
> विवेक दिगंबर वैद्य
अक्कलकोट येथे मठ स्थापना अर्थात श्रीगुरुमंदिराची निर्मिती करून तेथे श्रीस्वामीसमर्थांच्या चिन्मय पादुका स्थापन करण्यापूर्वी श्रीबाळप्पा यांनी देशाच्या विविध भागात संचार केला आणि श्रीस्वामीभक्तीचा प्रसार करून सर्व ठिकाणी शिष्यसंप्रदाय निर्माण केला. देशसंचार करीत असता, ते समाजाला श्रीस्वामीसमर्थांच्या शिकवणुकीचा परिचय करून देत व त्या अवतारी सिद्धपुरुषाच्या स्वतः अनुभवलेल्या महान चरित्राचे कथन करीत असत.
‘गुरू ब्रह्मा गुरू विष्णू गुरुदेवो महेश्वरः। गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः’ अशा शब्दांत श्रीगुरूंचे महत्त्व सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभूमीवर सर्वत्र अशी असंख्य गुरुस्थाने आढळतात. गुरुस्थान म्हणजे गुरूचे ‘वास्तव्य’स्थान, त्यांचे कार्यक्षेत्र. ज्या स्थानावर गुरू कार्यरत असतात, ज्या स्थानाला गुरूंचा सहवास लाभतो, ज्या स्थानावरून गुरू जगत्कल्याण्याचे कार्य करतात त्या स्थानाचे माहात्म्य ‘गुरुस्थान’ या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात अशी गुरुस्थाने सर्वत्र पाहावयास मिळतात आणि तिथे आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात श्रीगुरुपौर्णिमेस मोठय़ा संख्येने भक्तांची गर्दी उसळते. महाराष्ट्रातील सर्व दत्तक्षेत्रे व त्यासोबत अक्कलकोट, शिर्डी, शेगाव अशा प्रमुख ठिकाणी तसेच विविध संप्रदायांतील अनेकविध श्रीगुरूंच्या वास्तव्यस्थानी भक्तांची झुंबड उडते.
अशाच पठडीतील परंपराधिष्ठित असे एक श्रीगुरुस्थान, जे अक्कलकोट येथे ‘श्रीगुरुमंदिर’ या नावाने सर्वत्र सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्याविषयी आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया. अक्कलकोटचे श्रीस्वामीसमर्थ महाराज हे थोर सिद्धसत्पुरुष लक्षावधी भाविकांच्या हृदयकमलावर आरूढ झालेले आहेत. त्यांच्या शिष्यपरंपरेचे सगुण दर्शन आपल्याला अक्कलकोटच्या ‘श्रीगुरुमंदिर’ स्थानामध्ये अनुभवावयास मिळते.
‘प्रज्ञापूर’ किंवा ‘अक्कलकोट’ हे पूर्वीचे संस्थानी गाव व आजचे तालुक्याचे केंद्र, श्रीस्वामीसमर्थांच्या येथील वास्तव्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. श्रीस्वामीसमर्थांनी निर्याणापूर्वी शिष्य श्रीबाळप्पा यांच्यावर अनुग्रह केला. आपल्या गळय़ातील एकमुखी दिव्य रुद्राक्ष त्यांच्या कंठी बांधला, अंगावर छाटी पांघरली आणि आपल्याकडील सुवर्णमुद्रिका श्रीबाळप्पांच्या बोटात घालून ‘मी माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे. तू माझा शिक्का यावत्चंद्र-दिवाकरौ पुढे चालव’ अशी आज्ञा करीत त्यांच्या हाती ध्वज व प्रासादिक चिन्मय पादुका प्रसादरूपाने सोपविल्या. श्रीस्वामीसमर्थांचे अवतारकार्य पुढे चालवून, त्यांच्या भक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य श्रीबाळप्पांनी फार तळमळीने केले, जेव्हा अडचणी येत तेव्हा, ‘मी शरीराने अंतर्धान पावलो असलो, तरी तुझ्याद्वारे मीच कार्य करेन. तू केवळ निमित्तमात्र आहेस. पादुकांच्या द्वारा माझी द्वाही सर्वत्र फिरवून तू लोकसंग्रह कर’ या श्रीस्वामीवचनावर विसंबून श्रीबाळप्पा सेवाकार्य करीत राहिले.
