख्य प्रयोजन होते. बाबांचे कार्यसामर्थ्य, प्रचीतीमाहात्म्य आणि वाढत्या भक्तप्रियतेमुळे ‘शिर्डी’ अल्पावधीत सर्वत्र, सर्वदूर प्रसिद्धी मिळवते झाले. त्या काळी कोपरगाव येथून गोदावरीचे पात्र ओलांडून चिथळीमार्गे जाणारा अडचणींचा ‘घाट’ चढून शिर्डीस जाता येत असे. मात्र आज प्रगत दळणवळणाच्या सर्व सुखसोयींनी शिर्डी येथे जाण्यासाठीचा प्रवास सुखकर केलेला आहे. आज शिर्डी येथे जगाच्या कानाकोपऱयातून विनासायास पोहोचता येते.
श्रीसाईनाथांची ही शिर्डी जाणकारांच्या मते ‘शिलधी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘शिर्डी’चे पूर्वापार नाव ‘शिलधी’ होते. ‘शील’ म्हणजे पर्वत आणि ‘धी’ म्हणजे बुद्धी. ज्या क्षेत्र परिसराची बुद्धी पर्वतासमान स्थिर आहे किंवा जी चंचल बुद्धीलाही स्थिरता आणते ती ‘शिलधी’. याच ‘शिलधी’ अथवा ‘शिर्डी’ नामक खेडेगावाला पूर्वी गंगागीर आणि देवीदास नामक सत्पुरुषांचे सान्निध्य लाभले आणि पुढे साईबाबांच्या आगमनाने आणि वास्तव्याने शिर्डीमध्ये कधीही न आटणारा भक्तीप्रेमाचा ‘झरा’ अखंड अविरत खळाळत राहिला.
गोदावरीचे सान्निध्य लाभलेल्या आणि अठरापगड जातींचे वास्तव्य असलेल्या ‘शिलधी’ वा ‘शिर्डी’ या खेडेगावाची पूर्वापार रचना दोन मशिदी, एक धर्मशाळा, चावडी, गणपती-शनी-शंकर-खंडोबा आदी देवदेवतांची नऊ देवळे अशा स्वरूपाची होती. मात्र श्रीसाईबाबांच्या आगमनानंतर येथे मशीद (द्वारकामाई), चावडी, लेंडी बाग, निंबवृक्ष गुरुस्थान आणि सध्याची श्रीसाईसमाधी या स्थानांची भर पडली आहे.
‘शिर्डी’ गावाचे रूपांतर कालांतराने ‘श्रीक्षेत्र’ शिर्डी असे झाले, त्यास कारणीभूत ठरलेल्या श्रीसाईनाथांच्या बालरूपातील ओळख तसेच जाणत्या वयातील दर्शन घेण्याचा साक्षात्कारी अनुभव शिर्डीवासीयांनीच घेतला. तारुण्यावस्थेत पदार्पण करण्याआधीचा काही काळ बाबांचे येथे वास्तव्य झाले. पुढे, कुणासही न सांगता-सवरता बाबा येथून एकाएकी निघून गेले व पुन्हा काही वर्षांनी चांद पाटलाच्या वऱहाडासोबत परतले. यावेळी मात्र गावाबाहेरच्या खंडोबाच्या देवळामधील म्हाळसापती यांनी ‘आवो साई’ असे म्हणत साईंना केवळ नाममुद्रा बहाल केली नाही, तर ‘श्रीसाईबाबा’ नावाच्या भविष्यकालीन गौरवशाली ‘अध्यात्म’ पर्वाचा शुभारंभ सूचित केला.
श्रीसाईबाबांच्या अवतारकार्याची प्रेरणा तसेच त्यांचे गुरू म्हणून अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थांकडे पाहिले जाते. ‘श्रीसाईसच्चरित्र’ या कै. गोविंद रघुनाथ दाभोळकर (हेमाडपंत) लिखित श्रीसाईसंप्रदायाच्या अधिकृत ग्रंथात यासंबंधी काही दाखले देण्यात आले आहेत. एकदा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या भाई अलिबागकर या मुंबईकर निष्ठावंत भक्ताच्या मनात ‘अक्कलकोटी जावे, श्रीस्वामी पादुकांचे दर्शन घ्यावे आणि मनोभावे पूजा-उपचार समर्पावे’ अशी इच्छा निर्माण झाली. त्याने मुंबईहून अक्कलकोट येथे जाण्याकरिता तयारी केली. मात्र, त्याचा बेत तसाच राहून गेला व त्याने शिर्डीची वाट धरली. कारण उद्या अक्कलकोट येथे जाणार तो आज स्वप्नात श्रीस्वामी समर्थांची त्यास आज्ञा झाली की, ‘‘सध्या माझा निवास शिर्डीत आहे, तर तू तेथे जा.’’ श्रीस्वामी आज्ञेस शिरसावंद्य मानून भाई शिर्डी येथे गेले आणि तेथे काही महिने मुक्काम केला. इतकेच नाही, तर श्रीस्वामी समर्थांच्या दृष्टांताचे स्मरण कायमस्वरूपी राहावे म्हणून भाई अलिबागकर यांनी सन 1912 मध्ये भजन-पूजनासह निंबवृक्षाखाली श्रीस्वामी पादुका स्थापिल्या. हा उल्लेख ‘श्रीसाईसच्चरित्रा’च्या पाचव्या अध्यायात आहे.
