प्रासंगिक – श्रावणी पौर्णिमेची परंपरा

671

श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी यज्ञोपवित किंवा जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कार सांगितला आहे. आजही वैदिक धर्म पाळणार्‍याया बर्‍यायाच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी पुरुषांसाठी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते. या विधीला श्रावणी म्हणतात. जानवी बदलण्यासाठी श्रावणी पौर्णिमेखेरीज अन्य काही दिवसही सांगितले गेले आहेत.

गुरुकुलातील विद्याथ्र्यांना शिकविण्याचा पहिला दिवस किंवा ज्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा विद्याथ्र्यांच्या समावर्तन संस्काराचा दिवस म्हणून श्रावण पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते असे. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य आदी देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते. एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसर्‍याया दिवशी राखी पौर्णिमा असते. तसेच तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसर्‍याया पौर्णिमेला असते. बौद्ध धर्मीयांसाठीसुद्धा हा सण वेगळ्या कारणासाठी महत्त्वाचा आहे. वर्षातील बहुतेक पौर्णिमा बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. या सणाचे मोठे महत्त्व म्हणजे हा सण बहीण आणि भावाच्या अतूट प्रेमाची साक्ष देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल भावना असते. उत्तर हिंदुस्थानात हा सण ‘राखी’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घायुष्य व सुख लाभो अशी कामना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणार्‍याया व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे.

देशातील काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवर्‍यायाला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. हिंदुस्थानी समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. जो आज सर्व धर्मीयांत एकत्रितपणे साजरा करणे शक्य व आवश्यकही आहे. आजकाल हा सण फक्त बहीण आणि भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणूनच साजरा होतो. राखी या शब्दातच ‘रक्षण कर’ – ‘राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे.

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा हिंदुस्थानचे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्राला वरूणाच्या रूपात समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू, विशेषतः कोळी बांधवांची प्रथा आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, आपल्या नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्ती नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो.  म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले  की, नंतर समुद्रात मासेमारी सुरु होते. वर्षानुवर्षे हा नियम कोळी बांधव कटाक्षाने पाळत आले आहेत.

अशा रीतीने विविध हिंदू समाजघटकांशी सबंधित हा सण असल्याने सगळ्यांचाच  आहे. म्हणूनच सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा करण्याचा निर्धार केल्यास देशात सौहार्दपूर्ण, बंदुभावाचे आणि सहिष्णुतेचे वातावरण तयार होण्यास हातभार लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या