श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या चिन्मय पादुकांविषयी श्रीबाळप्पा नेहमी अन् निष्ठापूर्वक सांगत असत की, ‘या पादुकांमध्ये श्रीस्वामीसमर्थ प्रत्यक्ष वास करीत आहेत.’ अक्कलकोट येथे मठ स्थापना अर्थात श्रीगुरुमंदिराची निर्मिती करून तेथे श्रीस्वामीसमर्थांच्या चिन्मय पादुका स्थापन करण्यापूर्वी श्रीबाळप्पा यांनी देशाच्या विविध भागात संचार केला आणि श्रीस्वामीभक्तीचा प्रसार करून वऱहाड, छत्तीसगड, बंगाल आदी प्रदेशात शिष्यसंप्रदाय निर्माण केला. देशसंचार करीत असता, ते समाजाला श्रीस्वामीसमर्थांच्या शिकवणुकीचा परिचय करून देत व त्या अवतारी सिद्धपुरुषाच्या स्वतः अनुभवलेल्या महान चरित्राचे कथन करीत असत. गुरुसेवा निष्ठापूर्वक कशी करावी याचे साक्षात व जाज्वल्य उदाहरण असलेले श्रीबाळप्पा गुरुमाहात्म्याचे यथार्थ निरूपणही करीत असत. पुढे श्रीबाळप्पा यांनी अक्कलकोट येथे (सध्या भारत गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱया परिसरात) श्रीगुरुमंदिराची स्थापना केली. हे गुरुमंदिर पूर्वी ‘श्रीबाळप्पा मठ’ या नावाने प्रसिद्ध होते. या मठाच्या रूपाने साकारलेली श्रीस्वामीमहाराजांच्या गुरुगादीची परंपरा श्रीबाळप्पा यांनी निगुतीने राखली, पुढे त्यांच्या समाधीनंतर या अद्वितीय परंपरेस श्रीगंगाधर महाराज यांनी प्रयत्नपूर्वक वृद्धिंगत केले व त्यांच्यानंतर गुरुगादीवर विराजमान झालेल्या श्रीगजानन महाराज यांनी श्रीस्वामीसमर्थांच्या गादीपरंपरेस नवे अधिष्ठान दिले. म्हणून ‘श्रीगुरुमंदिर’ हे परंपराधिष्ठत आहे आणि श्रीबाळप्पा महाराज, श्रीगंगाधर महाराज आणि श्रीगजानन महाराज यांची नेमस्त कारकीर्द या मठाची लौकिक ओळख बनलेली आहे. बाळप्पा मठ ते गुरुमंदिर हा केवळ एका वास्तूचा किंवा एका परंपरेचा प्रवास नाही, तर अतर्क्य अवधूत श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या ‘कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम’ सामर्थ्याचा सर्वसामान्यांस ‘अनाकलनीय’ असा अद्भुत प्रवास आहे.
हावेरी येथे राहणारे, प्रपंचाचा थाट निगुतीने मांडणारे बाळप्पांसारखे सुखवस्तू घरातील सद्गृहस्थ वैराग्याची साथ धरून एकाएकी अक्कलकोटास आले. तिथे प्रस्थापित असलेल्या सेवेकऱयांचा रोष पत्करून श्रीस्वामीसेवेत रुजू झाले. पुढे ते श्रीस्वामीमुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाला फुलासारखे झेलत त्यांचा पट्टशिष्य झाले आणि त्यांच्या गुरुगादीचा वारसाधिकारीही बनले हे सर्वकाही अद्भुत आहे. त्यांनी जेव्हा त्यांच्या राहत्या घराचा उंबरठा ओलांडला तेव्हा ‘आपण स्वामीसंप्रदायाच्या गादीवर विराजमान होणार असल्याची’ त्यांना पुसटशी कल्पनादेखील आली नसेल. मात्र, श्रीगुरुगादीचा वारस ठरविण्यासाठी अनेक तुल्यबळ पर्याय समोर दिसत असतानादेखील श्रीस्वामीसमर्थांनी बाळप्पांना ‘सक्षम’ करण्यासाठीची पूर्वतयारी करवून घेतली. त्याचवेळी हे कार्य सुरू असताना दूर मध्य प्रदेशात शिंगवेकरांच्या घराण्यावर पूर्ण कृपादृष्टी ठेवून श्रीगंगाधरपंतांच्या रूपाने दुसरा वारसाधिकारी निर्माण करण्याचे कार्य आणि पुढे त्यांचाही उत्तराधिकारी म्हणून मिदनापूर येथील राजीमवाले यांच्या घरी श्रीगजानन महाराजांनी जन्म घ्यावा अशी परंपराधिष्ठत पूर्वतयारी श्रीस्वामीसमर्थांनी आधीच केली होती.
श्रीबाळप्पा महाराज, श्रीगंगाधर महाराज आणि श्रीगजानन महाराज यांच्या माध्यमातून श्रीस्वामीसमर्थांनी भक्तिमार्गातून सुरू झालेल्या गुरुगादी परंपरेचा आदर्श निर्माण केला व त्याच परंपरेला बदलत्या काळाशी सुसंगत ठेवून कर्माधिष्ठत परंपरेकडे अलगद वळविले. त्यानुसार श्रीस्वामीमहाराजांची ही गुरुगादी परंपरा पुढे नेताना श्रीगजानन महाराजांनी सत्ययुगाचे स्वप्न पाहिले आणि भगवान परशुरामांच्या आशीर्वादाने ते ‘शिवपुरी’च्या रूपाने प्रत्यक्षात उतरवले. यातूनच, श्रीगुरुमंदिराची पूर्वापार ओळख आणि तिथले स्थानमाहात्म्य अनुभवता येते.


























