श्रीस्वामी समर्थ प्रत्यक्ष देहावतारात असताना त्यांस कुण्या भक्ताने कबूल केलेली दक्षिणारूपी रक्कम पूर्णपणे देता आली नाही. मात्र, पुढे हाच भक्त काही दिवसांनी शिर्डी येथे गेला असता श्रीसाईबाबांनी त्यास श्रीस्वामी समर्थांपाशी केलेल्या नवसाची आठवण करून दिली व त्याच्याकडून न आलेली शिल्लक रक्कम मागून घेतली. श्रीस्वामी समर्थ सन 1878 मध्ये अक्कलकोट येथे समाधिस्थ झाले. मात्र आपल्या काही भक्तांना त्यांनी स्वप्नदृष्टांताद्वारे शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यास सांगितले. असेही काही प्रसंग ग्रंथोल्लेखाने नमूद केलेले आहेत.
श्रीसाईबाबांचे शिर्डी येथे दुसऱयांदा आगमन झाले आणि म्हाळसापतींनी त्यांचे स्वागत ‘आवो साई’ असे केले खरे. मात्र श्रीसाईबाबांना शिर्डी येथे कायमस्वरूपी स्थिर होण्यास बराच काळ लागला. श्रीसाईंचे परमेश्वरीय अस्तित्व प्रारंभिक काळात शिर्डीतील अनेकांना मान्य नव्हते. त्यामुळे शिर्डीतील काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता श्रीसाईबाबांकडे अनेक ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले, तर अनेकांनी त्यांची हेटाळणी व उपेक्षाही केली. अशा वेळी श्रीसाईबाबांचे अवतारीत्व आणि त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ विलसत असलेले परमेश्वरीय सामर्थ्य शिर्डीवासीयांना पटवून देण्यासाठी आलेले श्रीआनंदनाथ नावाचे सिद्ध पुरुषदेखील श्रीस्वामी समर्थ महाराजांचे अंतरंगातील शिष्य होते.
सावरगाव, येवल्याच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्धीस आलेल्या श्रीआनंद नाथांच्या दर्शनासाठी शिर्डीहून भक्तभाविक नित्यनेमाने येत असत. श्रीआनंद नाथांनी एकदा त्यांच्यापाशी शिर्डीस येण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा शिर्डीकर भक्त मंडळी हरखली. त्यांनी उत्साहात मिरवणुकीद्वारे श्रीआनंद नाथांना शिर्डी येथे आणले. मात्र गावाची वेस ओलांडताना त्यांनी सर्वप्रथम तरुण वयातील श्रीसाईबाबांची भेट घेतली, त्यांना प्रेमाने आलिंगन दिले आणि श्रीसाईबाबांचा परिचय शिर्डी ग्रामस्थांना ‘‘हा सत्पुरुष प्रत्यक्ष ‘हिरा’ आहे, यास गारगोटीसमान मानू नका’’ या शब्दांत करून दिला. हेमाडपंतलिखित ‘श्रीसाईसच्चरित्रा’च्या पाचव्या अध्यायातील 40 ते 44 या पाच ओव्यांमध्ये हा प्रसंग आलेला आहे. श्रीस्वामी समर्थांचे अक्कलकोट येथील व श्रीसाईबाबांचे शिर्डी येथील आगमन ‘खंडोबा’च्या देवळातच व्हावे तसेच ‘अक्कल’कोट आणि शिल‘धी’ या दोन्ही स्थानांच्या ‘नाम’माहात्म्यामध्ये ‘बुद्धी’ या अर्थाचे रूपक असावे हा निश्चितच ‘योगायोग’ नाही हे लक्षात घेतले पाहिजे.




























































