प्रासंगिक – साहित्याची शैक्षणिक जडणघडण

361

>> उमाकांत वाघ

14 डिसेंबर 2019, शनिवार रोजी विरार येथे नववे शिक्षक साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्त…माणूस जन्माला आला की, त्याला ज्ञानसंपन्न करण्यासाठी लहानपणापासूनच घरातील आई-वडिलांकडून ज्ञानाचे संस्कार दिले जातात. जन्मापासून शिकण्याची प्रेरणा माणसाला परिवारात व समाजात मिळत असते. शालेय शिक्षणात एकूणच सर्वांगीण आवश्यक असे शिक्षण दिले जाते. लहानपणापासून प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक व तसेच पदवी शिक्षण मिळते, पण मानवी जीवनाचा एकूणच व्यवहार संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारा असल्याने शिकलेले विचार त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरतात. मानवी विचारांचे, भाव-भावनांचे असंख्य गुंते ज्ञानाने सोडवत मानवी जीवनाचा प्रवाह चिंतनाच्या आणि लेखनाच्या माध्यमातून सामाजिक अर्थाने व ग्रंथरूपाने, अक्षरवाङ्मय म्हणून चिरकाल ज्ञान देत असतो. काळाच्या ओघात पुस्तकरूपाने अखंड वाहत असतो. शिक्षक हा शाळेच्या चार भिंतींतच नव्हे, तर अनुभवाच्या पाठशाळेतून यशस्वी जीवनाच्या व सामाजिक समृद्धीच्या संकल्पनांचे धडे येणाऱया पिढीला देत असतो. त्यामुळे शिक्षकाची साहित्य प्रज्ञा ही माणसाच्या जडणघडणीसाठी तो घेत असलेल्या शिक्षणात तोलामोलाची राहिलेली आहे.

जीवनासाठी आवश्यक ते शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता शिक्षक, प्राध्यापक केवळ लेखन, वाचनाशी नाते असते म्हणून नव्हे, तर एकूणच जीवनाविषयी तो शिकता शिकता अंतर्मुख होतो. चिंतनातून तो आपल्या साहित्य प्रज्ञेचा आविष्कार घडवितो. त्यामुळे शिक्षण आणि साहित्य प्रज्ञा हे वेगळे प्रवाह नाहीत. मात्र आजचे जीवन खूपच स्पर्धाशील बनले आहे. शिक्षक होणे व शिक्षकाची नोकरी मिळविणे, टिकविणे हीच खरी आव्हाने पुढच्या पिढीसमोर असणार आहेत. आज प्रादेशिक भाषेच्या म्हणजे अगदी आपल्या मराठीच्या संवर्धनाचा कळीचा मुद्दा गाजत असताना शासनाचे शिक्षण विषयाचे कचखाऊ धोरण आणि शासन अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या चक्रात गोंधळलेले आहे. ते सुस्पष्ट धोरण ठरवत नाहीत. इंग्रजी भाषेचे आक्रमण आणि तिच्या ज्ञानाचे संपादन अशीदेखील लढाई सुरू आहे. अर्थात हे सर्व शिक्षणाच्या भल्यासाठीच आहे. यासाठी तरीही शिक्षकाने लेखक बनावे, कवी बनावे. जीवनाच्या संघर्षातून सवड काढून रानावनात जावे. सहलीचा आनंद घ्यावा. ‘नदीच्या पल्याड देवीचा डोंगर, त्यात निर्सगाचे गान’ अशा सांस्कृतिक, आध्यात्मिक प्रेरणेचा शोध घ्यावा. समुद्राची गाज ऐकावी. साहित्य शिवारात चिंतनाच्या गाभ्यातून विचार परिशीलन करणारा शिक्षक साहित्याच्या अंगाने आपली प्रतिभा विकसित करील. त्याला जीवनाचा अर्थ सापडेल. त्या अर्थातून तो खऱया अर्थाने मानवी जीवनाचा शोध घेईल. ते अधिक उन्नत करण्यासाठी नवा विचार घेऊन येईल.

उद्या म्हणजे 14 डिसेंबर रोजी विरार येथे होणाऱया नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शिक्षक भारती व तमाम शिक्षक वर्ग भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशय समृद्धीसाठी नवा विचार मांडेल अशी आशा करूया. या संमेलनाचे उद्घाटक 93 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत, तर संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार असतील. शिक्षक आमदार कपिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, विश्वस्त वामन केंद्रे, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, कवी अरुण म्हात्रे, संभाजी भगत आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. साहित्याच्या शैक्षणिक जडणघडणीचा प्रवाह या संमेलनाच्या निमित्ताने पुढील काळात अधिक वेगाने सुरू राहील अशी अपेक्षा करूया.

आपली प्रतिक्रिया द्या